उत्तरप्रदेशात ‘योगी’राज

केशवप्रसाद मौर्य, दिनेश शर्मा उपमुख्यमंत्री

0
119

स्मृती उपवनात आज शपथविधी
वृत्तसंस्था
लखनौ, १८ मार्च
उत्तरप्रदेश विधानसभा निवडणुकीत ऐतिहासिक विजय मिळविल्यानंतर, देशातील या सर्वात मोठ्या राज्याचा मुख्यमंत्री कोण असणार, याविषयी गेल्या काही दिवसांपासून असलेल्या उत्सुकतेला शनिवारी पूर्णविराम मिळाला. भाजपाचे उत्तरप्रदेशातील प्रभावी नेते आणि खासदार योगी आदित्यनाथ यांची भाजपा विधिमंडळ पक्षनेतेपदी आज एकमताने निवड करण्यात आली. उद्या, रविवारी ते मुख्यमंत्रिपदाची शपथ घेणार आहेत. भाजपाचे प्रदेशाध्यक्ष केशव प्रसाद मौर्य आणि लखनौचे महापौर दिनेश शर्मा हे दोन उपमुख्यमंत्री राहणार आहेत.
विधिमंडळ पक्षनेत्याची निवड करण्यासाठी भाजपाच्या नवनिर्वाचित आमदारांची बैठक बोलावण्यापूर्वी योगी आदित्यनाथ, भुपेंद्र यादव, ओम माथूर, के. पी. मौर्य आणि सुनील बन्सल यांच्यात वेगळी बैठक पार पडली.
त्यानंतर झालेल्या विधिमंडळ पक्षाच्या बैठकीत केंद्रीय निरीक्षक म्हणून भाजपचे वरिष्ठ नेते एम. व्यंकय्या नायडू आणि राष्ट्रीय सरचिटणीस भूपेंद्र यादव उपस्थित होते. स्वत: केशवप्रसाद मौर्य यांनीच योगी आदित्यनाथ यांच्या नावाची घोषणा केली. या बैठकीत योगी आदित्यनाथ येताच, सर्व आमदारांनी टाळ्यांच्या कडकडाटात त्यांचे स्वागत केले.
उत्सुकता शिगेला पोहोचली
विधिमंडळ पक्षाची बैठक संपल्यानंतर नायडू यांनी भरगच्च पत्रपरिषदेत योगी आदित्यनाथ यांच्या नावाची घोषणा केली. भाजपा हा कार्यकर्त्यांचा पक्ष आहे आणि या पक्षात कार्यकर्त्यांनाच मोठी पदे दिली जातात. बैठकीत आ. सुरेश खन्ना यांनी योगी आदित्यनाथ यांच्या नावाचा प्रस्ताव सादर केल्यानंतर सर्व आमदारांनी प्रस्तावाचे समर्थन केले. यानंतर स्वत: आदित्यनाथ यांनी दोन अनुभवी सहकार्‍यांची मागणी केली. त्यानुसार त्यांना दोन उपमुख्यमंत्री देण्याचा निर्णय घेण्यात आला, अशी माहिती नायडू यांनी दिली. केशवप्रसाद मौर्य आणि पक्षाचे वरिष्ठ नेते दिनेश शर्मा हे दोन उपमुख्यमंत्री राहणार आहेत, असे नायडू यांनी सांगितले.
आदित्यनाथ यांच्या नावाचा प्रस्ताव सादर करण्यापूर्वी मी स्वत: सर्व आमदारांचे मत जाणून घेतले आणि आपल्याकडे आणखी कोणाचे नाव आहे काय, याबाबत विचारणाही केली. पण, सर्वच आमदारांनी आदित्यनाथ यांचेच नाव घेतले. यानंतर आदित्यनाथ यांच्याच आग्रहानुसार त्यांना दोन उपमुख्यमंत्री देण्यात आले, असेही नायडू म्हणाले.
स्मृती उपवन येथे शपथविधी
योगी आदित्यनाथ यांच्या नेतृत्वाखालील भाजपा सरकारचा शपथविधी सोहळा उद्या रविवारी दुपारी सव्वादोन वाजता स्मृती उपवन येथे आयोजित करण्यात आला आहे. यापूर्वी, शपथविधीसाठी सायंकाळी पाच वाजताचा मुहूर्त काढण्यात आला होता. पण, राज्यपाल राम नाईक यांच्या सूचनेनंतर वेळेत बदल करण्यात आला.
नरेंद्र मोदी, अमित शाह उपस्थित राहणार
या शपथविधी समारंभाला पंतप्रधान नरेंद्र मोदी, पक्षाध्यक्ष अमित शहा, भाजपाशासित राज्यांचे मुख्यमंत्री, अनेक केंद्रीय मंत्री उपस्थित राहाणार आहेत. हा सोहळा पाहण्यासाठी सुमारे एक लाख लोकांची उपस्थिती अपेक्षित असल्याची माहिती सूत्रांनी दिली.
विकास हेच ध्येय
मुख्यमंत्रिपदी निवड झाल्यानंतर योगी आदित्यनाथ यांनी, विकास हेच आपल्या सरकारचे ध्येय राहणार असल्याचे स्पष्ट केले. आपण केवळ विकासाच्या मार्गावर वाटचाल करणार आहोत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सर्व आश्‍वासनांची पूर्तता करण्यासोबतच, समाजातील सर्व घटकांचा विकास ही आपली प्राथमिकता राहणार आहे, असे त्यांनी सांगितले.