मणिपुरातही भाजपा सरकारचे बहुमत सिद्ध

0
112

वृत्तसंस्था
इम्फाळ, २० मार्च
भाजपाप्रणीत आघाडी सरकारने आज सोमवारी मणिपूर विधानसभेतही आपले बहुमत सिद्ध केले. बहुमताच्या परीक्षेत सरकारच्या बाजूने ३३ मते पडली आहेत.
गेल्या आठवड्यात भाजपा सरकारने गोव्यात आपले बहुमत सिद्ध केले होते. त्यानंतर आज मणिपुरातही सरकार बहुमतात असल्याचे सिद्ध झाले. विशेष म्हणजे, मुख्यमंत्री एन. बीरेन सिंह हे राष्ट्रीय स्तरावरील फुटबॉलपटू असलेले पहिले मुख्यमंत्री ठरले आहेत.
६० सदस्यीय मणिपूर विधानसभेत भाजपाला २१, तर कॉंग्रेसला सर्वाधिक २८ जागा मिळाल्या होत्या. दुसर्‍या क्रमांकाचा पक्ष असतानाही भाजपाने लहान पक्षांच्या मदतीने सरकार स्थापन केले. राज्यपालांनी या सरकारला बहुमत सिद्ध करण्यासाठी आज सोमवारची मुदत दिली होती. त्यानुसार, बीरेन सिंह सरकारने आज विधानसभेत विश्‍वासदर्शक ठराव सादर केला. त्यावर मतदान झाले असता, सरकारच्या बाजूने ३३ सदस्यांनी मतदान केले. भाजपाने चार सदस्य असलेल्या नॅशनल पीपल्स पार्टी, चार सदस्यीय नागा पीपल्स फ्रंट, लोकजनशक्ती पार्टीचा एक आणि दोन अपक्ष आमदारांच्या पाठिंब्याने सरकार स्थापन केले आहे.
बहुमताच्या परीक्षेत कुठलाही दगाफटका होऊ नये यासाठी भाजपाने आपले आणि समर्थक पक्षांच्या सर्व आमदारांना गुवाहाटीमधील एका हॉटेलमध्ये थांबविले होते. गुरुवारपासूनच हे सर्व जण गुवाहाटीत होते.