पुजाराचे शतक, भारताचे चोख प्रत्युत्तर

0
150

वृत्तसंस्था
रांची, १८ मार्च
ऑस्ट्रेलियाच्या ४५१ धावांच्या डोंगराला चोख प्रत्युत्तर देत भारताने तिसर्‍या दिवसअखेरीस ६ बाद ३६० धावा उभारल्या. चेतेश्‍वर पुजाराने दमदार नाबाद शतकी खेळी करून भारताला सन्मानजनक स्थितीत आणले.
भारत अजून ९१ धावांनी पिछाडीवर असून ४ गडी शिल्लक आहेत. खेळ थांबला तेव्हा चेतेश्‍वर पुजारा (१३०) व रिद्धिमान साहा (१८) खेळपट्टीवर होते.
पुजाराचे शतक हे तिसर्‍या दिवसाच्या खेळाचे खास वैशिष्ट्य ठरले असून, त्याने अतिशय धैर्याने एक टोक सांभाळीत केवळ कारकीर्दीतले ११ वे कसोटी शतक नव्हे, तर या मालिकेत भारताकडून पहिले शतक झळकावले.
विराट कोहली दुखापतग्रस्त असूनही मैदानावर उतरला, परंतु २३ चेंडूत ६ धावा काढून तो पॅव्हेलियनमध्ये परतला. तसेही या मालिकेत विराटची बॅट शांतच राहिली आहे. यापूर्वीपर्यंत मात्र त्याच्या बॅटमधून सतत धावा निघत होत्या, परंतु या मालिकेतील पाच डावात तो ०, १३, १२, १५ व ६ धावाच काढू शकला. लागोपाठ चार मालिकेत ४ द्विशतक झळकाविणार्‍या विराट कोहलीसाठी ही चिंताजनक बाब ठरू शकते. पॅट कमिन्सने भारताचे चार गडी बाद केले, तर स्टिव्ह ओकिफी व जोश हेझलवूडने प्रत्येकी एक बळी टिपला. पुजाराशिवाय भारताकडून सलामी फलंदाज मुरली विजयनेसुद्धा शानदार फलंदाजी केली. विजयसाठी हा सामना विशेष आहे. कारण हा त्याचा ५० वा कसोटी सामना आहे. त्याने तो साजरासुद्धा केला. त्याने अर्धशतक झळकावले, परंतु तो त्याला शतकामध्ये परावर्तित करू शकला नाही आणि उपाहारासाठी खेळ थांबण्याच्या दोन चेंडूपूर्वीच एक फटका मारण्याच्या नादात तो बाद झाला. विजयने ८२ धावांची खेळी केली. त्याने पुजारासोबत दुसर्‍या गड्यासाठी १०२ धावांची भागीदारी केली. करुण नायरनेसुद्धा पुजारासोबत ४४ धावांची भर घातली, परंतु तो २३ धावा काढून बाद झाला. सामन्याच्या दुसर्‍या दिवशी लोकेश राहुलनेसुद्धा ६७ धावा नोंदविल्या.
धावफलक
ऑस्ट्रेलिया पहिला डाव : सर्वबाद ४५१.
भारत पहिला डाव : (१ बाद १२० धावांवरून पुढे) के.एल. राहुल झे. वडे गो. कमिन्स ६७, मुरली विजय यष्टिचित गो. ओकीफी ८२, चेतेश्‍वर पुजारा नाबाद १३०, विराट कोहली झे. स्मिथ गो. कमिन्स ०६, अजिंक्य रहाणे झे. वडे गो. कमिन्स १४, के.के. नायर त्रि.गो. हेझलवूड २३, आर. अश्‍विन झे. वडे गो. कमिन्स ०३, रिद्धिमान साहा खेळत आहे १८, अवांतर १७, एकूण १३० षटकांत ६ बाद ३६०.
गडी बाद होण्याचा क्रम : १-९१, २-१९३, ३-२२५, ४-२७६, ५-३२०, ६-३२८.
गोलंदाजी : झलवूड ३१-९-६६-१, पॅट कमिन्स २५-८-५९-४,ओकिफी ४३-११-११७-१, नॅथन लियोन २९-२-९७-०, ग्लेन मॅक्सवेल २-०-४-०.