केंद्रीय मंत्रिमंडळात लवकरच फेरबदल

0
48

तभा वृत्तसेवा
नवी दिल्ली, १८ मार्च
गोवा, मणिपूर, उत्तराखंडमध्ये भाजपाचे सरकार स्थापन झाले असताना आणि उत्तरप्रदेशमध्ये रविवारी भाजपा सरकारचा शपथविधी होत असताना केंद्रीय मंत्रिमंडळातील फेरबदलाकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. संसदेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाचा दुसरा टप्पा संपल्यानंतर फेरबदलाची चर्चा सुरू झाली आहे.
मनोहर पर्रीकर यांना गोव्यात मुख्यमंत्री म्हणून पाठविण्यात आले आहे. शपथ घेण्यापूर्वी त्यांनी संरक्षणमंत्रीपदाचा राजीनामा दिला होता. या पदाचा अतिरिक्त कार्यभार अर्थमंत्री अरुण जेटली यांच्याकडे सोपविण्यात आला आहे. त्यामुळे नव्या संरक्षणमंत्र्याची लवकरच निवड करावी लागणार आहे.
सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योगमंत्री कलराज मिश्रा यांच्या वयाची ७५ वर्षे पूर्ण झाल्यामुळे त्यांनाही लवकरच राजीनामा द्यावा लागण्याची शक्यता आहे. पंतप्रधानांनी ७५ वर्ष पूर्ण झालेल्यांना केंद्रीय मंत्रिमंडळात न ठेवण्याचा निकष ठरवला आहे. कलराज मिश्रा यांनाही याच निकषामुळे राजीनामा द्यावा लागणार
होता, मात्र उत्तरप्रदेशातील विधानसभा निवडणुकीमुळे त्यांना मुदतवाढ मिळाली होती. आता निवडणूक आटोपल्यामुळे तसेच राज्यात बहुमताचे सरकार आल्यामुळे कलराज मिश्रा यांनाही केंद्रीय मंत्रिमंडळातून राजीनामा द्यावा लागणार आहे.
याच निकषामुळे अल्पसंख्यक कल्याण मंत्री नजमा हेपतुल्ला यांना केंद्रीय मंत्रिमंडळाचा राजीनामा द्यावा लागला होता. नंतर त्यांची मणिपूरच्या राज्यपालपदी नियुक्ती झाली. कलराज मिश्रा यांचीही राज्यपाल म्हणून नियुक्ती होणार असल्याची चर्चा आहे.
किडनी प्रत्यार्पणाची शस्त्रक्रिया झाल्यामुळे सुषमा स्वराज यांच्याकडील परराष्ट्र व्यवहार खाते काढून त्यांना दुसरे कमी दगदगीचे खाते दिले जाण्याची शक्यता आहे. अशा परिस्थितीत परराष्ट्र व्यवहार मंत्र्याची निवडही मोदी यांना करावी लागणार आहे. त्यामुळे संसदेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाचा दुसरा टप्पा संपल्यानंतर केंद्रीय मंत्रिमंडळात फेरबदल होण्याची शक्यता आहे.