वास्तव मांडणारे ‘तभा’ एकमेव वृत्तपत्र
तभा वृत्तसेवा
नागपूर, १९ मार्च
साहेबराव पाटील करपे यांनी रविवार १९ मार्च १९८६ साली केलेली सहकुटुंब आत्महत्या ही पहिली शेतकर्‍याची आत्महत्या, हे आज मानले जात आहे. त्या घटनेला ३० वर्षे झालीत तरीही अद्यापही शेतकर्‍यांच्या आत्महत्यांचे सत्र थांबलेले नाही, म्हणून काही सामाजिक संघटना एक दिवस अन्नत्याग आंदोलनही करत आहे. मात्र, तीस वर्षांपूर्वी साहेबरावांची सहकुटुंब आत्महत्या ही शेती समस्येतून घडलेली घटना आहे, असे ठामपणे म्हणणारे आणि तशीच बातमी देणारे ‘तरूण भारत’ हे महाराष्ट्रातील एकमेव वृत्तपत्र होते.
चिलगव्हाण (ता. महागाव, जि. यवतमाळ) येथील साहेबराव पाटील करपे यांनी पत्नी व चार मुलांसह दत्तपूर (वर्धा) येथील मनोहर कुष्ठधामात आत्महत्या केली. महाराष्ट्रातील पहिली शेतकरी आत्महत्या म्हणून नोंद झालेल्या या घटनेने संपूर्ण राज्य हादरून गेले होते. १९ मार्च १९८६, रविवारी झालेली ही हृदयद्रावक घटना दुसर्‍या दिवशी उघड झाली आणि २१ मार्च १९८६ च्या अंकार ‘तरुण भारता’त शीर्श वृत्त म्हणून ठळकपणे प्रकाशित करण्यात आली. इतरही वर्तमानपत्रात ही बातमी महत्त्वाच्या स्थानीच होती मात्र, या आत्महत्या शेतीच्या कारणावरून झालेल्या, शेतकर्‍याची आत्महत्या आहे, असा उल्लेख करत भविष्यातील अप्रिय घटनांची ही नांदी आहे, हे स्पष्टपणे ‘तभा’नेच अधोरेखित केले होते.
‘माझ्या आणि माझ्या कुटुंबाच्या आत्महत्येपासून बोध घेत सरकार शेतकर्‍यांसाठी काहीतरी करेल…शावाद साहेबराव करपे यांनी मृत्यूपूर्व लिहिलेल्या चिठ्ठीत नोंदवला होता.
चिलगव्हाणचे ११ वर्षे सरपंच राहिलेले, संगीत विशारद असलेले, उत्तम भजन गाणारे साहेबराव करपे यांचा गावात मोठा वाडा; पण भग्नावस्थेत. त्या वाड्यातच त्यांचा संसार होता. थकीत बिलापोटी एमएसईबीने वीजजोडणी खंडित केली. ४० पैकी १५ एकरांतील पोटर्‍यांपर्यंत आलेला गहू-चणा वाळला अन् सोबतच साहेबरावांची स्वप्नेही करपलीत. कर्ज फेडण्याच्या चिंतेने ते सैरभैर झाले. मनाने खचले. करपे पती-पत्नीने काहीतरी मनाशी ठरवले…
१९ मार्च १९८६ रोजीही ते पत्नी व चार मुलांसह कुष्ठधामात आले. तिथे खोली घेतली. खोलीतच टाळ, हार्मोनियमच्या साथीने भजने गायली. सोबत आणलेल्या स्टोव्हवर पत्नीने भजे केले. त्यात एड्रींन मिसळले. मुलांना भजे खायला दिले. एक-एक करीत चारही मुलांनी व पाठोपाठ पत्नीनेही जगाचा निरोप घेतला. यानंतर साहेबराव यांनी शेतकर्‍यांच्या हलाखीच्या स्थितीचे वर्णन करणारी चिठ्ठी लिहिली. त्यात त्यांनी हा निर्णय का घेतला, याविषयी सविस्तर लिहिले. तसेच दोन मुले, दोन मुली (लहान मुलगी सात-आठ महिन्यांचीच होती) व पत्नीच्या मृत्यूचा घटनाक्रमही लिहिला. खोलीत एका रांगेत पत्नी आणि मुलांचे मृतदेह ठेवून त्यांच्या कपाळावर त्यांनी एक-एक रुपयाचे नाणे ठेवले. दाराबाहेर दगडाला दोरीने बांधून फेकलेल्या चिठ्ठीच्या वरच्या भागातच त्यांनी कुणीही दार उघडू नये, पोलिसांना कळवावे, असे लिहून ठेवले होते. नंतर एन्ड्रीन मिसळलेले भजे खाऊन त्यांनीही तडफडत मृत्यूला कवटाळले… हा सारा घटनाक्रम ‘तभा’च्या बातमीत आहे.
इतर वर्तमानपत्रे या घटनेमागे इतर कारणे शोधत असताना महाराष्ट्र-विदर्भातील शेती संकटाची ही नांदी असल्याचे स्पष्ट करणारे ‘तभा’ हे एकमेव वर्तमानपत्र होते.