– महाविद्यालयात प्रवेश अर्जात प्रश्‍नाचा समावेश
– राज्य निवडणूक आयोगाचे निर्देश
तभा वृत्तसेवा
नागपूर, १९ मार्च
लोकशाहीत मतदानाचा अधिकार हा सर्वोच्च आहे. पण आपल्या देशात अजूनही अनेक लोकांना या अधिकाराची जाणीव नाही. यात युवकांचीही मोठी संख्या आहे. अशा युवकांना लोकशाही प्रक्रियेत सहभागी करून घेण्यासाठी राज्य निवडणूक आयोग प्रयत्न करत आहे. या अंतर्गतच निवडणूक आयोगाने महाविद्यालयात प्रवेश अर्जात ‘आपण मतदारयादीत नाव नोंदविले आहे काय?’ या प्रश्‍नाचा समावेश करण्याचे निर्देश शैक्षणिक संस्थांना दिले आहेत. तसेच ज्या विद्यार्थ्यांनी नाव नोंदवले नाही, त्यांच्याकडून एक अर्ज भरून घेतला जाणार आहे. त्यामुळे शैक्षणिक काळातच विद्यार्थ्यांना मतदानपत्र प्राप्त होणार आहे.
भारत हा जगातील सर्वांत मोठा लोकशाही देश आहे. महाराष्ट्रातील सर्व विद्यापीठे व महाविद्यालयात लाखो विद्यार्थी उच्च शिक्षण घेत आहेत. उच्च शिक्षणाच्या एका टप्प्यावर सर्व विद्यार्थी हे त्यांच्या वयाची १८ वर्षे पूर्ण करतात. या विद्यार्थ्यांकडून यावेळीच मतदान अर्ज भरून घेतल्यास ते लगेच मतदानाच्या प्रकियेत सहभागी होतील. नागरिकांना मतदार अर्ज करण्याची प्रक्रिया किचकट वाटते. शासकीय कामाची भीती त्यांच्या मनात असते, हे मतदार प्रक्रियेपासून दूर राहण्याचे मुख्य कारण आहे. विद्यार्थ्यांकडून शालेय काळात अर्ज भरून घेतल्यास भविष्यात त्यांची मतदारपत्र तयार करण्यासाठी भटकंती होणार नाही. त्यामुळे राज्य निवडणूक आयोगाचा हा अतिशय स्तुत्य उपक्रम आहे.
सर्व महाविद्यालये आणि अकृषी विद्यापीठांना ‘आपण मतदारयादीत नाव नोंदविले आहे काय?’
असा प्रश्‍नाचा समावेश अर्जात करून घेण्याच्या सूचना निवडणूक आयोगाने नुकत्याच दिल्या आहेत. त्यानुसार आठ दिवसांच्या आत शासनास प्रवेशअर्जाचे सुधारित नमुने सादर करावयाचे आहे. तसेच अर्ज करताना परदेशी अथवा परराज्यातील विद्यार्थ्यांबाबत निर्माण होणारी अडचण देखील तपासण्याचे सांगण्यात आले आहे. प्रत्येक विद्यार्थ्याला १८ वर्षे ज्या टप्प्यावर पूर्ण होतील, तेव्हा मतदार नोंदणी अनिवार्य करण्याबाबत विद्यापीठांना अभिप्रायही सविस्तर शासनास तत्काळ सादर करण्याचे आदेश उच्च तंत्र शिक्षण विभागाच्या वतीने सुद्ध देण्यात आले आहे.