साप्ताहिक राशिभविष्य

0
641

रविवार, १९ ते २५ मार्च २०१७
सप्ताह विशेष
•सोमवार, २० मार्च- कालाष्टमी, सरस्वतीदास महाराज पुण्यतिथी- परसोडा (वर्धा), मेषायन१५.५८, विषुवदिन; •मंगळवार, २१ मार्च- शुक्राचा पश्‍चिमेस अस्त; •बुधवार, २२ मार्च- सौर चैत्रारंभ, भारतीय चैत्र मासारंभ;
•गुरुवार, २३ मार्च- जागतिक हवामान दिन; •शुक्रवार, २४ मार्च– पापमोचनी एकादशी, संत नामदेव महाराज यात्रा- नरसी नामदेव (हिंगोली); •शनिवार, २५ मार्च- शनिप्रदोष, महावारुणी योग.
संक्षिप्त मुहूर्त- साखरपुडा- २४ मार्च; बारसे- २३ मार्च (दुपारी १.२४ नंतर); जावळे- २४ मार्च; गृहप्रवेश- २४ मार्च.

मेष : प्रकृती सांभाळा
या आठवड्यात आपला राशिस्वामी मंगळ राशिस्थानातच आहे. याशिवाय षष्ठात गुरू, व्ययस्थानात रवि-बुध-शुक्र, भाग्यात शनी, पंचमात राहू तर लाभात केतू आहे. चंद्र अष्टम स्थानातून भ्रमण सुरू करीत आठवडाअखेर लाभ स्थानात येईल. हा आठवडा आपणास सामान्य जाण्याचे संकेत आहेत. कामात सफलतेसाठी जरा अधिक मेहनत घ्यावी लागेल. विशेषतः सरकारी कामात विलंब लागू शकतो, परंतु धीर न सोडता आपले प्रयत्न सुरू ठेवल्यास अंतिमतः यश आपल्याच पदरी पडणार आहे. अष्टमातून चंद्राची सुरुवात प्रकृतीविषयक काही कुरबुरीची सूचना देत आहे. त्यामुळे पथ्यपाणी व्यवस्थित सांभाळून प्रकृतीची काळजी घेतली पाहिजे. शुभ दिनांक- २१,२२,२५.
वृषभ : समाधानकारक यश
या आठवड्यात आपला राशिस्वामी शुक्र वक्री स्थितीत लाभ स्थानात रवि, बुध व हर्शलसोबत आहे. शुक्र या आठवड्यात अस्तंगत होऊन अखेरीस उदितही होणार आहे. मंगळ व्ययात, शनी अष्टमात आहे. चंद्र सप्तमातून भ्रमण सुरू करीत आठवडाअखेर दशम स्थानात जाईल. आठवड्याच्या सुरुवातीला लाभस्थानी झालेली ग्रहांची जमघट आर्थिक लाभास उपलब्ध होणार्‍या अनेक वाटा दर्शविणारी आहे. याशिवाय आपल्या विविध कामात समाधानकारक यश मिळून काही विधायक कामे हातून घडू शकतील. कुटुंबात समाधानाचे व सहकार्याचे वातावरण राहील. एखादी मोठी खरेदी, जमिनीचे व्यवहारही संभवतात. एकंदरीत हा आठवडा व्यावसायिक व आर्थिकदृष्ट्या उत्तम ठरू शकतो.
शुभ दिनांक- १९,२३,२४.
मिथून : खर्चवाढ संभव
या आठवड्यात आपला राशिस्वामी बुध दशमस्थानी रवि व शुक्रासोबत आहे. याशिवाय शनी सप्तमात, मंगळ लाभात, गुरू सुखस्थानात, राहू पराक्रमात तर केतू भाग्यात आहे. चंद्र सहाव्या स्थानातून भ्रमण सुरू करीत आठवडाअखेर आपल्या भाग्य स्थानात जाईल. अस्तंगत बुधामुळे निर्माण झालेली अस्वस्थता, नैराश्य, कार्यालयीन कामातील दगदग आदी स्थिती आता बदलणार आहे. धीम्या गतीने का होईना पावले सकारात्मकतेच्या दिशेने पडणार आहेत. आर्थिकदृष्ट्या पाहता हा आठवडा काहीसा अधिक खर्च करायला लावू शकतो, मात्र तो आपणास त्याचा आनंदही देईल. खर्च व्यर्थ जाणार नाही. एखादे वाहन किंवा स्थावरसंबंधी व्यवहार होऊ शकतात. शुभ दिनांक- २०,२१,२२.
कर्क : सावधगिरी बाळगा
आपला राशिस्वामी चंद्र या आठवड्यात पंचम स्थानातून भ्रमण सुरू करीत असून, तो अखेरीस अष्टम स्थानात जाईल. याशिवाय राहू धनस्थानात, पराक्रमात गुरू, शनी षष्ठात, भाग्यात रवि, बुध व शुक्र, दशमात मंगळ आणि अष्टमात केतू आहे. या आठवड्यात आपणास कोणतेही मोठे निर्णय घेताना पुरेपूर सावधगिरी बाळगायला हवी. आर्थिक फसवणूक, दिशाभूल करण्याचे प्रयत्न होतील, त्यांना बळी पडू नका. कोणावरही विशेषतः आर्थिक व्यवहारात विसंबून राहणे, विश्‍वास टाकणे धोक्याचे राहील. व्यवसायात असलेल्या या राशीच्या मंडळींनी जरा जपून पावले उचलावीत. काही नवे उपक्रम हाती घेणार असाल तर काही दिवस थांबा. कुटुंबात काहीसे चढउताराचे वातावरण राहील. शुभ दिनांक- १९,२३,२४.
सिंह : संघर्षमय आठवडा
या आठवड्यात आपला राशिस्वामी रवि अष्टम स्थानात बुध व शुक्रासोबत आहे. याशिवाय राशिस्थानी राहू, धनात गुरू, पंचमात शनी, भाग्यात मंगळ व सप्तम स्थानात केतू आहे. चंद्र चतुर्थ स्थानातून भ्रमण सुरू करीत असून आठवडाअखेर सप्तम स्थानात जाईल. हा आठवडा काहीसा संघर्षमय जाण्याची शक्यता आहे. लहानशा कामातही यशासाठी बराच प्रयत्न करावा लागू शकतो. कामेही विलंबाने पूर्णत्वास जातील. या काळात खरे तर आपणास स्वतःकडे लक्ष देण्याची गरज आहे. प्रकृतीची काळजी घ्यावी. पोटाचे त्रास, स्पॉन्डिलायटिसचा त्रास असणार्‍यांनी काळजी घ्यावी. दिनचर्या सुधारून स्वास्थ्य राखता येऊ शकेल. आर्थिक आघाडीवर सतर्क राहणे जरूरी आहे.
शुभ दिनांक- २१,२३,२५.
कन्या : उत्तरार्धात मनस्ताप
या आठवड्यात आपला राशिस्वामी बुध सप्तमस्थानी रवि, शुक्र व हर्शलसोबत आहे तर आपल्या राशीत गुरू आहे. याशिवाय शनी सुखस्थानात, मंगळ अष्टमात, व्ययात राहू तर षष्ठात केतू आहे. चंद्र पराक्रम स्थानातून भ्रमण सुरू करीत आठवडाअखेर षष्ठ स्थानात जाईल. या आठवड्याचा पूर्वार्ध आपणास उत्तम जाणार आहे. त्या तुलनेने उत्तरार्धात मात्र आपणास काही त्रास, मनस्ताप यांचा सामना करावा लागू शकतो. आपणास काही अचानक लाभ होण्याची शक्यता आहे. विशेषतः नोकरीत असणार्‍यांना चांगले इन्सेटिव्ह, वाढ मिळू शकतात. व्यवसायात नवे उपक्रम सुरू करता येतील. नव्या व्यवसायात किंवा नव्या क्षेत्रात पदार्पण करता येऊ शकेल. आर्थिक घडी अधिक मजबूत होईल. शुभ दिनांक- १९,२२,२५.
तूळ : प्रलोभन टाळा
या आठवड्यात राशिस्वामी शुक्र षष्ठात रवि आणि बुधासोबत आहे. तो सध्या वक्री असून या आठवड्यात काही काळ अस्तंगत राहणार आहे. मंगळ सप्तमात, शनी पराक्रमात व गुरू व्ययात आहे. चंद्र धन स्थानातून भ्रमण सुरू करीत आठवडाअखेर पंचम स्थानात येईल. हा आठवडा आपणास प्रामुख्याने सकारात्मक आणि हाती घेतलेल्या कार्यात यश देणारा ठरावा. नोकरी-व्यवसायासाठी हा काळ अतिशय उत्तम असणार आहे. निश्‍चित योजना आखून व्यावसायिक पावले उचलली तर ती भरपूर फायदा करून देऊ शकतील. मात्र कोणतेही कार्य दुसर्‍या कुणाच्या दबावाखाली येऊन वा कोणत्याही प्रलोभनाला बळी पडून हाती घेऊ नये. कुटुंबात आनंदाचे आणि समाधानाचे वातावरण राहील. शुभ दिनांक- १९,२०,२५.
वृश्‍चिक : परिस्थितीशी झुंज
या आठवड्यात राशिस्वामी मंगळ षष्ठात आहे. याशिवाय शनी धनस्थानी, गुरू लाभात, रवी, बुध आणि शुक्र पंचमात, राहू दशम तर केतू सुखस्थानी आहे. चंद्र आपल्या राशी स्थानातूनच भ्रमण सुरू करीत आठवडाअखेर तो सुखस्थानी येणार आहे. या आठवड्यात परिस्थितीशी काहीसे झुंजतच मार्ग काढावा लागणार आहे. दगदग व धावपळ वाढेल. गुप्त शत्रूंच्या कारवाया नोकरी व व्यवसायात आपल्या मार्गात अडचणी निर्माण करू शकतात. प्रतिष्ठा टिकवून ठेवण्यासाठी मेहनत करावी लागेल. आर्थिक अंदाजपत्रक बिघडू शकते. आवक अडलेली वा मंदावलेली राहील. काही आकस्मिक खर्चदेखील मनस्ताप देतील. अतिव्यस्ततेमुळे प्रकृतीकडे दुर्लक्ष होऊ नये.
शुभ दिनांक- १९,२०,२१.
धनू : दोलायमान स्थिती
या आठवड्यात राशिस्वामी गुरू दशमात असून शनी राशिस्थानात आहे. मंगळ पंचमात तर रवि, बुध व शुक्र सुखस्थानात, राहू भाग्यात तर केतू पराक्रमात आहे. चंद्र व्ययस्थानातून भ्रमण सुरू करणार असून, आठवडाअखेर पराक्रम स्थानात जाणार आहे. या आठवड्याच्या सुरुवातीची ग्रहस्थिती आपल्या मानसिक स्वास्थ्यासाठी फारशी चांगली नाही. अतिशय व्यग्रता, काही महत्त्वाच्या निर्णयाच्या प्रसंगी दोलायमान स्थिती, एखाद्याच्या सांगण्यावरून विचार न करता भूमिका ठरवणे वगैरे घडू शकते. कोणताही महत्त्वाचा निर्णय घेताना ज्येष्ठांचा सल्ला घेणे फायद्याचे ठरेल. नोकरी-व्यवसायात संमिश्र वातावरण राहील. आर्थिक चढ-उताराची स्थिती राहील. कुटुंबातही तणाव जाणवेल. शुभ दिनांक- २०,२१,२२.
मकर : आर्थिक स्वस्थता
या आठवड्यात राशिस्वामी शनी व्ययस्थानात आहे. याशिवाय रवि, बुध व शुक्र पराक्रमात व मंगळ सुखस्थानात, गुरू भाग्यात, राहू अष्टमात तर केतू धनात आहे. चंद्र लाभस्थानातून भ्रमण सुरू करीत आठवडाअखेर धनस्थानी जाणार आहे. हा आठवडा काहीसा आपली परीक्षा पाहणार आहे. कामांमध्ये अडचणी, कामे पूर्णत्वास न जाणे, ऐनवेळेवर काम फिसकटून पदरी अपयश पडणे असे घडू शकते. त्यामुळे काही व्यावहारिक व धोरणात्मक भूमिका अंगीकारणे लाभदायक ठरेल. आर्थिक आघाडीवर स्वस्थता राहील. स्थावर संपत्ती खरेदी वा विकण्याची योजना असेल. काही वाहन खरेदीच्या प्रयत्नात असू शकतात. आर्थिक व्यवहार करताना लगबग वा बेफिकिरी असू नये.
शुभ दिनांक- २३,२४,२५.
कुंभ : प्रगतीकारक योग
या आठवड्यात राशिस्वामी शनी लाभस्थानात असून राशीत केतू आहे. याशिवाय राहू सप्तमात, गुरू अष्टमात, रवि, बुध व शुक्र धनस्थानात व मंगळ पराक्रमात आहे. चंद्र दशम स्थानातून भ्रमण सुरू करीत असून, आठवडाअखेर तो आपल्या राशिस्थानी जाईल. हा आठवडा काही सुखवर्धक व प्रगतीकारक योग निर्माण करणारा आहे. सामाजिक व राजकीय आघाडीवर आपली विशेष प्रतिमा निर्माण होऊ शकते. आपल्या कार्याची योग्य दखल घेतली जाईल. त्याचे कौतुक होईल. महत्त्वाची कामे करताना त्यात पुरेसे लक्ष घालून ती स्वतःच्या निगराणीखालीच पूर्णत्वास न्यावी. छुपे शत्रू कोणत्या क्षणी दगा देतील याचा नेम नाही. आर्थिक आघाडीवरील अडचणी दूर होऊ लागतील. शुभ दिनांक- २०,२१,२५.
मीन : नरम-गरम वातावरण
या आठवड्यात राशिस्वामी गुरू सप्तम स्थानात असून राशिस्थानात शुक्र, रवि, बुध व हर्शल आहेत. याशिवाय धनस्थानात मंगळ, षष्ठात राहू, दशमात शनी, तर व्ययात केतू आहे. चंद्र भाग्यस्थानातून भ्रमण सुरू करीत आठवड्याच्या शेवटी व्ययस्थानात जाणार आहे. हा आठवडा काहीसा संमिश्र जाण्याची शक्यता आहे. महत्त्वाची कामे पूर्णत्वास नेण्यासाठी मेहनत घ्यावी लागेल. सामाजिक व राजकीय आघाडीवर काम करताना प्रतिष्ठेला धक्का बसणार नाही याची खबरदारी घ्या. आर्थिक आघाडीवर धीम्या गतीने सुधाराचे योग आहेत. काहींना वाहन-स्थावर खरेदीचे योग संभवतात. नोकरी व व्यवसायात जरा नरम-गरम वातावरण राहील. सहकार्‍यांशी वादविवाद होणार नाही याची काळजी घ्या. शुभ दिनांक- १९,२१,२३.
• मिलिंद माधव ठेंगडी (ज्योतिषशास्त्री)/ ८६००१०५७४६