वृत्तसंस्था
नांदेड, १९ मार्च
मी सादर केलेला अर्थसंकल्प तुटीचा आहे, पण माझ्यावर केवळ दारू पिणारे नाराज आहेत. दारूची दुकाने बंद होत असली, तरी वित्तीय तूट येणार नाही, असे अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी सांगितले. ते आज नांदेडमध्ये बोलत होते.
शेतकर्‍यांच्या कर्जमाफीवर विरोधक केवळ राजकारण करत आहेत. २००९ साली संपूर्ण देशात शेतकर्‍यांची कर्जमाफी झाली होती. पण, त्यानंतरही महाराष्ट्रात शेतकर्‍यांच्या आत्महत्या थांबल्या नाहीत. त्यामुळे शेतकरी आत्महत्या का करतात, यावर चिंतन झाले पाहिजे. तरच उपाय मिळेल, असे सुधीर मुनगंटीवार म्हणाले.
मी जो अर्थसंकल्प सादर केला आहे, तो सर्वसामान्य लोकांना दिलासा देणारा आहे. या अर्थसंकल्पात जीवनावश्यक वस्तू स्वस्त करण्यात आल्या आहेत. मी या अर्थसंकल्पात केवळ दारू पिणार्‍यांवर कर वाढवला आहे. त्यामुळे राज्यात केवळ दारू पिणारेच माझ्यावर नाराज असू शकतील, असेही अर्थमंत्री म्हणाले.
सुधीर मुनगंटीवार यांनी राज्याचा सर्वाधिक म्हणजे १४ हजार कोटी रुपयांचा तुटीचा अर्थसंकल्प सादर केला आहे. परिवहन, मुद्रांक आणि उत्पादन शुल्क या विभागांकडून यावेळी कमी महसुली मिळाला आहे. शिवाय, राज्यातील १५ हजार ५०० मद्याविक्री दुकाने बंद होणार आहेत. मात्र, या सर्व गोष्टींचा कुठलाही परिणाम राज्याच्या तिजोरीवर होणार नाही, असे अर्थमंत्र्यांनी सांगितले.