आयडिया-वोडाफोनचे विलीनीकरण

देशातील सर्वात मोठी टेलिकॉम कंपनी स्थापणार

0
44

वृत्तसंस्था
नवी दिल्ली, २० मार्च
आयडिया सेल्युलर कंपनीने आज सोमवारी वोडाफोन इंडिया आणि वोडाफोन मोबाईल सर्व्हिसेससोबत विलीनीकरणाच्या प्रस्तावाला मंजुरी दिली. या दोन्ही कंपन्या आता एकत्र आल्याने स्थापन होणारी कंपनी देशातील सर्वात मोठी कंपनी म्हणून उदयास येणार असून, या कंपनीचे ३९४ दशलक्ष (सुमारे ४० कोटी) ग्राहक राहणार आहेत. या विलीनीकरणामुळे सुमारे एक लाख कर्मचारी रोजगाराला मुकण्याची भीती व्यक्त केली जात आहे.
आयडिया सेल्युलरच्या संचालक मंडळाच्या बैठकीत याबाबतचा अंतिम निर्णय घेण्यात आला. यामुळे वोडाफोन इंडिया लिमिटेड आणि वोडाफोन मोबाईल सर्व्हिसेस लिमिटेड या दोन्ही कंपन्या आयडीआय कंपनीत विलीन होणार आहेत. सेबी, दूरसंचार विभाग आणि भारतीय रिझर्व्ह बँकेकडून औपचारिकता पूर्ण करण्यात आल्यानंतर विलीनीकरणाची प्रक्रिया लवकरच पूर्ण करण्यात येणार आहे, असे आयडियाच्या संचालक मंडळाच्या बैठकीनंतर जारी प्रसिद्धीपत्रकात म्हटले आहे.
विलीनीकरणानंतर स्थापन होणार्‍या कंपनीत सुमारे ४० कोटी ग्राहक राहणार आहेत. या नव्या कंपनीत वोडाफोनची ४५.१ टक्के आणि आयडियाची २६ टक्के भागीदारी असणार आहे. उर्वरित ३५ टक्के भागीदारांची निवड बाजारातून करण्यात येणार आहे.
देशभरात खळबळ निर्माण करणार्‍या रिलायन्स जिओला टक्कर देण्यासाठी मोबाईल क्षेत्रातील या दिग्गज कंपन्या एकत्र आल्या आहेत. काही दिवसांपूर्वी वोडाफोनने आपल्या ४-जी इंटरनेट सेवा आणि कॉलिंगच्या दरात मोठी कपात केली होती. यानंतर या दोन कंपन्यांनी हा सर्वात मोठा निर्णय घेतला आहे, असे सूत्रांचे मत आहे.
या दोन्ही कंपन्यांच्या विलीनीकरणातून उदयास येणारी कंपनी देशातील सर्वात मोठी कंपनी ठरणार आहे. कंपनीचे बाजारातील योगदान ३७ टक्क्यांपर्यंत जाईल. तर, सध्या देशात अव्वल असलेली एअरटेल कंपनी दुसर्‍या क्रमांकावर जाईल.
कुमारमंगलम् बिर्ला अध्यक्षपदी
दरम्यान, कुमारमंगलम् बिर्ला या नव्या कंपनीचे अध्यक्ष होण्याची शक्यता आहे. त्याचप्रमाणे कंपनीचा मुख्य कार्यकारी अधिकारी आयडीयाचा आणि मुख्य आर्थिक अधिकारी वोडाफोनचा असणार आहे. तसेच, नव्या कंपनीसाठी आयडिया आणि वोडाफोनच्या अस्तित्वात असलेल्या पायाभूत सुविधा वापरल्या जाणार आहेत.
वार्षिक उलाढाल
वोडाफोन इंडियाची वार्षिक उलाढाल ५०२५ कोटी रुपये इतकी आहे, तर वोडाफोन मोबाईल सर्व्हिसेसची उलाढाल ४०,३७८ कोटी रुपये आहे. आयडीया सेल्युलरची उलाढाल ३६ हजार कोटी रुपयांची आहे. वोडाफोन इंडियाचा निव्वळ नफा १२,८५५ कोटी आणि वोडाफोन मोबाईल सर्व्हिसेसचा निव्वळ नफा ३७३७ कोटी आहे. तर, आयडीया सेल्युलरचा निव्वळ नफा २४,२९६ कोटींच्या घरात आहे.