दोन्ही मौलवींचा पाक दौरा देशविरोधी

पुरावे असल्याचा सुब्रम्हण्यम् स्वामी यांचा दावा

0
154

वृत्तसंस्था
नवी दिल्ली, २० मार्च
आपल्या बहिणीला भेटण्याचे कारण पुढे करून पाकिस्तानच्या कराचीला गेलेले हजरत निजामुद्दिन दर्ग्याचे मौलवी प्रत्यक्षात पाक सरकारच्या कामानिमित्त गेले होते. त्यांच्याबद्दल आपल्याजवळ गोपनीय माहिती उपलब्ध आहे, असा गंभीर आरोप भाजपा नेते डॉ. सुब्रमण्यम् स्वामी यांनी केला.
पाकमध्ये गेलेले सय्यद असिफ निझामी आणि त्यांचे पुतणे नाझिम अली निझामी बेपत्ता झाले होते. कराचीमधून आम्हाला अज्ञात ठिकाणी नेण्यात आले. आमच्या चेहर्‍यावर काळा कपडा टाकण्यात आला होता. त्या ठिकाणी आम्हाला चहा आणि बिस्किटे देण्यात आली होती, असे असिफ निझामी यांनी म्हटले होते. तथापि, डॉ. स्वामी यांनी त्यांचा दावा फेटाळून लावला. हे दोघेही खोटे बोलत आहेत.
ते स्वत:च त्या ठिकाणी गेले आणि आपल्याला ताब्यात घेण्याचा देखावा रचला, असे स्वामी यांनी म्हटले आहे.
दोन्ही मौलवी भारतविरोधी कृत्य करण्यासाठी पाकला गेले होते. त्यांच्याबाबतची गोपनीय माहिती माझ्याकडे आहे, असा दावा कराताना, दोघांचीही चौकशी करण्यात यावी, अशी मागणी स्वामी यांनी केली.
भारतीय मौलवी मायदेशी परतले
आपल्या बहिणीला भेटण्यासाठी पाकिस्तानच्या कराची शहरात गेल्यानंतर बेपत्ता झालेले दिल्लीतील हजरत निजामुद्दिन दर्ग्यातील दोन मौलवी आज सोमवारी भारतात परत आले.
आज सकाळी त्यांचे दिल्ली विमानतळावर आगमन झाल्यानंतर त्यांच्या कुटुंबीय सदस्य व समर्थकांनी स्वागत केले. मौलवी सय्यद आसिफ अली निजामी आणि त्यांचे पुतणे नाजिम अली निजामी हे गेल्या ६ मार्च रोजी कराचीला गेले होते. त्यानंतर लगेच ते बेपत्ता झाले होते.
असिफ निझामी यांचा मुलगा अमिर याने वृत्तसंस्थेला सांगितले की, दोघांचीही प्रकृती उत्तम आहे. माझ्या वडिलांच्या अली नाझमी यांच्या सुखरूप सुटकेकरिता भारत सरकारने वेळीच हस्तक्षेप केला.
मी सरकारला आभारी आहे. विशेषत: परराष्ट्र  व्यवहार मंत्री सुषमा स्वराज यांचा मी विशेष आभारी आहे.
विशेष म्हणजे, या दोन्ही मौलवींच्या सुटकेबाबत आणि ते सोमवारी मायदेशी येणार असल्याचे ट्विट सुषमा स्वराज यांनी केले होते. त्यानुसार आज सकाळ दोघेही भारतात परतले आहेत. दोन्ही धर्मगुरु सुखरूप आहेत. या दोघांचे मुत्ताहिदा कौमी मूव्हमेंटशी संबंध असल्याच्या आरोपाखाली पाकिस्तानच्या आयएसआय या गुप्तचर संघटनेने त्यांना लाहोरमधील अल्लमा इक्बाल आंतरराष्ट्रीय विमानतळावर १४ मार्चला अटक केली होती.