सांगणे- राम व कृष्णाचे…

0
164

कल्पवृक्ष
रावण मरणासन्न स्थितीत आहे. त्याच्या सैन्याचा संपूर्ण पराभव झाला आहे. रामाच्या विजयाचा जल्लोश सुरू आहे. या वातावरणात आपले लक्ष वेधून घेणारी एक विलक्षण घटना घडली आहे. असे म्हणतात की, पराजय पचविण्यापेक्षा विजय पचविणे कठीण असते. कारण तो सरळ डोक्यात जातो आणि तेथील विवेकालाही तो पराभूत करतो. पण, राम मात्र भानावर आहे. तो लक्ष्मणाला सांगतो, ‘‘रावणाचा मृत्यू जवळ येऊन ठेपला आहे. रावण दुष्ट होता, आपला शत्रू होता, पण तो विद्वान, महापंडित व राजनीतिज्ञ होता. त्याच्या मृत्यूसोबत त्याचा अनुभव व ज्ञान संपता कामा नये. त्यामुळे तू तेथे जा व रावणाकडून ज्ञान प्राप्त कर.’’ लक्ष्मण रावणाकडे जातो व त्याला मार्गदर्शन करण्याची विनंती करतो. पण, रावण एक अक्षर बोलत नाही. परत येऊन तो घडलेला वृत्तान्त रामाला सांगतो. राम प्रश्‍न विचारतो, ‘‘तू कुठे उभा होता?’’ लक्ष्मण डोक्याजवळ उभा असतो. राम त्याला सांगतो, ‘‘ज्याच्याकडून ज्ञान प्राप्त करायचे त्याच्या पायाजवळ उभे राहावे लागते. अहंकार बाजूला ठेवावा लागतो.’’ लक्ष्मण पुन्हा जातो व पायाजवळ उभा राहतो. या वेळी रावण राजनीतीविषयी अनेक महत्त्वाची तत्त्वे त्याला समजावून सांगतो. विशेष म्हणजे त्यापैकी काही गोष्टी त्याने टाळल्या असत्या तर अशी वेळ आली नसती, अशी कबुलीही देतो. ‘शुभस्य शीघ्रम्‌| अशुभस्य कालहरणम्‌|’ हे सुप्रसिद्ध वचन या वेळी रावणाने लक्ष्मणाला सांगितलेले आहे. आपल्या मंत्र्यांनी टीका केली, तरी त्यांच्यावर विश्‍वास ठेवला पाहिजे. शत्रूला कधीही छोटा किंवा तुच्छ समजू नका. अशा कितीतरी गोष्टींचे ज्ञान या संवादात आहे. शत्रूकडून यशस्वी होण्याविषयीचे शिक्षण कसे घ्यायचे, याविषयी सुरुवातीला लक्ष्मणाच्या मनात संशय निर्माण झाला होता. पण, रामाने दिलेला सल्ला योग्य असल्याची त्याची खात्री पटली.
अशाच प्रकारचा प्रसंग आपल्याला महाभारतातही पाहावयास मिळतो. भीष्म कौरवांकडून होते. द्रौपदीची विटंबना होत असताना त्यांनी हस्तक्षेप केला नाही. श्रेष्ठ आणि ज्येष्ठ असूनही त्यांनी मौन बाळगले. पांडवांविरुद्ध ते लढले. अर्जुनाने शिखंडीला समोर ठेवून त्यांच्यावर बाणांचा वर्षाव केला. त्यांना पराभूत केले. इच्छामरणाचा वर असल्यामुळे ते उत्तरायणापर्यंत शरशय्येवर पडले होते. एक दिवस कृष्ण युधिष्ठिराला म्हणतो, ‘‘उत्तरायणाच्या पहिल्याच दिवशी भीष्मांचे निर्वाण होईल. भीष्मांजवळ प्रदीर्घ अनुभव आणि प्रचंड ज्ञान आहे. ते त्यांच्यासोबत नष्ट होता कामा नये. त्यामुळे तू त्यांना भेटावे व सर्व ज्ञान प्राप्त करावे.’’ त्यानंतर कृष्ण आणि युधिष्ठिर त्यांना भेटून विनंती करतात. रणांगणावर एक ज्ञानयज्ञ सुरू होतो. भीष्मांनी जे ज्ञान दिले त्यातून राजधर्म, दंडनीती आणि चार पुरुषार्थांचा महान अध्याय भारतीय संस्कृतीत जोडला गेला. केवळ युधिष्ठिरालाच नव्हे, तर आजपर्यंत अनेक पिढ्यांना तो मार्गदर्शक ठरला. महाभारतात असे वर्णन आहे की, याकरिता कृष्णाच्या कृपेने त्यांना शक्ती आली व त्यांच्या वेदनाही नाहीशा झाल्या. खरे तर आयुष्याच्या शेवटी प्रत्येक माणूसच शरशय्येवर असू शकतो. चुकीच्या निर्णयांचे, लक्ष्य चुकलेले, आवश्यक नसताना सोडले गेलेले शेकडो बाण त्याला वेदना देत असतील. पश्‍चात्तापाची आग आतून जाळत असेल. अशा अनुभवातूनच खर्‍या ज्ञानाची निमिर्ती होत असते. त्यांच्या जवळचे ज्ञान प्राप्त करून त्यांना वेदनामुक्त करणे, ही खरे तर समाजाची जबाबदारी आहे. आपले चिंतन, ज्ञान, अनुभव वाया जाणार, याची वेदना सर्वाधिक असते. म्हणूनच शत्रूकडेही कसे पाहावे, त्यांच्याशी कसा व्यवहार करावा, त्याचे मापदंड आपल्या संस्कृतीने हजारो वर्षांपासून घालून दिले आहेत. शिवाजी महाराजांनीसुद्धा अफजल खानाचा वध केल्यानंतर सन्मानाने त्याच्या देहाचे दफन केले.
आपली संस्कृती गुणग्राहक, उदार व सहिष्णू आहे. शत्रूशीसुद्धा कसा व्यवहार करायचा, याची ही उदाहरणे आहेत. ‘शत्रू ते मित्र’ या दोन टोकांमध्ये संबंधाच्या अनेक छटा आहेत. त्या वेळीसुद्धा याच माणुसकीचे दर्शन झाले पाहिजे आणि हीच आपल्या संस्कृतीची जीवनदृष्टी आहे. दुर्दैवाने आज आपल्या संस्थागत व सामाजिक जीवनात अशा मनोवृत्तीचा अभाव जाणवतो आहे. शत्रू तर सोडाच, आपल्या माणसाशी मतभेद झाले तरी शत्रूसारखा व्यवहार केला जातो! अनेक कर्तृत्ववान लोकांविषयी खालची भाषा वापरली जाते. मतभिन्नता असली तरी आत्मीयता, आदर व नम्रतेचा व्यवहार आणि परस्परसंवाद हाच संघटित व सुसंस्कृत समाजाचा पाया असतो. राम व कृष्णाचे हेच सांगणे आहे…
– रवींद्र देशपांडे
८८८८८०३४११