१० लाख महिलांच्या स्वाक्षर्‍या मुस्लिम राष्ट्रीय मंचचा दावा

0
120

तिहेरी तलाकविरोधात
वृत्तसंस्था
नवी दिल्ली, १८ मार्च
तिहेरी तलाकची प्रथा बंद करण्यात यावी, यावर देशभरातच चर्चा सुरू असताना आणि आता न्यायालयानेही या मुद्याची दखल घेतली असताना, तिहेरी तलाकविरोधात दाखल याचिकेवर १० लाखांपेक्षा जास्त मुस्लिम महिलांनी स्वाक्षर्‍या केल्या असल्याचा दावा मुस्लिम राष्ट्रीय मंचने केला आहे.
तिहेरी तलाकची प्रथा बंद करण्यात यावी, असे आवाहन मुस्लिम महिलांनी या याचिकेतून केले असल्याचे मंचचे म्हणणे आहे. उत्तरप्रदेश विधानसभा निवडणुकीत भाजपानेही आपल्या जाहीरनाम्यात तिहेरी तलाकचा मुद्दा अतिशय प्रभावीपणे उपस्थित केला होता.
कुराणातील उल्लेखानुसार, पहिल्यांदा तलाक म्हटल्यानंतर संबंधित व्यक्तीला तीन महिनेपर्यंत आपल्या निर्णयावर विचार करावा लागतो. त्यानंतरही तो निर्णयावर ठाम असेल, तर दोन वेळा तलाक बोलल्यानंतर तलाक झाल्याचे मानले जाते.
अनेक मुस्लिम देशांमध्ये या प्रथेवर बंदी आहे. मात्र, भारतात त्यास मान्यता आहे. मुस्लिम राष्ट्रीय मंचने या प्रथेविरोधात याचिका दाखल केली आहे. भाजपाला उत्तरप्रदेश निवडणुकीत विजय मिळाल्यानंतर याचिकेला सर्वच स्तरावरून प्रचंड प्रतिसाद मिळत आहे.
दरम्यान, अलिकडेच करण्यात आलेल्या जनगणनेनुसार, २० कोटी लोकसंख्या असलेल्या उत्तरप्रदेशात १८ टक्के मुस्लिम आहेत.
यापूर्वीही अनेक महिलांनी तिहेरी तलाकविरोधात न्यायालयात याचिका दाखल केल्या आहेत. या याचिकांवर या महिन्यात सर्वोच्च न्यायालयात सुनावणी होण्याची शक्यता आहे.