त्रिवेंद्रसिंह रावत यांचा धडाक्यात शपथविधी

0
47

वृत्तसंस्था
डेहराडून, १८ मार्च
भाजपा विधिमंडळ पक्षाचे नेते त्रिवेंद्रसिंह रावत यांनी शनिवारी उत्तराखंडचे मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली. त्यांच्यासोबत अन्य ९ जणांचा शपथविधी देखील पार पडला.
येथील परेड मैदानावर आयोजित शानदार सोहळ्यात राज्यपाल के. के. पॉल यांनी रावत आणि त्यांच्या मंत्रिमंडळातील अन्य ९ सदस्यांना पद व गोपनीयतेची शपथ दिली. या शपथविधी सोहळ्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी, भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शाह यांच्यासोबत अनेक नेते उपस्थित होते.
सतपाल महाराज, हरक सिंह रावत, मदन कौशिक, अरविंद पांडे, सुबोध उनियाल, यशपाल आर्य आणि प्रकाश पंत यांनी कॅबिनेट, तर रेखा आर्य आणि धानसिंह रावत यांनी राज्यमंत्री म्हणून शपथ घेतली. प्रशासकीय आणि संघटनात्मक कौशल्य असलेले त्रिवेंद्रसिंह यांच्याकडे विकासाचीही दूरदृष्टी आहे.
शुक्रवारी झालेल्या भाजपा विधिमंडळ पक्षाच्या बैठकीत रावत यांची नेतेपदी निवड करण्यात आली होती. त्यानंतर त्यांनी लगेच राज्यपालांची भेट घेऊन सरकार स्थापन करण्याचा दावा केला होता. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या मुशीतून तयार झालेले रावत हे उत्तराखंडचे आठवे मुख्यमंत्री आहेत.
७० सदस्यीय राज्य विधानसभेत भाजपाने ५७ जागांवर दणदणीत विजय मिळवित कॉंगे्रसपासून सत्ता खेचून आणली आहे. त्रिवेंद्रसिंह रावत यांनी डोईवाला विधानसभा मतदारसंघातून कॉंग्रेसच्या हीरा सिंह बिश्त यांचा २४ हजार मतांच्या फरकाने पराभव केला. डोईवाला मतदारसंघातून त्यांनी सलग तिसर्‍यांदा विजय मिळविला. २००२ पासून ते येथून निवडणूक लढवत आहेत.