वृत्तसंस्था
सूरत, १९ मार्च
जगातील सर्वाधिक महाग गणेशमूर्ती म्हणून सूरत या हिरेनगरीत हिर्‍याच्या व्यवसायात असलेल्या कनुभाई आसोदिया यांच्या घरच्या गणेशमूर्तीची नोंद केली गेली आहे. १८२.३ कॅरटची ही हिर्‍याची मूती स्वयंभू आहे. कनुभाई सांगतात, १२ वर्षांपूर्वी बेल्जियम येथून त्यांच्याकडे आलेल्या कच्च्या हिर्‍यांंमध्ये हा हिरा होता व निरखून पाहताना त्याला नैसर्गिक रीत्याच गणेशाचा आकार आल्याचे त्यांना दिसले व त्यांनी हा ‘हिरा गणेश’ आपल्या घरच्या देवात ठेवला. आज हा गणेश हे त्यांचे आराध्य दैवत बनले आहे. आपोआप गणेशाचा आकार निर्माण झाला असेल तर त्याला स्वयंभू गणेश म्हटले जाते.
कनुभाई सांगतात, ‘या मूर्तीची किंमत करण्याचे कारण कधी पडलेच नाही. कारण श्रद्धेची किंमत करता येत नाही. मात्र, हिरे पारख्यांनी या हिर्‍याची किंमत ६०० कोटींपेक्षा अधिक केली आहे. या मूर्तीसाठी त्यांच्याकडे अनेक ऑफर्स आल्या. पण, ही मूर्ती विकणार नसल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. कुटुंबीयांबरोबरच बाहेरच्या लोकांनाही या गणेशाचे दर्शन घडवा, असा आग्रह झाल्यानंतर मात्र त्यांनी ही मूर्ती काही दिवस मुंबईच्या प्रसिद्ध सिद्धिविनायक मंदिरात ठेवली होती. देशविदेशातून अनेक मान्यवर या मूर्तीचे दर्शन घेण्यासाठी सूरतला येऊन गेल्याचेही कनुभाई सांगतात.
बाजारभावाप्रमाणे ही मूर्ती कोहिनूर हिर्‍यापेक्षाही महाग आहे. कोहिनूर हिरा १०५ कॅरेट वजनाचा आहे तर ही मूर्ती १८२.३ कॅरट वजनाची आहे.