सभागृहाचा उपयोग शेतकर्‍यांच्या हितासाठी करा

मुख्यमंत्र्यांचा टोला

0
108

तभा वृत्तसेवा
मुंबई, १८ मार्च
१५ वर्षे सत्तेत असताना शेतकर्‍यांची अवस्था काय केली, हे सर्व राज्यातील जनतेला माहिती आहे. केवळ गोंधळ करून सभागृहाचा वेळ वाया घालवण्याऐवजी शेतकर्‍यांसह राज्यातील जनतेच्या समस्या सोडवण्यासाठी सभागृहाचा उपयोग करावा, असा टोला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विरोधकांना लगावला. केवळ कर्जमाफीच्या घोषणा देऊन विरोधकांनी आपणच शेतकर्‍यांचे कैवारी असल्याचे समजू नये, असा चिमटाही त्यांनी काढला.
मुख्यमंत्री म्हणाले की, राज्य सरकार शेतकर्‍यांच्या पाठीशी ठामपणे उभे आहे. मात्र, विरोधकांना केवळ कर्जमाफीचे राजकारण करायचे आहे. राज्यात १ कोटी ३४ लाख शेतकरी असून, त्यापैकी ३१ लाख शेतकर्‍यांचे कर्ज थकीत आहे. थकबाकी असणारा शेतकरी पुढील कर्ज घेण्यास पात्र असू शकत नाही. कर्जमाफी करायची असेल तर ३० हजार ५०० कोटी रुपये आवश्यक आहेत. नुसते कर्जमाफ करून शेतकर्‍यांच्या समस्या सुटणार नाहीत. शेतीसाठी पुरक सोयीसुविधा तयार करून दिल्या नाहीत तर ते पुन्हा कर्जबाजारी होतील.
शेती क्षेत्रात दोन वर्षांत शासनाने पायाभूत गुंतवणूक केल्यामुळे चांगला परिणाम दिसून आला आहेे. कृषी विकासाचा दर वाढलेला आहे, हे काल मांडलेल्या आर्थिक पाहणी अहवालातून समोर आले आहे. कृषी क्षेत्राच्या विकासासाठी अधिकाधिक गुंतवणूक होण्याची आवश्यकता आहे. कर्जमाफी करण्याच्या दृष्टीने केंद्र सरकारही सकारात्मक असल्याचे आश्‍वासन केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली यांनी दिल्याचे मुख्यमंत्र्यांनी यावेळी सांगितले.
कर्जात बुडालेल्या शेतकर्‍यांना बाहेर काढण्यासाठी सरकार विविध स्तरावर प्रयत्न करत आहे. पण दुसरीकडे कर्जाची नियमित परतफेड करणार्‍या शेतकर्‍यांवर कर्जमाफीचा विपरीत परिणाम होऊ नये, त्याच्या मनात आपल्यावर अन्याय होत असल्याची भावना निर्माण होऊ नये. यासाठी नियमित कर्जाची परतफेड करणार्‍या शेतकर्‍यांनाही प्रोत्साहन रकम दिली जाईल, असेही फडणवीस म्हणाले.