वणी नगर परिषदेचा दणका

0
58

करवसुलीसाठी सरकारी कार्यालयांना ठोकले सील
तभा वृत्तसेवा
वणी, १८ मार्च
येथील नगर परिषदेची मालमत्ता करवसुली ३१ मार्चपूर्वी १०० टक्के व्हावी यासाठी जबरदस्त मोहीम उघडण्यात आली आहे. या मोहिमेंतर्गत शनिवार, १८ मार्च रोजी नप प्रशासनाने वणी शहरातील विविध सरकारी कार्यालयांना सील ठोकून एकच खळबळ उडवून दिली.
वणी ग्रामीण रुग्णालयाकडे १३ लाख ७२ हजार ६१० रुपये थकबाकी असून वैद्यकीय अधीक्षक डॉ. चंद्रशेखर खांबे यांच्या कक्षाला सील ठोकण्यात आले. दूरसंचार विभागाच्या ७ लाख ८४ हजार १७६ रुपयांच्या वसुलीसाठी उपविभागीय अभियंता प्रशांत उईके यांच्या कक्षाला सील ठोकण्यात आले.
सार्वजनिक बांधकाम विभागाकडे ४४ हजार ५०५ रुपये थकबाकी असून त्याच्या वसुलीकरिता उपविभागीय अभियंता किशोर येवले यांच्या कक्षाला सील लावण्यात आले. तसेच लघु पाटबंधारे विभागाकडे असलेल्या १ लाख २६ हजार ३३६ रुपयांच्या थकबाकी वसुलीसाठी उपअभियंत्यांच्या कक्षाला सील ठोकण्यात आले. सील ठोकलेले हे सर्व कक्ष संबंधित अधिकार्‍यांना सुपूर्दनाम्यावर परत सोपविण्यात आले आहेत.
जिल्हाधिकारी सचिंद्र प्रतापसिंह यांच्या निर्देशांनुसार वणी नगर परिषदेचे मुख्याधिकारी दीपक इंगोले यांच्या नेतृत्वात ही कारवाई पार पाडण्यात आली. सहायक कर निरीक्षक खुशाल भोंगळे व त्यांचे सहकारी सुभाष ब्राम्हणे, सुभाष आवारी, वाडगुरे, केशव खापने व शेख अकील शेख जलील यांचा या कारवाईत सहभाग होता.