नगर-बीड मार्गावर पहिल्यांदाच धावली रेल्वे

0
57

वृत्तसंस्था
बीड, १८ मार्च
बीडकरांचे अनेक वर्षांपासूनचे अहमदनगर-बीड-परळी रेल्वेचे स्वप्न लवकरच पूर्ण होणार आहे. अहमदनगरमधील नारायण डोह या स्थानकापासून बीडच्या दिशेने शुक्रवारी पहिल्यांदाच या मार्गावरून रेल्वेची चाचणी झाली.
या चाचणीत १२.५ किमीचा मार्ग हा दैनंदिन प्रवासासाठी तयार असल्याचे निष्पन्न झाले आहे. रेल्वे अधिकार्‍यांनीही या मार्गासाठी हिरवा कंदिल दिल्यामुळे लवकरच नगर-बीड-परळी या मार्गावरून रेल्वेने प्रवास करता येणार आहे.
यंदाच्या अर्थसंकल्पात या रेल्वे मार्गासाठी सर्वाधिक ७८० कोटींची भरीव तरतूद करण्यात आली आहे. या प्रकल्पासाठी पहिल्या वर्षी १५९ कोटी, दुसर्‍या वर्षी ३०० कोटी आणि आता ७८० कोटींची तरतूद रेल्वेमंत्री सुरेश प्रभू यांनी केली आहे. याशिवाय राज्य सरकारचा वाटा या तरतुदी व्यतिरिक्त असणार आहे.
अहमदनगर ते परळी दरम्यानच्या जवळपास सर्व ठिकाणच्या रेल्वे पुलांचे काम पूर्ण झाले असून भरावाचे कामही पूर्ण होत आले आहे. तर अहमदनगर ते नारायणडोह या पहिल्या टप्प्यातील पंधरा किलोमीटरवर रेल्वे रुळ देखील अंथरून झाले आहेत.
दरम्यान यापूर्वी या मार्गावर रेल्वे इंजिन धावताना पाहिल्याने सर्वांच्या भुवया उंचावल्या होत्या. नगर-दौंड महामार्गावर हा रेल्वेमार्ग महामार्गास छेदतो. तेथून हे रेल्वे इंजिन धावले होते.