आदित्यनाथ यांना आमदारांनीच निवडले

व्यंकय्या नायडू यांची स्पष्ट भूमिका

0
135

वृत्तसंस्था
नवी दिल्ली, २० मार्च
उत्तरप्रदेशच्या मुख्यमंत्रिपदी योगी आदित्यनाथ यांची निवड करण्यामागे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची कुठलीही भूमिका नव्हती. भाजपाच्या नवनिर्वाचित आमदारांनीच आदित्यनाथ यांची मुख्यमंत्री म्हणून निवड केली, असे भाजपाचे वरिष्ठ नेते आणि केंद्रीय मंत्री एम. व्यंकय्या नायडू यांनी आज सोमवारी स्पष्ट केले.
व्यंकय्या नायडू हे उत्तरप्रदेश भाजपा विधिमंडळ पक्षाच्या बैठकीत केंद्रीय निरीक्षक होते. आजपर्यंत देशातील अनेक राज्यांमध्ये भाजपाचे सरकार स्थापन झाले आहे. या प्रत्येक राज्यात नवनिर्वाचित आमदारांनीच आपला नेता निवडला आहे आणि हीच भाजपाची परंपरा राहिली आहे, असे नायडू म्हणाले. योगी आदित्यनाथ यांच्या निवडीवर विरोधकांकडून टीका होत आहे. त्यांची व्यथा मी समजू शकतो. त्यांनी पराभव आणि जनकौल दोन्ही आनंदाने स्वीकारायला हवा आणि नव्या मुख्यमंत्र्यांना राज्याचा विकास करता यावा, यासाठी सहकार्य करावे, असा सल्लाही नायडू यांनी दिला.
कोणत्याही राज्यात भाजपाचा मुख्यमंत्री निवडण्यात रा. स्व. संघाने कधीच आपले मत दिले नाही आणि भूमिकाही पार पाडली नाही. योगी आदित्यनाथ यांच्या बाबतीत आमदारांच्या बैठकीत जी चर्चा झाली, ती पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शाह यांना कळविण्यात आली. त्यानंतर मी स्वत: नवनिर्वाचित आमदारांची भेट घेतली आणि त्यांचे मत जाणून घेतले. यावेळी आ. सुरेश खन्ना यांनी आदित्यनाथ यांच्या नावाचा प्रस्ताव सादर केला आणि इतर ११ आमदारांनी प्रस्तावाचे समर्थन केले. यानंतर पक्षाचे सर्वच आमदार उभे झाले आणि आदित्यनाथ हेच आमचे नेते असल्याचा एकमुखी सूर काढला, असे नायडू म्हणाले.