रानभूल

0
143

‘भुलनवेल’ या रहस्यमय वेलीबाबत एका पुस्तकात वाचलेली आणि जंगलभ्रमंतीत काही वनाधिकार्‍यांकडून ऐकलेली महत्त्वपूर्ण बाब म्हणजे ही वेल ओलांडली म्हणजे भूल पडते. दिशेचं ज्ञान नाहीसं होतं. भुलनवेलीतून निघणार्‍या वायूमध्ये नास्थाशियासारखा भूल पाडणारा काहीतरी घटक असावा. म्हणून रानभूल पडत असावी. परंतु, या गोष्टीला कुठलाही शास्त्रीय आधार नाही. मात्र, या दुर्मिळ वेलीच्या संरक्षण आणि संवर्धनाकरिता पूर्वजांनी अशा प्रकारच्या कथाकल्पना रचल्या, त्या जैवविविधतेच्या रक्षणाच्या दृष्टीने हितकारकच आहेत.

जवळपास दहा वर्षांपूर्वीच्या जंगलभ्रमंतीतील गोष्ट. मेळघाटच्या विशिष्ट अरण्यात माझी भटकंती सुरू होती. नभ पाऊसमेघांनी झाकलं होतं. आषाढ महिन्याचा रिमझिम पाऊस सुरू होता. कृष्णमेघांतून पडणार्‍या आषाढधारांनी अंग पूर्णपणे चिंब भिजलं होतं. सारं अरण्य हिरव्या रंगात न्हाऊन निघालं होतं. रानवाटाही चिंब भिजल्या होत्या. रानवाटेच्या डाव्या कडेने काही पावलं पुढे जाताच ज्या रहस्यमय वेलीच्या शोधात मी गेल्या अनेक वर्षांपासून होतो, ती अत्यंत दुर्मिळ वेलवर्गीय वनस्पती नजरेत पडली. ही वेल पूर्णपणे जमिनीवर पसरली होती. तिची पानं खायच्या पानाएवढी, परंतु रुईच्या पानासारखी जाड हिरवट रंगाची असून त्यावर हलकीशी कृष्णछटा पसरली होती. तिच्या शाखा-उपशाखा जमिनीवर दहाही दिशांत विखुरल्या होत्या. सर्वात मोठ्या पानाची लांबी अंदाजे चार इंच, तर रुंदी जवळपास तीन इंच एवढी असून तिचा पसारा अंदाजे एक मीटर व्यासाएवढा पसरलेला होता.
होय. हीच ती वेलवर्गीय रहस्यमय वनस्पती म्हणजे भुलनवेल होय! या वेलीचे इंग्रजी नाव ‘टायलोफ्लोरा रोटँडीफोलियो’ असे आहे.
भुलनवेल या रहस्यमय वेलीबाबत एका पुस्तकात वाचलेली आणि जंगलभ्रमंतीत काही वनाधिकार्‍यांकडून ऐकलेली महत्त्वपूर्ण बाब म्हणजे ही वेल ओलांडली म्हणजे भूल पडते. दिशेचं ज्ञान नाहीसं होतं. ती ओलांडणार्‍याला एक प्रकारची रानभूल होते. ज्या प्रमाणात या वेलीतून निघणारा वायू ओलांडणार्‍याच्या श्‍वासावाटे नाकात जेवढ्या प्रमाणात जातो त्या प्रमाणात भुलीचे प्रमाण असते. एक प्रकारे भुलनवेलीतून निघणार्‍या वायूमध्ये नास्थाशियासारखा भूल पाडणारा काहीतरी घटक असावा. म्हणून रानभूल पडत असावी. परंतु, या गोष्टीला कुठलाही शास्त्रीय आधार नाही. खूप वर्षांच्या शोधानंतर मला दहा वर्षांपूर्वी या वेलीचा शोध लागला. तिच्याजवळ बसून बराच वेळ निरीक्षण केले. भरपूर छायाचित्रं घेतली. मला मात्र कशाचीच भूल पडली नाही.
भुलनवेल ही रुई कुळातील असून तिचे दोन प्रकार आहेत. एक पांढर्‍या फुलांची, तर दुसरी काळ्या फुलांची. मेळघाटात मात्र केवळ पांढर्‍या फुलांची भुलनवेल आहे. या वेलीत काही आयुर्वेदीय औषधीचे गुण आहेत जे अस्थमाच्या आजारावर गुणकारी आहेत, असे काही आयुर्वेदाचार्य सांगतात. ‘प्रभाकर चिकित्सा’ या आयुर्वेद ग्रंथात या वेलीबाबत भ्रम पडण्याचा संभव होतो आणि ४८ तास भटकत राहतो, असा उल्लेख आहे. मुख्य मुळापासून प्रत्येक शाखेला अंदाजे १० ते १२ इंच अंतरावर उपमूळ असते.
प्रल्हाद जाधव लिखित ‘रानभूल’ या पुस्तकातील ‘दिशा उजळताना’ या प्रकरणात वन खात्यातील एका वरिष्ठ अधिकार्‍याने भुलनवेल ओलांडली असता ते दोन दिवस जंगलात भटकले होते, असा उल्लेख आहे. याच लेखात पुढे असेही नमूद केले आहे की, अरण्यव्रती मारुती चितमपल्ली यांनी एकदा या वेलीची छायाचित्रे घेतली होती. पण, रोल धुतल्यावर ती छायाचित्रे उमटली नाहीत. माझा रानकाढ्या नानूनेही एकदा या वेलीवर एक दगड ठेवला होता काही दिवसानंतर तो दगड बाजूला सरकला गेल्याचे त्याने मला सांगितले होते. माझ्या मते कुठल्या तरी प्राण्याच्या पायाच्या हालचालीमुळे तो बाजूला सरकला असावा. नांदेड जिल्ह्यात किनवट तालुक्यात भुलजा नावाचे एक गाव आहे. तेथेही अशा वनस्पती ओलांडल्यामुळे माणसं भ्रमिष्ट होतात, अशीही माहिती ‘रानभूल’ या पुस्तकात पुढे दिली आहे.
लहानपणी एकदा मी स्वत: सांजवेळी असाच रानावनात जवळपास तीन-चार तास भटकलो होतो. रानावर सर्वत्र अंधारछाया दाटली होती. माझं दिशेचं ज्ञान नाहीसं झालं होतं. वाट मिळेल तिकडे सैरावरा पळत होतो. कदाचित यामागे अशीच एखादी वेलवर्गीय वनस्पती माझेकडूनही ओलांडली गेली असावी. मी ‘रानभूल’विषयी काही जुन्याजाणत्या मंडळींनासुद्धा विचारणा केली आहे. माझ्या परिसरात असलेले आणि गेल्या वीस वर्षांपूर्वी सेवानिवृत्त झालेले शिक्षक तथा ज्येष्ठ लेखक राम देशमुख यांचेशी याबाबत केलेल्या चर्चेत सांगितले की, त्यांच्या काळात शिक्षकांना चार चार मैल दूरवरच्या शाळेत शिकवायला पायी जावे लागायचे. अशाच दोन प्रसंगात जंगल आणि शेतातून पायवाट असलेल्या भागात अशीच ‘रानभूल’ त्यांनाही पडली असल्याचे ते सांगतात. अकरा वाजता शाळेत पोहचण्याऐवजी दुपारी दोन-तीन वाजून गेले होते. त्यांच्या काळात अशा प्रकाराला चकवा असे संबोधले जात होते. इतरही काही मंडळींकडून असेच अनुभव ऐकायला मिळाले. परंतु, माझे यापूर्वी प्रकाशित झालेले ‘भुलनवेल’ हे पुतक त्यांनी वाचले. त्यानंतर त्यांचंही असं म्हणणं पडलं की, रानावनात अशा रानभूल पाडणार्‍या काही वनस्पती असाव्यात. ज्या ओलांडल्या म्हणजे दिशेचं ज्ञान नाहीसं होत असावं.
अथक प्रयत्नानंतर मला जेव्हा मेळघाटात ‘भुलनवेल’ या रहस्यमय वेलवर्गीय वनस्पतीचा शोध लागला. त्यानंतर मी या वेलीबद्दलचे शोधकार्य पुढे नेण्याचे ठरवले. पहिल्याच शोधानंतर त्यावर एका दैनिकामध्ये विस्तृत लेख लिहून तो छापूनही आला. त्यानंतर बर्‍याच जाणकारांचे आणि आयुर्वेदाचार्यांचे दूरध्वनी आले. ते मला या वेलीविषयी ठिकाणाची माहिती मागत होते. परंतु, भुलनवेलीच्या संरक्षण आणि संवर्धनाला प्राधान्य देऊन मी कुणालाही या वेलीचे ठिकाण अद्याप सांगितले नाही, मात्र वेलीबद्दलची शोधयात्रा आणि पाठपुरावा करण्याच्या दृष्टीने माझे प्रयत्न सुरू होते. तिचा संपूर्ण अभ्यास करून लॅबमध्ये तिचे पुढील संशोधन करून असा कोणता तरी घटक या वेलीत आहे काय, यादृष्टीने माझे प्रयत्न सुरू असतानाच मला एका दुर्दैवी प्रसंगाला सामोरे जावे लागले. अभिषेक वाकोडे या तरुण वनरक्षकाचा अस्वलाच्या हल्ल्यात दुर्दैवी मृत्यू झाला. माझे ‘भुलनवेल’ या विषयावरील संशोधनही तेथेच थांबले. परंतु, माझ्या अनुभवाप्रमाणे मी व माझा रानसखा आम्ही दोघेही जवळपास या वेलीच्या सहवासात साधारणपणे अर्धा तास वेळ घालवला, परंतु आमच्यापैकी कोणालाही अशा प्रकारची भूल पडल्याचे मला आठवत नाही. मात्र, या दुर्मिळ वेलीच्या संरक्षण आणि संवर्धनाकरिता पूर्वजांनी अशा प्रकारच्या कथाकल्पना रचल्या, त्या जैवविविधतेच्या रक्षणाच्या दृष्टीने हितकारकच आहेत, असे मला वाटते. भुलनवेलीचा शोध हे एक निमित्त आहे.
ही वेल दमाच्या आणि श्‍वसनाच्या आजारावर अतिशय उपयुक्त असून आयुर्वेदात तिचे अनन्यसाधारण महत्त्व आहे. ‘भुलनवेल’सारख्या अनेक रहस्यमय वेली-वनस्पतीच्या रक्षणाच्या दृष्टीने पूर्वजांनी तिचे जतन आणि संरक्षण व्हावे म्हणून कदाचित ही युक्ती वापरली असावी. या पृथ्वीतलावरील प्रत्येक वनस्पतीचे, वृक्षलतांचे संरक्षण आणि संवर्धन होणे, हा यामागील प्रमुख उद्देश असावा. पृथ्वीतलावरील सजीवसृष्टीसाठी ही बाब अत्यंत महत्त्वपूर्ण ठरते.
– प्र.सु.हिरुरकर,९८२२६३९७९८