वणव्यापुढे वनविभाग हतबल!

0
127

संजय रामगिरवार
चंद्रपूर, २० मार्च
सध्या अमेरिकेच्या कोलोरॅडोमध्ये मोठा वणवा पेटला आहे. काही माहिन्यांपूर्वी कर्नाटकच्या जंगलाला लागलेली आग विझवताना एक वनकर्मचारी भाजला गेला. गतवर्षी छत्तीसगड राज्यात जंगलांना २४२२, ओडिशात २३४९, मध्यप्रदेशात २२३८, महाराष्ट्रात १६३८, आसाममध्ये १७१९, तर आंध्रप्रदेशात १४१६ आगी लागल्याचे सांगितले गेले. याच काळात नेपाळमध्ये तब्बल २,८०,००० हेक्टर जंगलाला आग लागली. जाणकारांच्या मते, वणव्याची एवढी दाहकता गेल्या काही वर्षातच जग प्रकर्षाने अनुभवत आहे.
दरवर्षी हिमाचल प्रदेश, उत्तराखंड, जम्मू आणि काश्मीर या भागातील जंगल मोठ्या प्रमाणात नष्ट होते. त्या परिसरात वेगाने वाढणारे तापमान, कोरडे वातावरण आणि तेथील चिड तसेच पाईनची झाडे या समस्येचे कारण असल्याचे मत या क्षेत्राचे अभ्यासक प्रा. योगेश दुधपचारे व्यक्त करतात. या झाडांची सुईसारखी पाने उन्हाळ्यात कोरडी पडून गळतात, त्यामुळे ही आग जोरात पसरते. या झाडांचे बुंधे पेट्रोल टाकल्यागत वेगाने पेट घेतात आणि साधरणत: ३० मीटर उंचीचे हे देखणे जंगल पाहता पाहता नष्ट होते. या झाडात मोठ्या प्रमाणात टारपेन आढळतो व तो ज्वलनशील असल्याने तेथील आगी भडकतात. हिमालयातील जंगलांना एवढ्या मोठ्या प्रमाणात लागलेल्या आगी जगभरातील पर्यावरणवादी व हवामानशास्त्रज्ञांचे लक्ष नव्याने आपल्याकडे वळवित आहेत.
आगीवर नियंत्रण मिळविण्यासाठी गतवर्षी भारतात हेलीकॉप्टर व खास बकेट्‌सचा वापर करण्यात आला. नॅशनल डिझास्टर रिस्पॉन्स फोर्स कामाला लागले. पण सॅटेलाईट मॉनिटरिंग सेंटरची मदत घेतली गेली नाही. उत्तराखंडात या आगीने जवळपास २५०० हेक्टर जंगल नष्ट केले असून, त्यात ७ माणसांचा जीवही गेला होता. उत्तराखंडातील जंगलाला लागलेल्या आगीची व्याप्ती आणि ती विझवण्यात आलेले अपयश भारतीय वनखात्याच्या मर्यादा अधोरेखित करते.
दरवर्षी उन्हाळ्यात ठिकठिकाणी अशा आगीच्या घटना घडतात. ती विझवण्यापुरती कारवाई होते. नंतर मात्र आगीचे नेमके कारण, भविष्यातील उपाययोजना याकडे सपेशल दुर्लक्ष केले जाते. महाराष्ट्र राज्यात सर्वाधिक वाघ असणार्‍या ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्पातही गतवर्षी लागलेल्या आगीने चार तासात सहा हेक्टर जंगल नष्ट केले.
यंदा वणव्यासंदर्भात कोणते नवे उपाय योजले आहेत असे विचारले असता, आगीशी सामना करण्यासाठी कर्मचार्‍यांना खास गणवेश देणार असल्याचे ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्पाचे क्षेत्र संचालक जी. पी. गरड यांनी सांगितले. त्यापलीकडे अद्ययावत प्रशिक्षण, तंत्रज्ञानाची मदत आदी बाबींची अद्याप वानवाच असल्याचे ते म्हणाले.
अद्ययावत तंत्रज्ञानाचा अभाव भोवतोय: योगेश दुधपचारे
गत काही वर्षांत वणव्याच्या घटनांत वाढ झाली आहे. तरीही उपग्रह यंत्रणेसारख्या अद्ययावत तंत्रज्ञानाचा उपयोग वनविभाग करताना दिसत नाही. विदेशात अशा यंत्रणांचा वापर होतो. ‘सॅटेलाईट मॉनिटरींग सेंटर’ची मदत घेतल्यास अवघ्या १० मिनिटात कोणत्या अक्षवृत्त व रेखावृत्तादरम्यान आग लागली याची माहिती थेट संबंधित वनपरिक्षेत्र अधिकार्‍यांपर्यंत पोहचू शकते आणि वणवा रोखता येऊ शकतो. पण आपल्याकडे असे अद्याप तरी पाहण्यात आले नाही, अशी खंत वन्यपे्रमी तथा भूगोलाचे प्राध्यापक डॉ. योगेश दुधपचारे यांनी तभाशी बोलताना सांगितले.