दिनविशेष
पन्नास वर्षांपूर्वीचा काळ. टिनांची व सुबक कौलारू घरांचा होता. बांधकामात सिमेंटचा उपयोग कमी होता. साहजिक या घरांमध्ये राहाण्यास माणसांव्यतिरिक्त बर्‍याच प्राण्यांना वाव होता. घरात राहाणारी चिमणी याला अपवाद नव्हती. तिचं इंग्रजी नावच मुळी हाऊस स्पॅरो असं आहे. साधारण १५ से. मी. लांबीचा हा पक्षी घराघरात आढळत असे. आजी, आई धान्य निवडायला बसल्या की, समोरच त्यांचा उड्या मारण्याचा कार्यक्रम सुरू असायचा. धान्यातील अळ्या, सोंडे आणि धान्य हे चिमणीचं प्रमुख खाद्य होतं. विज्ञानाच्या प्रगतीने आता धान्य साफसूफ करूनच घरी येतं. किडींचा बंदोबस्त झाला. चिमण्यांचं खाद्य कमी झालं. राहाण्याची जागा नष्ट झाली. पाहतापाहता लहानाचं मोठं होताना घरापासून चिमणी फार दूर गेली, सध्या दिसत नाही. कित्येक दिवसांत पाहिली नाही! हे असे उद्गार ऐकू येतात. घरची चिमणी मोकळ्या व सुरक्षित वातावरणात निवास शोधून निघून गेली. आजही तिला सुरक्षित वाटतं असे पडित असलेले कारखाने, औद्योगिक परिसर या भागात भरपूर चिमण्या दिसतात.
जोड्यांनी किंवा छोट्या थव्यांनी राहाणारा पक्षी तसा समाजप्रिय आहे. संध्याकाळ झाली की सार्‍या चिमण्या बाभूळ, बांबूची रान, रातराणी अशा रातखार्‍याच्या जागेवर गोळा होतात. एक चिवचिवाट मोक्याची व सुरक्षित जागा पकडण्यावरून सुरू होतो. चिवचिवाट शब्दच चिमण्यांची आठवण करून देतं. चिमण्यांना झुरळ, अळ्या, वातावरणातील किडे, उडणारे पतंग, ज्वारी, बाजरी, तांदूळ आणि माणसांद्वारे टाकलेले खरकटे, असं काहीही खायला चालतं. सुतळी, कूपस, केस, काश्याचा दोरा, केरसुनीच्या काड्या, चिंध्या, अशा विविध सामुग्रीचा एकत्रित गुंता म्हणजे चिमणीचे घरटे. भिंतीची छिद्रं, अडचणींची जागा, पत्राच्या खालच्या फटी चिमणीच्या घरट्यास योग्य जागा असते. घराट्यात चिमणी तीन ते पाच पिल्लांना जन्म देते. नर-मादी दोघेही पिल्लांची, अन्नाची गरज पूर्ण करतात. पंखात बळ येईपर्यंत त्यांना खाऊ घालतात.
१९६० च्या दशकात चीनमध्ये चिमण्या अन्नधान्यांचा नाश करतात म्हणून मोठ्या प्रमाणावर चिमण्या नष्ट केल्या. एक-दोन वर्षात धान्य उत्पादन वाढले, पण शेतातील किडींचे प्रमाण लक्षणीय वाढले. डोलणारी पिकं या किडींपायी नष्ट व्हायची वेळ आली. चिमणीचे महत्त्व अधोरेखित झाले. कृषी संस्थेत चिमणीची भूमिका मान्य करण्यात आली, शिकार बंद केल्या गेली. सध्या पन्नास देशांमध्ये चिमणी वाचविण्याची चळवळ सुरू आहे. २० मार्च हा दिवस जागतिक चिमणी दिन म्हणून साजरा केला जातो. चिमण्यांसाठी आपल्यालाही बरंच काही करता येईल. चिमण्यांना हाकलून लावू नये, परिसरात झाडे लावावी, पक्ष्यांना खाण्यासाठी पोळीचा चुरा, भात, मुरमुरे, धान्य, ब्रेड अशा पदार्थांची सोय करावी. पक्षांना त्रास देऊ नये, ही शिकवण मुलांना द्यावी. पक्ष्यांची पर्यावरणातील भूमिका शाळेमध्ाून समजावून सांगावी. डोळसपणे चिमण्यांकडे पाहावे. आपल्या घरातील लहाणग्याप्रमाणेच चिमण्यांचाही सांभाळ करावा. उन्हाळा लागतोय्, पशू-पक्ष्यांसाठी, चिमण्यांसाठी पाण्याचे एक उथळ भांडे उंच ठिकाणी अवश्य ठेवावे. त्यामुळे पक्ष्यांच्या शिकारीचा धोका कमी होतो. हजारो माणसांचा वावर असलेल्या पुण्यातील फुले मंडईत चिमण्यांची संख्या फार मोठी आहे. चिमण्यांना त्यांच्या घरांसाठी सुतळी, गवत, काड्या, कापूस, चिंध्या आणि चिमण्यांना खाद्य पुरविण्याची जबाबदारी मंडई संस्थेने घेतली आहे. त्यांच्या या प्रयत्नाला चांगले यशही मिळाले आहे. चिमण्यांची संख्या लक्षणीय वाढली आहे. चिमणी आपल्या अशाच प्रतिसादाची वाट पाहातेय्. हरविलेल घर पुन्हा शोधते. लहाणग्या मुलांना ‘‘चिऊ ये! काऊ ये!’ हे शिकवायला तरी चिमणी वाचवायला हवी.
– बाबा देशपांडे
९४२३६१३२२६