चेतेश्‍वर पुजाराचे द्विशतक, रिद्धिमान साहाचे शतक
– भारताचा ९ बाद ६०३ धावांवर डाव घोषित
– ऑस्ट्रेलिया २ बाद, २३ धावा
वृत्तसंस्था
रांची, १९ मार्च
भरवशाचा फलंदाज चेतेश्‍वर पुजाराच्या (२०२) धैर्य व संयमाने नोंदविलेले द्विशतक व त्याने शतकवीर रिद्धिमान साहासोबत सातव्या गड्यासाठी केलेल्या १९९ धावांच्या महत्त्वपूर्ण भागीदारीच्या जोरावर भारताने चौथ्या दिवशी ऑस्ट्रेलियाविरुद्ध आपला पहिला डाव ९ बाद ६०३ धावांवर घोषित करून तिसर्‍या कसोटी सामन्यावर आपली पकड मजबूत केली. भारताला पहिल्या डावात १५२ धावांची आघाडी मिळाली आहे.
ऑस्ट्रेलियाने पहिल्या डावात ४५१ धावा काढल्या होत्या. पुजाराने ५२५ चेंडूत २१ चौकारांच्या मदतीने २०२ धावांची आकर्षक द्विशतकी खेळी केली. साहाने २३३ चेंडूत ८ चौकार व एका षटकारसह ११७ धावांची शतकी खेळी केली. अष्टपैलू रवींद्र जडेजानेही आपल्या फलंदाजीची चमक दाखवित अवघ्या ५५ चेंडूत ५ चौकार व २ षटकारांसह नाबाद ५४ धावांची अर्धशतकी योगदान दिले. उमेश यादवने १६ धावांची भर घातली.
भारताने आपला पहिला डाव घोषित केल्यानंतर मैदानावर आलेल्या ऑस्ट्रेलिया संघाला रवींद्र जडेजाने दोन जबरदस्त हादरे देऊन कांगारूंना दबावाखाली आणले. जडेजाने डेव्हिड वॉर्नरचा (१४) तसेच नॅथन लियोनचासुद्धा (२) त्रिफळा उडविला. ऑस्ट्रेलियाने २ बाद २३ धावांची नोंद केली. त्यांना अजून डावाने पराभव टाळण्यासाठी आणखी १२९ धावा काढण्याची गरज आहे. मॅट रेनशॉ सात धावांवर खेळपट्टीवर आहे.
कर्णधार विराट कोहलीने २१० षटकानंतर भारताचा पहिला डाव घोषित केला. तोपर्यंत भारताने ६०० धावसंख्या ओलांडली होती. भारताने ६ बाद ३६० धावांवरून पुढे खेळण्यास सुरुवात केली होती.
धावफलक
ऑस्ट्रेलिया पहिला डाव ः सर्वबाद ४५१.
भारत पहिला डाव ः (कालच्या ६ बाद ३६० धावांवरून पुढे) चेतेश्‍वर पुजारा झे. मॅक्सवेल गो. लियोन २०२, रिद्धिमान साहा झे. मॅक्सवेल गो. ओकिफी ११७, रवींद्र जडेजा नाबाद ५४, उमेश यादव झे. वॉर्नर गो. ओकिफी १६, ईशांत शर्मा नाबाद ००, अवांतर १९, एकूण २१० षटकात ९ बाद ६०३.
गडी बाद होण्याचा क्रम ः १-९१, २-१९३, ३-२२५, ४-२७६, ५-३२०, ६-३२८, ७-५२७, ८-५४१, ९-५९५.
गोलंदाजी ः हेझलवूड ४४-१०-१०३-१, कमिन्स ३९-१०-१०६-४, ओकिफी ७७-१७-१९९-३, लियोन ४६-२-१६३-१, मॅक्सवेल ४-०-१३-०.
ऑस्ट्रेलिया दुसरा डाव ः डेव्हिड वॉर्नर त्रि.गो. जडेजा १४, मॅट रेनशॉ खेळत आहे ०७, नॅथन लियोन त्रि. गो. जडेजा ०२, अवांतर ००, एकूण ७.२ षटकात २ बाद २३. गडी बाद होण्याचा क्रम ः १-१७, २-२३.
गोलंदाजी ः आर. अश्‍विन ४-०-१७-०, रवींद्र जडेजा ३.२-१-६-२.