सोनिया गांधी नाममात्र अध्यक्ष; राहुलच खरे सूत्रधार : नायडू

0
99

वृत्तसंस्था
हैदराबाद, १८ मार्च
सोनिया गांधी कॉंगे्रसच्या नाममात्र अध्यक्ष असून, गेल्या दहा वर्षांपासून पक्षाची सूत्रे राहुल गांधी यांच्याच हातात आहेत आणि ते आपल्या मर्जीनुसार पक्षाचा कारभार पाहात आहेत, अशी टीका केंद्रीय मंत्री एम. व्यंकय्या नायडू यांनी केली.
गेल्या दहा वर्षांपासून राहुल गांधी यांच्याकडेच पक्षाची सूत्रे आहेत. सोनिया गांधी या केवळ नामधारी आहेत. कॉंग्रेस पक्ष एक बुडते जहाज आहे. गोवा आणि मणिपूरमध्ये कॉंग्रेसला सर्वाधिक जागा मिळाल्या असतानाही हा पक्ष सरकार स्थापन करू शकला नाही. त्यामुळे काही नेत्यांनी कॉंग्रेसच्या नेतृत्त्वावर शंका उपस्थित केली आहे, असे नायडू यांनी वृत्तसंस्थेशी बोलताना सांगितले.
ती घोषणा केवळ उत्तरप्रदेशपुरतीच
उत्तरप्रदेशातील निवडणूक प्रचाराच्या काळात भाजपाने शेतकर्‍यांना कर्जमाफी देण्याचे वचन दिले होते. हे वचन केवळ उत्तरप्रदेशपुरतेच मर्यादित आहे. केंद्र सरकारचे हे राष्ट्रीय धोरण नाही, असे नायडू यांनी स्पष्ट केले.
उत्तरप्रदेशात आता भाजपाचे सरकार आले आहे. आम्ही आपल्या वचनाची पूर्तता नक्कीच करणार आहोत. हे धोरण अंमलात आणण्यावरच आपल्या सरकारचा भर राहणार आहे, असे त्यांनी सांगितले.