बाबासाहेबांना ध्येयनिष्ठेचे राजकारण अभिप्रेत

0
197

-प्रा. दत्ता भगत यांचे प्रतिपादन
-तेराव्या अ. भा. आंबेडकरी साहित्य संमेलनाचे सूप वाजले
तभा वृत्तसेवा
नागपूर, १९ मार्च
चळवळीतील कार्यकर्त्यांना सक्रिय राजकारणाचे आकर्षण असते. आकर्षण ठेवणे चुकीचे नाही. परंतु, हल्ली राजकारणाला निवडणुकीपुरते मर्यादित ठेवले जात आहे, हे चुकीचे आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना हेच अभिप्रेत नव्हते. निवडणुकीत पराभूत झाल्यानंतरही त्यांनी स्वातंत्र्य, समता व बंधुत्व या ध्येयनिष्ठतेसाठी राजकारण केले, असे प्रतिपादन तेराव्या अखिल भारतीय आंबेडकर साहित्य संमेलनाचे अध्यक्ष प्रा. दत्ता भगत यांनी केले.
तेराव्या अखिल भारतीय आंबेडकरी साहित्य संमेलनाचा समारोप रविवारी पार पडला. यावेळी ते बोलत होतेे. याप्रसंगी व्यासपीठावर अ. भा. आंबेडकरी साहित्य व संस्कृती संवर्धन महामंडळाचे अध्यक्ष अशोक बुरबुरे, संयोजक सत्तेश्‍वर मोरे, विजय तागडे उपस्थित होते. प्रा. दत्ता भगत म्हणाले, अमेरिकेतील निग्रो आणि भारतातील अस्पृश्यांची स्थिती जनावरांपेक्षाही वाईट होती. ती माणसे आहेत, याची जाणीवच प्रस्थापितांना नव्हती. महात्मा गांधींनी अस्पृश्यांसाठी काहीच काम केले नाही, असे मी मानत नाही. महात्मा गांधींनी भूतदयेवर आधारित अस्पृश्योद्धाराचे कार्य केले. गांधीनी अस्पृश्यांना उपकाराची लाचारी दिली, तर बाबासाहेबांनी अस्पृश्यांचा स्वाभिमान जागृत केला. त्यांना ताठ मानेने जगणे शिकविले. त्यामुळे बाबासाहेबांचे महापरिनिर्वाण होऊन ६० वर्षे झाली तरी त्यांच्यासाठी जीव देऊन प्रेम करणारी लाखो माणसे आहेत. डॉ. आंबेडकरांच्या व्यक्तिमत्त्वात राजकीय सत्ता आणि धर्म विचार १९२० पासूनच एकवटले होते. राजकारण आणि धर्म ही त्यांच्या कार्याची दोन चाके होती. राजकारण समता, बंधुता आणि न्याय प्रस्थापित करण्याचा इहलोकीचा मार्ग आहे. त्यामुळे राजकारण आपल्या ध्येयवादाचा व्यापक भाग ठरतो. नीती शब्दातही रुढी- परंपरांचा शिरकाव दिसत होता. बाबासाहेबांनी काळानुरूप नीतीसोबत धर्माऐवजी नागपूरच्या दीक्षाभूमीवर लाखोंना ‘धम्म’ दिला. त्यामुळेच दलित शब्द आम्ही बाद केला आणि ही आंबेडकरी चळवळीची गरज आहे, असेही त्यांनी सांगितले.
प्रा. भगत म्हणाले. प्रा. सतेश्‍वर मोरे यांनी आंबेडकरी साहित्य संमेलन दीक्षाभूमीवर व्हावे, असे ठरविण्याचे सांगितले. परंतु, दीक्षाभूमी मिळाली नसल्याने शेवटी बंदिस्त सभागृहात हे संमेलन घ्यावे लागल्याची खंत त्यांनी बोलून दाखवली. यावेळी आंबेडकरी चळवळीला बळ देणार्‍या कार्यकर्त्यांचा सन्मान करण्यात आला. नाट्य कलावंत अनंत टेंभुर्णे यांचा ११ हजार रुपये रोख पुरस्कार देऊन सन्मान करण्यात आला. निळाई परिवारातर्फे प्रा. सतेश्‍वर मोरे यांचाही सत्कार करण्यात आला. शिवाय काष्ठशिल्पकार दयाराम राऊत, भजन मंडळाचे प्रमुख सुधाकर पाटील, भाजीपाल्याची गाडी ओढताना आंबेडकरी विचारांचे संवर्धन करणारे विलास सूर्यवंशी यांचाही यावेळी सन्मान झाला. अशोक बुरबुरे यांनी ठरावांचे वाचन केले. संचालन प्रा. प्रवीण कांबळे यांनी केले.
संमेलनात पारित झालेले ठराव
-डॉ. आंबेडकर लेखन, भाषणे प्रकाशन समितीला स्वायत्ता मिळावी
-उच्चशिक्षणातील मागासवर्गीयांवरील अन्याय दूर करावा
-विद्यापीठातील सांस्कृतिक दहशतवादाचे वातावरण दूर व्हावे
-पाली विद्यापीठ नागपुरात स्थापन करावे
-श्याम हॉटेलमध्ये बाबासाहेबांचे राष्ट्रीय स्मारक करावे
-तिबेटला स्वातंत्र्य मिळावे म्हणून केंद्राने प्रयत्न करावे
-डॉ. आंबेडकरांचे इंग्रजी साहित्य मराठी व इतर भाषेत प्रकाशित करावे