जया द्वादशीवार यांचे निधन

0
178

तभा वृत्तसेवा
चंद्रपूर, २० मार्च
स्त्रीवादी साहित्याच्या अभ्यासिका, लेखिका, वक्त्या तथा सन्मित्र महिला बँकेच्या माजी अध्यक्ष प्रा. डॉ. जया सुरेश द्वादशीवार यांचे सोमवार, २० मार्च रोजी सायंकाळी येथील त्यांच्या राहत्या घरी दीर्घ आजाराने निधन झाले. मृत्यूसमयी त्यांचे वय ६९ वर्षे होते. सुप्रसिद्ध लेखक तथा लोकमतचे संपादक प्रा. सुरेश द्वादशीवार यांच्या त्या पत्नी होत्या. त्यांच्या पश्‍चात बराच मोठा आप्तपरिवार आहे.
त्यांची अंत्ययात्रा त्यांच्या भिवापूर वॉर्डातील निवासस्थानाहून मंगळवार, २१ मार्च रोजी सकाळी १० वाजता निघणार आहे. त्यांच्या पार्थिवावर येथील शांतिधाम स्मशानभूमीत अन्त्यसंस्कार करण्यात येणार आहे.
तरुण भारत, लोकसत्ता व लोकमत या मराठी वृत्तपत्रांसोबतच इंग्रजी वृत्तपत्रातही त्यांनी विविध विषयांसह स्त्रीवादी विषयांवर विपुल लेखन केले आहे.
अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन, विदर्भ साहित्य संमेलन, स्त्री साहित्य संमेलन तसेच विविध साहित्य संमेलनात एक वक्ता म्हणून उपस्थिती लावून स्त्रियांच्या विषयांना त्यांनी वाचा फोडली.
चंद्रपुरात महिलांची स्वतंत्र बँक सुरू करण्याची कल्पना त्यांचीच होती. त्यातूनच त्यांनी सन्मित्र महिला बँक सुरू केली. या बँकेचे अध्यक्षपद भूषविताना त्यांच्या कार्यकाळात बँकेला सलग दोनवेळा पहिला व दुसरा राज्यस्तरीय पुरस्कार मिळाला आहे.
विविध पुरस्कारांनी त्यांना गौरविण्यात आले होते. त्यांच्या मृत्यूने स्त्रीवादी साहित्यात पोकळी निर्माण झाल्याची प्रतिक्रिया येथील अनेक मान्यवरांनी व्यक्त केली आहे.