मोहसीन रझा : योगींच्या मंत्रिमंडळातील एकमेव मुस्लिम चेहरा

0
179

वृत्तसंस्था
नवी दिल्ली, १९ मार्च
उत्तरप्रदेशच्या विधानसभा निवडणुकीत भाजपाने एकाही मुस्लिमाला तिकीट दिले नसल्याने विरोधकांकडून टीका होत होती. त्यातच शनिवारी भाजपाने प्रखर हिंदुत्ववादी अशी प्रतिमा असलेल्या योगी आदित्यनाथ यांच्या नावाची मुख्यमंत्री म्हणून घोषणा केली. त्यामुळे त्यांच्या मंत्रिमंडळात मुस्लिम समाजाला स्थान नसेल अशी चर्चा रंगत असताना, आज शपथविधी घेणार्‍या नावांची यादी जाहीर झाल्यानंतर अनेकांना धक्का बसला आहे. कारण योगी आदित्यनाथ यांच्या मंत्रिमंडळात मोहसीन रझा या मुस्लिमाचा समावेश असणार आहे.
वास्तविक रजा यांच्या निवडीमागे उत्तरप्रदेशातील अल्पसंख्यक कल्याण विभाग, वक्फ बोर्ड सोबत इतर प्राधिकरणांवर मुस्लिम व्यक्तीची नियुक्ती करणे बंधनकारक आहे. त्यामुळेच मोहसीन रझा यांना मंत्रिमंडळात स्थान मिळाले आहे.
रझा यांनी काही दिवसांपूर्वीच भाजपात प्रवेश केला होता. पक्षप्रवेशानंतर त्यांना उत्तरप्रदेश भाजपा प्रवक्तेपदी नियुक्त करण्यात आले होते. रझा यांनी राजकीय क्षेत्राशिवाय क्रीडा क्षेत्रातही चमकदार कामगिरी बजावली आहे. रझा रणजी क्रिकेट सामने खेळले आहेत.
४० वर्षीय मोहसीन रजा यांनी गव्हर्नमेंट ज्युबली इंटरकॉलेजमधून शिक्षण घेतले. यानंतर त्यांनी लखनऊ विद्यापीठातूनही शिक्षण घेतले आहे. सध्या रजा उत्तरप्रदेशच्या कोणत्याही सदनाचे सदस्य नसून, त्यांना सहा महिन्यात कोणत्या तरी एका सदनाचे सदस्यत्व दिले जाईल.