माढ्यातील जिनिंग मिलला भीषण आग

0
91

वृत्तसंस्था
माढा (सोलापूर), १८ मार्च
माढा तालुक्यातील म्हैसगाव येथील संजय शिंदे यांच्या विठ्ठल कॉर्पोरेशनच्या जिनिंग मिलला १७ मार्च रोजी रात्री अचानक आग लागली. यात तब्बल १० कोटी रुपयांचे नुकसान झाले.
म्हैसगाव येथे विठ्ठल कॉर्पोरेशन कंपनीच्या वतीने साखर कारखाना, सूतगिरणी, को-जनरेशन, इथेनॉल प्रकल्प यासह जिनिंग मिल हे व्यवसाय सुरू आहेत. शुक्रवारी रात्री जिनिंग मिलमध्ये घर्षणाने आगीला सुरुवात झाली आणि या ठिकाणी असलेला शेकडो टन कापूस तसेच सरकी, पेंड याने पेट गेतला. पाहता पाहता आगीने रौद्र रूप धारण केले.
आग लागलेली पाहताच सर्व कामगार आणि कर्मचारी बाहेर पळत आले. तातडीने अग्निशमन दलाला पाचारण करण्यात आले. पंढरपूर, माढा, कुर्डुवाडी परिसरातील ८ अग्निशमन दलाच्या गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या आणि आग विझवण्याचा आटोकाट प्रयत्न केला.

अखेर ७ ते ८ तासांनंतर आग शांत करण्यात यश आले. मात्र, तोवर जवळपास १० कोटी रुपयांचा कच्चा माल, मशिनरी आणि इमारती आगीच्या भस्मस्थानी पडल्या. या दुर्घटनेत सुदैवाने कोणतीही मनुष्यहानी झाली नसली तरी जिनिंग मिलच्या इमारतींच्या लोखंडी बलाढ्य अँगल आणि खांब देखील या आगीत वाकडे तिकडे होऊन गेले आहेत.
(पान ७ मध्ये सोलापूर फायर नावाने)