सर्वात लांब भुयारी मार्ग लवकरच वाहतुकीस खुला

0
140

जम्मू-श्रीनगर अंतर अडीच तासांनी घटणार
वृत्तसंस्था
छेहानी (उधमपूर), १८ मार्च
जम्मू ते श्रीनगर महामार्गावर तयार करण्यात आलेल्या ९.२ किमी अंतराचा देशातील सर्वात लांब भुयारी मार्ग लवकरच वाहतुकीस खुला होणार आहे. नुकतीच या मार्गावर वाहतुकीची चाचणी घेण्यात आली.
निम्न हिमालयीन पर्वताच्या क्षेत्रातील या भुयाराचे बांधकाम २३ मे २०११ रोजी सुरू करण्यात आले. २८६ किलोमीटर अंतराच्या महामार्गावरील हे भुयार ९.२ किमी अंतराचे असून, ते दोन पोकळ्यांच्या स्वरूपात बांधण्यात आले आहे. सदर भुयाराची निर्मिती ‘इंटिग्रेटेड ट्युनल कंट्रोल सिस्टिम’ अंतर्गत करण्यात आली असून, भुयाराचे संपूर्ण क्षेत्र अग्निरोधक, वाहतूक सिग्नल्स, संपर्क सुविधा, विद्युतीकरण, मोकळी हवा आदींनी परिपूर्ण आहे. या मार्गामुळे जम्मू ते श्रीनगर या दोन शहरांतील अंतर सुमारे अडीच तासांनी कमी होणार आहे.
या संदर्भात प्रकल्प संचालक जे. एस. राठौर यांनी सांगितले की, भुयारी मार्गावर ९ ते १५ मार्च या कालावधीत चाचणी घेण्यात आली.
मार्चअखेर पंतप्रधान मोदी यांच्या हस्ते या भुयाराचे लोकार्पण करण्याचे नियोजन आहे. त्यानंतर त्यावरून वाहतूक सुरू होईल. हिमवर्षावामुळे वाहतुकीस होणारा अडथळा या भुयारी मार्गामुळे दूर होणार आहे.