यू टर्न २

कौटुंबिक व सामाजिक प्रश्‍नाला अभियानाचे स्वरूप देणारा

0
164

रंगभूमीवरून…

इतिहास
मराठी रंगभूमीवर उत्तमोत्तम व एकापेक्षा एक सरस अशा नाटककारांची परंपरा कायम राहिली आहे. नाटककारांची समाजाशी कायम जुळून राहण्याची प्रवृत्ती, त्यानुरूप लेखन, त्यातून आशयघन विषयाची मांडणी, शब्दसामर्थ्य, कलाकारांचा सकस व हृदयस्पर्शी अभिनय यामुळेच समाजाला संवेदनशील विचार व संस्कार दिल्याची उदाहरणे अनेक आहेत. मराठी नाटकांना नित्यनियमाने उपस्थित राहणारा प्रेक्षक निव्वळ मनोरंजनाची अपेक्षा न बाळगता, आज काहीतरी शिकायला मिळणार, या विद्यार्थिभावनेतूनच आपली उपस्थिती नोंदवत असतो. १७ डिसेंबर २००८ रोजी ‘यू टर्न’ या नाटकाचा शुभारंभ झाला. अगदी पहिल्याच प्रयोगापासून प्रेक्षकांच्या मनावर पकड घेत त्यांना नाट्यगृहाकडे ‘यू टर्न’ घेण्यास भाग पाडले व लोकप्रियतेचा कळसच गाठला, हा इतिहास होय!
पार्श्‍वभूमी
पात्र : १– रिटायर्ड मेजर सुधीर वैद्य, मुंबई, घटस्फोटित, आर्मीतील कडक शिस्तीचा भोक्ता. मुलगी मधु, बंगलोरला स्थायिक, संसारात रमलेली. हे एकटेपणाला कंटाळून एखाद्या कम्पेनियनच्या शोधात, वर्तमानपत्रात तशी जाहिरातही दिलेली आहे.
पात्र : २ – रमा गोखले – पुणे – वय वर्षे ५४, विधवा, गृहिणी, तिचा मुलगा साहिल, अमेरिकेत स्थायिक. या दोघांच्याही मुलांना त्यांची काळजी वाटतच असते आणि अशातच या दोघांची अचानक भेट होते. या दोघांनाही ही भेट तशी अप्रिय व नकोशीच असते, पण नाइलाज असल्याने त्यांच्यात संवाद घडत जातात. खरंतर दोघांचेही स्वभाव तसे भिन्नच असतात तरीही सूर जुळायला लागतात, त्यांची मैत्री आकारतानाच एकमेकांचे कम्पेनियन बनतात व एकटेपणा संपून एकत्र ‘एक दुजे के लिये’चा प्रवास सुरू होतो. आपल्या एकटेपणाची काळजी असलेली आपली मुले आपल्या दोघांचं हे नवीन नातं आनंदाने स्वीकारतील ही त्यांची अटकळ खोटी ठरते. कारण मुलं दुरावतात व दोघांनाही दुखावतात. दोघेही आपला अपमान, हार गप गिळून एकमेकांपासून लपवून ठेवतात, पण शेवटी सत्य उघडं होतंच, लपून राहात नाही. आता आयुष्याच्या या वळणावर, आपल्याला समजून न घेणार्‍या मुलांसाठी एकट्यानेच प्रवास करायचा, असा विचार करून रमा गोखले पुण्याला परतात आणि या दोघांची ताटातूट होते.
कथासार
पुण्याला परतल्यानंतर मेजरच्या आठवणीशिवाय एकही दिवस जात नसल्याने रमाबाई वाचन व कविता यामध्ये आपलं मन रमवतात. एकट्याच राहात असल्याने सोसायटीतील लोकांची त्यांच्या हालचालीवर बारीक नजर असतेच. एक दिवस त्यांच्या फ्लॅटची बेल वाजते आणि दरवाजा उघडल्यावर अचानक, साक्षात मेजरला समोर अवतरलेला बघून त्यांची त्रेधातिरपट/धांदल उडते. काय करू आणि काय नाही अशीच ही अवस्था! मिलिटरी हॉस्पिटलमध्ये रुटीन चेकअप करून आलेले मेजर सहज म्हणूनच भेटायला आलेले असतात. मग काय, गप्पांचा फड जमतो आणि आडून एकमेकांची चौकशीही सुरू असते. थोडक्यात काय, तर दोघांचाही जीव एकमेकांत गुंतलेला असल्याने आपल्याविना दुसर्‍याचं आयुष्य कसं चाललं आहे, हे जाणून घ्यायचा हा एक केविलवाणा प्रयत्न असतो. कारण मध्यंतरीच्या काळात त्यांनी एकमेकांना साधा फोनदेखील केलेला नसतो. गप्पा सुरू असतानाच मेजरच्या एका मित्राचा फोन येऊन तो एका मित्राच्या मुलाला युद्धात वीरमरण आल्याची बातमी देतो. आपल्याच सल्ल्यानुसार मित्राने मुलाला मिलिटरीत पाठवले आणि त्याचाच मृत्यू झाला, आपणच त्याला जबाबदार असल्याची भावना असल्याने हा धक्का मेजर पचवू शकत नाही आणि त्यांना हृदयविकाराचा झटका येतो. मग रीतसर ऍन्जिओप्लास्टी झाल्यानंतर मेजरला रमाबाई आपल्याच घरी घेऊन येतात व एखाद्या पत्नीप्रमाणे त्यांची सेवा करतात. या दरम्यानच्या काळात मेजरची मुलगी मधु व रमाबाईंचा मुलगा साहिल रमाबाईंच्या संपर्कात राहून मेजरच्या प्रकृतीची चौकशी करत असतात व त्यांना ‘या दोघांच्या अनामी संबंधाबद्दल’ आता तसा काही आक्षेपही उरलेला नसतो. एकुणात, सर्वकाही सकारात्मक व आलबेल असतं. परंतु, या ‘सोसायटीतील मंडळी व पुण्यातील संस्कृतिरक्षक सदस्य’ यांना ‘या अनामी संबंधाबद्दल’ त्रास द्यायला सुरुवात करतात. मेजर या सगळ्या परिस्थितीला सामोरे जायला सक्षम असतात, परंतु केवळ रमाबाईंच्या विनंतीवरून शांत बसलेले असतात. एकीकडे विरोधाचा जोर वाढत असताना या दोघांचे संबंध दृढ होत एकमेकांबरोबर राहण्याचा निर्धारही ठाम होत जातो. विरोधाने परिसीमा गाठल्यावर मेजर रमाबाईंच्या साथीने विरोधकांचा सामना करण्यासाठी ‘एक अभियान’ सुरू करतात आणि पुण्यासाहित संपूर्ण महाराष्ट्रातून त्यांना भरघोस पाठिंबा लाभतो व त्यांना ‘सेलेब्रिटी’चा सन्मान मिळतो, मित्रमैत्रिणी, नातेवाईक व यांची मुले त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव करतात. यानंतर प्रत्यक्षात काय घडते हे रंगमंचावर बघणेच इष्ट!
सादरीकरण व नाट्यानुभव
अशा या पार्श्‍वभूमीचं निरुपण सचिन खेडेकरांच्या आवाजात नाटकाच्या सुरुवातीलाच होत असल्याने आपसूकच प्रेक्षकांच्या मनाची तयारी होते व अपेक्षित नाट्य अनुभवयास मिळणार, याचा आनंद त्यांच्या मनाला होतो. नाटककार आनंद म्हसवेकर हे एक उत्तम लेखक तर आहेतच शिवाय हुशारही आहेत. त्यांच्या मनात हा विषय फिट्ट बसला असल्याने व त्यांनीच या विषयाचा प्रेक्षकवर्ग तयार करून ६०० च्यावर प्रयोग केल्याने त्यांना प्रेक्षकांचीही नस बरोबर माहिती झालेली आहे. संहितेला याआधीच संपूर्ण न्याय देऊन स्वत:च दिग्दर्शन केल्याने एकुणात नाटकाचं कथानक, यातील पात्र याचा विचार करून कलाकारांची केलेली योग्य निवड यातच अर्धी लढाई जिंकलेली होती. या नाटकाला तसं कथानकच नाही. परंतु, कथानकापेक्षाही यातील ‘भूमिका’ प्रेक्षकांना खूपच भावतात व आकर्षित करतात की प्रेक्षक अक्षरश: गदगदून जातात, कदाचित हेच लेखक आनंद म्हसवेकर यांना अपेक्षित असावे! डॉ. गिरीश ओक व इला भाटे या दोघांच्या अभिनयाला पुनश्‍च सलाम. कदाचित स्वत:चंच घर किंवा वर्षभराचा सहवास यामुळे रमा गोखले खूपच मोकळ्या वावरताना व व्यक्त होताना दिसतात व दिग्दर्शकानेही या भागात रमाबाईंच्या सगळ्या भावभावनांना मुक्त वाट करून दिलेली आहे आणि माध्यम मुख्यत: रमा गोखले हेच ठेवलं असल्याने त्यात भावुकता स्पष्ट करता येते. सुधीर वैद्यच्या बाबतीत एवढचं म्हणता येईल की, ‘शब्दावाचून कळले सारे शब्दांच्या पलीकडले!’ या दोघांमधील संवाद अक्षरश: तुटक, तेवढ्यापुरतेच, प्रश्‍नोत्तरासारखे. एकमेकांवर अपरंपार प्रेम असूनही त्यांच्या शब्दांमधून एकमेकांबद्दल प्रेम कमी व काळजी जास्त प्रतीत होते. तरीही त्या दोघांनी भावनिक कुचंबणा, अव्यक्त भावना केवळ मुद्राभिनयातून मस्तच प्रदर्शित केल्या आहेत. विशेषत: इला भाटे यांची देहबोली प्रेम+काळजी दोन्ही दर्शवण्यात पूर्णत: यशस्वी होते, तर डॉ. गिरीश ओक मेजर सुधीर वैद्य या पात्राचा बाज सांभाळून व्यक्त होताना मूळ स्वभावाला शोभेल इतपत अंतर ठेवून असतात. मेजरच्या पूर्वायुष्यातील कटु अनुभवातून ‘विवाहसंस्था’ या संकल्पनेचा मनापासून तिरस्कार व पुन्हा त्या मार्गाने न जाण्याच्या भूमिकेवर ठाम असल्याने मेजर बराच अलिप्तपणे साकारला आहे, त्यात प्रेमाचा, भावभावनांचा लवलेशही नाही, तरीही प्रेक्षकांना त्यांच्यातील एक वर्षाच्या सहवासातून बहरलेल्या परिपक्व, काळजीयुक्त जाणार्‍या प्रेमाची अनुभूती मिळते, ही जादू केवळ या दोघांच्या अप्रतिम, साध्या व नैसर्गिक अभिनयाचीच होय. आता हे नाटक कोणत्याही क्षणी ‘मेलोड्रामा’च्या वाटेवर जाईल असं वारंवार केवळ वाटतं, पण दिग्दर्शकबरहुकूम या दोघांनी खुबीने टाळलं आहे. संगीतकार अवधूत गुप्ते, सुरेश वाडकर व देवकी पंडित यांच्या जादूई आवाजातील गाणी सुंदर व चपखल. यातील गाण्यांनी दृक्‌श्राव्य प्रसंगांना जिवंत केलं आहे. अरुण कानविंदे यांचं पार्श्‍वसंगीत प्रसंगानुरूप असल्याने ते प्रसंग अधिक गडद होतात. या नाटकातील इतर पात्रे केवळ आवाजाच्या माध्यमातून आपला सहभाग नोंदवतात, ही कल्पनाच मोठी छान असून ती दिग्दर्शकाला मस्त जमलीय. नेपथ्य, प्रकाश व पार्श्‍वसंगीत फ्रेश वाटतं. व्हिडीओग्राफी या भागात अत्यंत महत्त्वाची भूमिका बजावते.
सत्य परिस्थिती व समाजस्वीकार
ज्येष्ठ नागरिक, विधुर व विधवा यावर नवीन पिढीची मानसिकता हा आजच्या समाजातील गहन परंतु दुर्लक्षित प्रश्‍न आहे. सेवानिवृत्ती व म्हातारपणाचा शाप भोगत असलेल्या कफल्लक आईवडिलांची शोकांतिका आजवर अनेकवेळा दाखवली गेली आहे आणि सहानुभूतिपोटी वाहवापण मिळवली आहे. परंतु, केवळ एकटेपणामुळे यांच्या नशिबी आलेली ही अगतिकता हा सहानुभूतीचा विषय निश्‍चितच नोहे! या माणसांना उत्तम प्रकृतीने, विचारांनी व उमेदीने जगण्याचा अधिकार आहे. स्वत:ला क्रियाशील ठेवून आप्तांसाठी व समाजासाठी काहीतरी विधायक कार्य करण्याची मनीषा बाळगून आहेत. मग त्यांना समजून घेण्याची भूमिका नवीन पिढी का घेत नाही? हाच प्रश्‍न आहे. पार्टनरशिवाय जगण्याची धडपड करणार्‍यांसाठी हे नाटक एक शिकवण निश्‍चितच आहे. स्वत:जवळ पैसाअडका असूनही एकट्याने जीवन जगता येतं का? स्त्री व पुरुष एकत्र राहिले तरच जीवनाचं वर्तुळ पूर्ण होतं का? जुन्या-नव्या पिढीतील अंतर कमी होऊन कधीतरी आपण एकमेकांना समजून घेण्याची भूमिका घेणार का? अशा अनेक अनुत्तरित प्रश्‍नांची उत्तरे या नाटकाच्या माध्यमातून आपल्याला तपासता येतील.
सारांश
या नाटकाची परीणामकारता त्याच्या विषयात वा कथानकात सामावलेली नसून, प्रत्यक्ष साकारणार्‍या छोट्याछोट्या क्षणांमध्ये दडलेली नाट्यमयता, स्फोटकता त्याच्या अचूक वजनानिशी किती उस्फूर्तपणे व्यक्त होऊ शकते त्यात दडलेली आहे. यातील प्रसंगातून, पात्रांच्या परस्परांच्या संघर्षातून निर्माण होणारे ताण, त्यातून उडणार्‍या ठिणग्या, त्या ठिणग्यांतून अवचित उजळणारे आयुष्याचे अंधारे कोपरे प्रेक्षकांना सतत अनुभूती देत राहते. या नाटकाची संहिता जितकी नाट्यपूर्ण विणीची तितकाच या दोन कलाकारांच्या अभिनयातून उभा राहणारा आविष्कार अस्सल आहे. किंबहुना त्याचमुळे उत्तम नाट्यनुभवाच्या प्रतीक्षेत राहणार्‍या प्रेक्षकांसाठी ही एक पर्वणीच होय. पहिल्या भागात दोन कुटुंबांपुरताच असलेला विषय आता सामाजिक प्रश्‍न म्हणून प्रेक्षकांपुढे येतो व त्याचं रूपांतर एक चळवळ व अभियानात करण्यात लेखकाला यश आलं आहे. तरी परंतु ही चळवळ आपल्या खाजगी जीवनातील वा घरातील प्रश्‍न, गुंता व समस्या सोडवण्यात उपयुक्त ठरू शकत नसल्याचं सत्य लेखकाने उघड केलं आहे. शिवाय नाटकातील नाट्यात गुंतलेल्या प्रेक्षकांना अपेक्षित शेवट पुनश्‍च एकवार टाळलेला असल्याने एका सकस संहितेवरील कथानकाचा अपेक्षित रंगाविष्कार व नैसर्गिक शेवट न झाल्याची खंत राहतेच. पहिल्या भागातल्या शेवटाप्रमाणेच हाही शेवट एक प्रश्‍नचिन्ह निर्माण करत असल्याने भविष्यात ‘यू टर्न-३’ येणार याचा अंदाज प्रेक्षकांना आपसूकच लागतो!
एनसी देशपांडे/९४०३४९९६५४