पुजारा-साहाने मोडला ६९ वर्षे जुना विक्रम!

0
181

वृत्तसंस्था
रांची, १९ मार्च
चेतेश्‍वर पुजारा व रिद्धिमान साहाने रांची कसोटीत चौथ्या दिवशी ६९ वर्षे जुना विक्रम मोडीत काढून नवीन विक्रम प्रस्थापित केला. या दोघांनी सातव्या गड्यासाठी १३३ धावांची भागीदारी करताच विजय हजारे व हेमू अधिकारी यांच्या भागीदारीचा विक्रम मोडीत काढला.
६९ वर्षांपूर्वी हजारे व अधिकारी यांनी ऑस्ट्रेलियाविरुद्ध सातव्या गड्यासाठी १३२ धावांची भागीदारी केली होती व हा विक्रम सुमारे सात दशके कायम राहिला. हजारे-अधिकारी यांनी जानेवारी १९४८ मध्ये ऍडिलेड कसोटी सामन्यात ऑस्ट्रेलियाविरुद्ध सातव्या गड्यासाठी विक्रमी भागीदारी केली होती. यात हजारे यांनी १४५ धावा, तर अधिकारी यांनी ५१ धावा काढल्या होत्या.
पुजाराने द्रविडलाही टाकले मागे
भारतीय संघाचा फलंदाज चेतेश्‍वर पुजाराने संघाचा द वॉल म्हणून ओळखला जाणार्‍या राहुल द्रविडचा विक्रम मोडीत काढला. पुजारा हा कसोटी सामन्यात एका डावात सर्वाधिक चेंडू खेळणारा एकमेव खेळाडू झाला आहे. पुजाराने ५२५ चेंडूंचा सामना करीत २०२ धावांची द्विशतकी खेळी केली आहे. यापूर्वी एका डावात सर्वाधिक चेंडू खेळण्याचा पराक्रम राहुल द्रविडने केला होता. द्रविडने एप्रिल २००४ मध्ये रावळपिंडी येथे पाकिस्तानविरुद्ध ४९५ चेंडूंचा सामना केला होता व त्याने २७० धावा काढल्या होत्या.