अविवेकाची काजळी दूर सारू या…

0
157

अध्यात्म

संत, तत्त्वज्ञ व कवी अशा एकत्वाने आम्हावर अमृतवर्षा करणार्‍या श्री ज्ञानेश्‍वर माउलींच्या अभंगरचना लताजींच्या स्वरात सकाळी रेडिओवर ऐकू येतात …रुणुझुणु रुणुझुणु रे भ्रमरा, सांडी तू अवगुणु रे भ्रमरा…. अवचिता परिमळू झुळुकला अळुमाळू, मी म्हणे गोपाळू आला गे माये…! किंवा विश्‍वाचे आर्त माझ्या मनी प्रकाशले …अवघेची झाले देह ब्रह्म…! श्री ज्ञानेश्‍वरांचे ज्ञानरूप शब्दब्रह्म व लताजींचे सुमधुर स्वरब्रह्म यांच्या भक्तिसुगंधलहरी एकत्वाने आसमंतात दरवळत असतात. सात्त्विक भाव नकळतच आपल्या चित्तात हळूहळू प्रवेश करीत जातो… आपणही लताजींसह गुणगुणत असतो… विश्‍वाचे आर्त माझ्या मनी प्रकाशले… अवघेची झाले देह ब्रह्म …पण या रचनांमध्ये किती गूढ अर्थ भरला आहे हे आपल्या ध्यानात येत नाही. किंबहुना आपण प्रयत्न सुद्धा करीत नाही…! थोडे चिंतन करण्यास काय हरकत आहे? अभंग खालीलप्रमाणे…
‘विश्‍वाचे आर्त माझ्या मनी प्रकाशले!
अवघेची जाले देह ब्रह्म!
आवडीचे वालभ माझेनी कोंदाटले!
नवल देखिले नभाकार गे माये!
रखुमादेवी वरू सहज निटू जाला!
हृदयी नीटावला ब्रह्माकारे!’
श्रीहरीप्रति भक्तीची चरमसीमा गाठून उन्मनी अवस्थेतील स्वानुभव श्री माउली तुम्हा आम्हास सांगत आहेत.
अवघ्या विश्‍वातील जीवात्मे, तसेच जे भगवंताच्या भेटीसाठी नाना प्रयत्ने आतुर आहेत, त्यांच्या हृदयातील करुणा, आर्तता माझ्या हृदयास प्रकर्षाने जाणवते आहे; आणि म्हणूनच की काय, जो स्वयंभू, अजर, अमर परमात्मा ज्या दिव्य चैतन्यप्रकाशाद्वारे सर्व जीवात्म्यात विद्यमान आहे, अवघे विश्‍व व्यापून आहे, तेच दिव्य चैतन्य ‘माझ्या मनी प्रकाशले’, दिव्यत्वाने उजळले, भगवंताने व्यापलेले हे विश्‍व जणू काही मीच झालो! आणि ‘अवघेची जाले देह ब्रह्म, मी पण नाहीसे झाले, देहभाव लयास गेला, श्रीहरीच्या दिव्य चैतन्याने अवघा देह अंतर्बाह्य व्यापून गेला…’ अर्थात अवघेची झाले देह ब्रह्म! भगवंताप्रती सर्वांना वाटत असलेल्या प्रगाढ भक्तिप्रेमाने माझेच मन भरून गेले, जणू काही ते प्रेमही मीच झालो! …विश्‍वातील असंख्य विविधाकार जीव विशाल नभाकार दिसू लागले …जणू अनेक आकाशेच! भगवंताचे हे विस्मयकारी, अद्भुत दर्शन माझ्या हृदयी रुजुतेने उमटले!
श्री माउलींची ही परमोच्च आत्मपरमात्म सुखदायी अवस्था आम्ही गाठू शकण्यास असमर्थ आहोत… पण शांत मनबुद्धीने चिंतनाद्वारे जाणून घ्यायचा प्रयत्न केला, तर देहातील अवघी तत्त्वे अगम्य सुखाने सुखावतात… जर कधी या रचना कानी पडल्या तर ‘अवघेची जाले देह ब्रह्म.’ अशी अद्वैत स्थिती नेमकी साकारणारे शब्दब्रह्म… अर्थात, लताजींचा स्वर नेत्र मिटून शांतपणे कानी साठवत ऐकत राहावे… मनबुद्धी आनंदतील! …माउलींचा हा दिव्य स्वानुभव उजागर करणारे शब्दब्रह्म नेमक्या यथार्थतेने लताजींनी स्वरातून व्यक्त केले आहे, रचनांना चपखल चाली देणार्‍या पं. हृदयनाथांचाही उल्लेख येथे आवर्जून करावाच लागेल. एवढ्या उत्तम चालींना अन्य पर्याय असूच शकत नाही. श्री ज्ञानेश्‍वरांच्या अलौकिक वाङ्‌मयाचे त्यांनी केलेले सखोल अध्ययन, मनन, चिंतन, यांचीच ही अवीट गोडीची फलश्रुती आहे! श्री ज्ञानेश्‍वरांनी या दिव्य अनुभवात्मक रचना सातशे वर्षांपूर्वी रचल्या …कधी कधी असं वाटून जातं की श्री ज्ञानेश्‍वरांच्या या अनुपम रचनांना उचित न्याय देणारी ‘स्वर सरस्वती’ निर्माण करण्यासाठी भगवंताला सात शतके थांबावं लागलं?…हे आश्‍चर्य नव्हे काय?
श्री ज्ञानेश्‍वर माउलींच्या वरील दिव्य अनुभवाचा स्वानंद चाखत आणखी एका रचनेत जीव गुंतवून बघू या…!
श्री माउली म्हणतात, ‘देहाचेनि दीपके जंव जंव पाहे सभोवते, तंव अवचिते ध्यान केले, निराकार वस्तू आकारा आणिली, कृष्णी कृष्ण केली सकळ सृष्टी, लय गेले ध्यानी ध्यान गेले उन्मनी.’
ब्रह्म मुहूर्तावर इंद्रायणी काठी श्री माउलींकडून घडलेली भगवंताची ध्यानसाधना. लोपलेले मी पण, इंद्रियभावांचा निरास झालेला, देहबुद्धी स्थिरतेने आत्मबुद्धीत परिवर्तित झालेली, अज्ञानमायेचा अंधकार मावळलेला… आत्मा प्रकाशरूप झालेला… जणू आत्म्याने दीपकाचेच रूप धारण केलेले, नव्हे आत्मज्योत धारण केलेला तो एक दीपकच …ज्याच्या मंगलमय ज्ञानप्रकाशात चहूकडे दृष्टी फिरवावी तर सभोवतालचा परिसरच नव्हे तर दशदिशासुद्धा मंगल दीपकांनी उजळलेल्या …खाली, वर, चोहीकडे वावरणार्‍या असंख्य जिवांची शरीरे म्हणजे जणू आत्मज्योतीने उजळलेले दीपकच… इंद्रायणीच्या जलप्रवाहात सुद्धा तरंगते, सळसळणारे असंख्य दीपकच दीपक, श्रीकृष्णाच्या सगुणध्यान चिंतनाने तर सारी सृष्टीच सच्चिदानंद कृष्णमय झालेली, आतापर्यंत आकारात लोपलेली तेजोमय, ज्ञानमय निराकार वस्तू आता मात्र आता पुन्हा आकारात प्रकट झालेली… सगळीकडे देहरूपी मंगलप्रकाशी दीपकच दीपक… आणि मनाने कुठेही भ्रमण करावे तरी सगळीकडे कृष्णच कृष्ण… सर्व दीपकामध्येही कृष्ण ‘हरी दिसे जनी वनी आत्मतत्त्वी…’ अद्भुत अद्वैत! या सृष्टीत, ब्रह्मांडात जर एकच दिव्य प्रकाशमय वस्तू पूर्णत्वाने भरून राहिलेली असेल तर बिचारे मन तरी काय करील? त्याने ध्यान करावे तरी तोच… ध्यानातून बाहेर यावे तरी तोच, सभोवताल बघावे तरी तोच झळकतोय्, अगदी ‘भरला घनदाट हरी दिसे’…! …श्री माउलींचा असा दिव्य स्वानुभव आम्हास बोध करवून देतो की, केवळ सभोवतालच्या सृष्टीतच नव्हे तर असंख्य जिवांमधून… तुमच्या आमच्यातून, श्रीहरीच दिव्यत्वाने प्रकाशतो आहे, त्याचीच एकमेव अद्भुत सत्ता लीला करते आहे… सर्वच संत सज्जन अशी मंगलमय दीपावली अंतःकरणात सदैव अनुभवत असतात व तुमचे आमचे अज्ञानमायेच्या अंधकारात झाकोळलेले जीवन उजळून निघावे, म्हणून मंगलमय ज्ञानप्रकाश अखंड उजळत असतात!
श्री ज्ञानेश्‍वर माउलींनी योगेश्‍वर भगवान श्रीकृष्णांच्या वचनाच्या माध्यमातून साधक, मुमुक्षू, भक्तांना आश्‍वस्त केले आहे!
श्री ज्ञानेश्‍वरीमध्ये माउली म्हणतात ‘मी अविवेकाची काजळी फेडूनी विवेकदीप उजळी तै योगिया पाहे दिवाळी निरंतर’….. मात्र, ही अविवेकाची काजळी पुसून टाकण्यासाठी आम्ही दृढसंकल्पी असणे आवश्यक नव्हे काय?
विजय बावडेकर,९७६६४६२७४७