‘योगी’राज प्रारंभ

0
287

– आदित्यनाथ यांचा शपथविधी
– दोन उपमुख्यमंत्र्यांसह ४४ मंत्र्यांचा समावेश
वृत्तसंस्था
लखनौ, १९ मार्च
गोरखपूर येथील भाजपाचे खासदार योगी आदित्यनाथ यांनी आज रविवारी उत्तरप्रदेशचे २१ वे मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली. यासोबत देशातील या सर्वात मोठ्या राज्यात आजपासून ‘योगी’राज प्रारंभ झाले आहे. योगी आदित्यनाथ यांच्यासोबत केशव प्रसाद मौर्य आणि लखनौचे महापौर डॉ. दिनेश शर्मा यांनी उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली. याशिवाय, अन्य ४२ मंत्र्यांचाही मंत्रिमंडळात समावेश करण्यात आला.
लखनौ येथील स्मृती उपवन येथे आयोजित या शानदार शपथविधी सोहळ्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शाह यांच्यासोबत भाजपाशासित सर्व राज्यांचे मुख्यमंत्री आणि केंद्रीय मंत्री आणि पक्षाचे वरिष्ठ नेते उपस्थित होते. भाजपाचे ज्येष्ठ नेते लालकृष्ण अडवाणी, केंद्रीय मंत्री व्यंकय्या नायडू, भाजपाचे मार्गदर्शक डॉ. मुरली मनोहर जोशी, मनोज तिवारी यांच्यासह अनेक प्रभृती यावेळी उपस्थित होते. विशेष म्हणजे, समाजवादी पार्टीचे संस्थापक मुलायमसिंह यादव आणि मावळते मुख्यमंत्री अखिलेश यादव हे देखील व्यासपीठावर प्रामुख्याने उपस्थित होते.
आज दुपारी सव्वादोन वाजता हा शपथविधी सोहळा आयोजित करण्यात आला होता. राज्यपाल राम नाईक यांनी योगी आदित्यनाथ आणि अन्य मंत्र्यांना पद व गोपनीयतेची शपथ दिली. हा शपथविधी सोहळा पाहण्यासाठी स्मृती उपवन परिसर नागरिकांनी प्रचंड गर्दी केली होती.
राष्ट्रीय राजकारणाची किल्ली अशी ओळख असलेल्या उत्तरप्रदेश भाजपाचे विधिमंडळ पक्षनेते म्हणून शनिवारी योगी आदित्यनाथ यांची एकमताने निवड करण्यात आली होती. सोबतच, भाजपाचे प्रदेशाध्यक्ष केशव प्रसाद मौर्य आणि दिनेश शर्मा यांना उपमुख्यमंत्रिपद देण्याचे जाहीर करण्यात आले होते.
योगींचा अल्पपरिचय
महंत अशी उपाधी असलेले योगी आदित्यनाथ यांचा जन्म ५ जून १९७२ रोजी उत्तराखंडच्या गढवालमध्ये झाला. त्यांचे मूळ नाव अजयसिंह बिष्ट असे आहे. गढवाल विश्‍वविद्यालयातून त्यांनी बी. एस्सी.पर्यंतचे शिक्षण पूर्ण केले आहे. १९९८ पासून ते गोरखपूर मतदारसंघातून लोकसभेवर निवडून येत आहेत. याशिवाय आदित्यनाथ हे गोरखपूर येथील गोरखनाथ मंदिराचे प्रमुख महंत आहेत. ते दिवंगत खासदार व हिंदू महासभेचे अध्यक्ष महंत अवैद्यनाथ ह्यांचे वारसदार मानले जातात.
मंत्र्यांच्या निवडीत संबंध नाही : संघ
मुख्यमंत्री आणि अन्य मंत्र्यांच्या निवडीत राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा कुठलाही संबंध नाही. हा संपूर्ण राजकीय निर्णय आहे, असे संघातर्फे आज स्पष्ट करण्यात आले. योगी आदित्यनाथ हे संघाचे स्वयंसेवक असल्याने त्यांची निवड झाली काय, असा प्रश्‍न विचारण्यात आला असता, सह सरकार्यवाह भागय्या यांनी पत्रकारांना सांगितले की, हा निर्णय पूर्णपणे राजकीय आहे आणि राजकारणाशी संघाचा कुठलाही संबंध नाही.