पाण्याच्या गुणवत्तेची जागृती

0
74

जलसप्ताह

पाणी हे जीवन आहे. जल है तो कल है | बचत पाण्याची गरज काळाची, या आणि तत्सम उक्ती आपण नेहमी ऐकत-वाचत असतो. पाण्याचे महत्त्व काय आहे हे आता सर्वश्रृत आहे. पण पुन्हा पुन्हा ते अधोरेखित करण्याची गरज आहे. येणार्‍या पिढीचा ठेवा आपण त्यांना सुरक्षितपणे हस्तांतरित करणे ही आपल्या पिढीची नैतिक जबाबदारी आहे. सर्व नैसर्गिक संसाधनांचा वापर आपण ज्या गतीने करतो आहोत त्या प्रत्येकीसाठी हे लागू आहे. त्यात पाण्यासाठी ते सर्वाधिक महत्त्वाचे आहे. हे नैसर्गिक संसाधन आपल्याला फक्त पुरेशा प्रमाणातच नाही, तर पुरेशा सुरक्षिततेसह आपल्याला हस्तांतरित करायचे आहे. त्यामुळे आपण पाण्याची बचत करतो आहोत काय? याचा प्रत्येकाने विचार करणे आवश्यक आहे.
पाण्याची बचत करत करत आपण पाणी वाचवले, पण ते पिण्यायोग्य नसेल, तर त्या बचतीचा काय उपयोग? समुद्रामधे एक प्याला पाणी पिण्यासारखे नसते. तशीच परिस्थिती भूतलावरही आली, तर जीवन उद्ध्वस्त होईल किंबहुना संपून जाईल. त्यामुळे आपलं पाणी केवळ पुरेसं नाही, तर ते योग्य गुणवत्तेचंही असावं, याबाबत आपण संवेदनशील राहाणे तेवढेच गरजेचे आहे.
आपल्या देशात गंगा शुद्धीकरणाबाबत आपण नेहमीच वाचतो. पण नागपूरचा विचार केला, तर नाग नदीबाबत आपण किती संवेदनशील आहोत? मुळा-मुठा नद्यांबाबत पुणेकर किती संवेदनशील आहेत? हे नदी-नाले तर आपल्या शहरांच्या मधोमध वाहतात. पण यांचं पाणी वापरात आणण्याची कोणी हिंमत करू शकतो काय? बरं, हे आपल्याला दिसत नाही काय? नुसतं दिसतच नाही, तर त्याची दुर्गंधीही येते. गटारगंगा झालेल्या या नद्या आपल्याला त्यांच्या अस्तित्वाचीच नाही, तर त्यांच्या मरणासन्न अवस्थेचीही वेळोवळी जाणीव करून देतात. पण याची दखल घेतो कोण? परिणाम काय? म्हणजेच दखल घेणारे अन् न घेणारे सारखेच; आणि त्यांना दूषित करणारेही आपण सर्व सारखेच. पाण्याच्या गुणवत्तेबाबत तांत्रिक अभ्यास करणार्‍यांना तर या प्रश्‍नाचे गांभीर्य जास्त खोल माहीत असणार. सर्वसाधारण नागरिकांनाही त्याचं गांभीर्य आहे. पण कोणी काही करत नाही. कोणीच सुधारणा करत नाही. अशा दूषित विषारी नद्यांची आर्त हाक केवळ आपल्या बहिर्‍या कानांवर पडत राहाते आणि दुर्गंधीची तर सवयच झालीय्.
नाग नदीच्या पाण्याचा विचार केला, तर याचं काय होत असेल? ते कन्हानला मिळते. पुढे कन्हानमधून प्रवाहित होऊन वैनगंगेला मिळते. त्यापुढे ते पाणी गोसीखुर्द प्रकल्पात जमा होते. जर तेथून ते पाणी खाली सोडलं तर आपलं विष व दुर्गंध घेऊन ते समुद्रात मिळते. पण तत्पूर्वी ते गोसीखुर्द प्रकल्पात बराच काळ तुंबून राहाते. त्या कालावधीत मध्यप्रदेशातून येणारं वैनगंगेचं तुलनेनी शुद्ध व स्वच्छ पाणी गोसीखुर्दमधे दूषित होते. अशा प्रकारे संपूर्ण गोसीखुर्द प्रकल्पाचं पाणी विषारी होत चाललेलं आहे. त्या धरणावर उभं राहिलं तर नागपूरच्या दुर्गंधीचा सुपरिचित वास तेथे येतो आणि मन खिन्न होते.
इथेच संपूर्ण गोष्ट संपत नाही. आता गोसीखुर्दमधे साठलेलं दूषित पाणी आपण सिंचनासाठी वापरतो. पुढेही वापर वाढल्यावर संपूर्ण लाभक्षेत्रात प्रवाहित होईल. मग काय होईल? आजच गोसीखुर्दच्या कालव्यात वाहणारे पाणी काळे पडलेले दिसते. त्याचे प्रमाण, प्रभाव व परिणाम काही दिवसांनी आणखी तीव्रपणे जाणवायला लागतील. आज कालव्याची जी कामे चालू आहेत, त्यातून कालांतराने हे दूषित काळे पाणी प्रवाहित होईल. हे पाणी कालव्यांच्या वितरण व्यवस्थेतून शेताशेतात पोचेल आणि मग नागपूरची विषारी दुर्गंधी फक्त धरणाच्या जलाशयापुरती मर्यादित न राहाता त्या सर्व भागांत पोचेल; आणि ज्यांनी कोणी गोसीखुर्द राष्ट्रीय प्रकल्प हा विदर्भाची आर्थिक स्थिती सुधारेल याचा आशावाद केला असेल, त्यांना येईल. याबाबत आपण त्वरित जागृत होणे गरजेचे आहे.
ज्या भागात गोसीखुर्दचे पाणी मिळणार आहे त्या चंद्रपूर, भंडारा जिल्ह्यांच्या भागात आजही उच्चप्रतीचा तांदूळ पिकवला जातो. तिथला तांदूळ नागपुरातच नाही, तर संपूर्ण भारतभर विकला-वापरला जातो. चिन्नोर आणि एचएमटी या तांदळाने तर प्रत्येकाच्या जेवणाची सांगता होत आहे. पण पुढे हा तांदूळ नागपूरने विषारी केलेल्या पाण्यावर वाढेल. त्यात तांदळाचे उत्पादन कमी होईल; आणि तो दर्जाही राहाणार नाही. आपल्याला तोच तांदूळ भविष्यात खायला मिळणार आहे किंवा आपण खाणार आहोत. आपण नाही तर आपली पुढची पिढी खाणारच आहे. दूषित पाण्याच्याच तांदळाची चव ते चाखणार आहेत. पण या पाण्यासोबत तांदळाच्या दूषणालाही आपली पिढी जबाबदार आहे, याची आपल्याला जाणीव आहे काय?
जलजागृती सप्ताहाच्या निमित्ताने शासनाने पाण्याच्या बचतीचे महत्त्व पटवून देण्याबाबतचा हाती घेतलेला वार्षिक उपक्रम स्तुत्य आहे. पण त्यासोबतच पाण्याचा दर्जा राखण्याबाबत जागृती होणे आवश्यक आहे. आपण आज पाण्यात जे विष प्रवाहित करतो आहे, याचे दूरगामी परिणाम काय होऊ शकतात याबाबत केवळ नियोजन करणार्‍या शासनानेच गांभीर्य दाखवून कार्यवाहीची अपेक्षा करणे पुरेसे नाही, तर त्याचा वापर करणार्‍या प्रत्येकाने याचा क्षणभर विचार करून त्याबाबत संवेदनशील होणे गरजेचे आहे. त्या पाण्याचा दर्जा राखण्याबाबत जागरूक होणे तेवढेच जबाबदारीचे आहे. आपण पाण्याची बचत करणे फार फार महत्त्वाचे आहे. कारण त्यामुळेच किमान पाण्याचे प्रदूषण कमी करण्यातही आपला हातभार लागला, याचे समाधान होणार आहे; आणि ही शहरात राहणार्‍या प्रत्येक नागरिकाची त्यांच्याकरिता धान्य उत्पादन करणार्‍या शेतकर्‍याप्रति नैतिक जबाबदारी आहे. नव्हे तर त्याच्या दर्जाची, गुणवत्तेची जागृती होणे ही काळाची गरज आहे. तीच खरी जलजागृती ठरेल.
आशीष देवगडे,नागपूर