मध्यरात्री फेकले पत्र

0
226

वेध
गोवा फॉरवर्ड पार्टीचे नेते विजय सरदेसाई यांनी फोन उचचला नाही तेव्हाच दिग्विजयसिंह यांना कळून चुकले होते की, कॉंग्रेसच्या पायाखालील वाळू सरकली आहे! गोव्यात कॉंग्रेसचेच सरकार बनणार, या अतिआत्मविश्‍वासानेच दिग्विजय वावरत होते. राज्यपालांना भेटण्याची वेळ दुपारी १ वाजता मागण्यात आली. नंतर ती २ केली. पुन्हा ती ३ पर्यंत लांबविली आणि शेवटी ४ वाजता ठरविण्यात आली. विलंबाचे कारण काय, तर कॉंग्रेसला विधिमंडळ पक्षनेता ठरविण्यात येत नव्हता. दरम्यान, भाजपाचे नितीन गडकरी यांनी ज्या गतीने हालचाली केल्यात, त्या सर्वश्रुत आहेत. गडकरी गोव्यात आले तेव्हा त्यांना भाजपा आमदारांमध्ये मनोहर पर्रीकरांना मुख्यमंत्री करण्याबाबत पूर्ण एकमत आढळून आले. एवढेच नाही, तर गोवा फॉरवर्ड पार्टीचे सरदेसाई हेदेखील मनोहर पर्रीकरांना मुख्यमंत्रिपदासाठी पुन्हा गोव्यात आणण्यास अनुकूल असल्याचे संकेत मिळाले होते. नितीन गडकरी यांच्या शिष्टाईला विजय सरदेसाई यांनी सकारात्मक प्रतिसाद दिला. तिकडे राष्ट्रवादी कॉंग्रेसचे आमदार चर्चिल आलेमाओदेखील कॉंग्रेसच्या निरोपाची वाट बघत कंटाळून गेले. त्यांनीदेखील भाजपा सरकारला पाठिंबा देण्याचे मन बनविले आणि वरिष्ठांना कळवून दिले की, मला भाजपा सरकारला पाठिंबा देण्याशिवाय दुसरा मार्ग उरला नाही. आता मात्र दिग्गीराजा डगमगले. तोंडाशी आलेला घास हिरावला जात असल्याची जाणीव झाली. मग एक शेवटचा निकराचा प्रयत्न करण्यात आला. कॉंग्रेस पक्षाने सत्तास्थापनेचा खरेच दावा केला होता, हे न्यायालयात तरी दाखविता यावे म्हणून, राज्यपालांच्या भेटीची वेळ मागणारे पत्र राजभवनाच्या कुंपणावरून मध्यरात्री आत फेकण्यात आले, असे आता उघड झाले आहे. गंमत म्हणजे, या पत्रातही विधिमंडळ पक्षनेत्याचे नाव नव्हते. दुसर्‍या दिवशी मात्र सकाळी भाजपाने राज्यपालांसमोर २२ आमदार उपस्थित करून, ही बाजी जिंकली. असो. पण, राजभवनाच्या कुंपणावरून पत्र फेकण्याची कल्पना कुणाची असावी, याचा गोवेकर माग काढत असल्याचे समजते.

येचुरी आणि लोकशाही
कम्युनिस्ट विचारसरणी लोकशाहीवादी आहे, असे म्हणणे म्हणजे, संघ जातीयवादी आणि समाजात फूट पाडणारा आहे, असे म्हणण्याइतपत हास्यास्पद आहे. ही वस्तुस्थिती असतानाही, नागपुरातील कथित आंबेडकरवाद्यांनी मार्क्सवादी कम्युनिस्ट पार्टीचे सरचिटणीस व खा. सीताराम येचुरी यांना नागपुरात व्याख्यानासाठी बोलावले. विषय कोणता? तर ‘लोकशाहीचा र्‍हास : आव्हाने व उपाय’ हा. मुळातच कम्युनिस्ट विचारसरणीला लोकशाही मान्य नाही. जगात जिथे कुठे कम्युनिस्टांचे शासन आले, तिथे तिथे ते दडपशाहीचेच शासन होते. लोकशाही केवळ दाखविण्यापुरती; एकच स्पर्धक असलेल्या स्पर्धेसारखी. भारतात कम्युनिस्टांना नाइलाजाने लोकशाही मार्गाचा वापर करून सत्तेत यावे लागते. पण, सत्तेत आल्यावर ते जो सेक्युलर हिंसाचार करतात, तो लोकशाही तत्त्वांना लाज आणणारा असतो. बंगालमधील प्रदीर्घ कम्युनिस्ट राजवटीत सुमारे ५० हजार कॉंग्रेस कार्यकर्त्यांना संपविण्यात आले. केरळमध्ये हिंदुत्ववादी कार्यकर्त्यांना अमानुषपणे ठार मारणे सुरूच आहे. असे असले तरीही, कम्युनिस्ट नेत्यांना लोकशाहीवादी म्हणून मोठ्या मानाने मिरवले जाते. इतरांचे एक वेळ क्षम्य मानता येईल, पण आंबेडकरवादी म्हणवून घेणार्‍यांनीदेखील इतरांच्या तालावर नाचावे! हे जरा अतीच झाले. ज्या बाबासाहेब आंबेडकरांनी या देशाला लोकशाही शासनप्रणाली दिली, त्या बाबासाहेबांचे अनुयायी म्हणविणार्‍यांनी, लोकशाहीला न मानणार्‍या कम्युनिस्टांना डोक्यावर घ्यावे! हिंदुत्ववादी विचारसरणीला अज्ञानातून विरोध करता करता, ज्या कम्युनिस्ट विचारसरणीवर बाबासाहेब आंबेडकर विचारपूर्वक थुंकले होते, त्यांच्या नेत्यांचे व्याख्यान आयोजित करण्यासाठी स्थानिक कथित आंबेडकरवादी नेत्यांनी आकाशपाताळ करण्यापर्यंत मजल मारावी, हे केवळ बाबासाहेबांचेच नाही, तर या देशाचेही दुर्दैव आहे, असेच म्हणावे लागेल. येचुरींनाच बोलवायचे होते, तर विषय तरी दुसरा घ्यायला हवा ना! ज्यांचा लोकशाहीवर तिळमात्र विश्‍वास नाही, त्यांनाच लोकशाहीच्या र्‍हासावर उपाय विचारायचा! दुसरे असे की, लोकशाहीचा र्‍हास तरी कुठे होत आहे! भारतात अत्र तत्र सर्वत्र भाजपाचा विजय होत आहे म्हणून लोकशाहीचा र्‍हास समजायचा का, की औचित्यहीन झालेले कम्युनिस्ट पक्ष अस्तित्वहीन होत आहेत म्हणून! एका विशिष्ट जातीत जन्माला आलो म्हणून आंबेडकरांचे विचार आम्हालाच समजले असा तोरा कुणी मिरवू नये; अगदी आंबेडकर असे आडनाव लागणार्‍यांनीदेखील! या सर्वांनी त्या महामानवाचे विचार डोळसपणे समजून घेण्याची वेळ आली आहे.
– श्रीनिवास वैद्य
९८८१७१७८३८