कोकाकोलाच्या झिरो शीतपेयावर बंदी!

अन्न व औषध विभागाची नोटीस जारी

0
133

वृत्तसंस्था
मुबई, २० मार्च
मॅकडोनॉल्ड्‌स रेस्टॉरण्टच्या सुमारे ६० पेक्षा जास्त शाखांमधून विकल्या जाणार्‍या कोकाकोलाच्या या नामांकित कंपनीच्या झिरो शीतपेयावर बंदी घालण्यात येत असल्याची नोटीस महाराष्ट्र अन्न आणि औषध विभागाने आज सोमवारी जारी केली.
कोकाकोलाच्या या शीतपेयात ‘एस्पार्टेम’ या नावाच्या कृत्रिम स्वीटनरचा (गोडवा आणणारा पदार्थ) समावेश आहे. हा घटक आरोग्यासाठी अपायकारक आहे. त्यामुळे ग्राहकांना ज्या डिस्पोजेबल ग्लासमधून हे पेय दिले जाते, त्या ग्लासवर वैधानिक इशारा छापून पेय विकणे अपेक्षित असल्याचे अन्न आणि औषध प्रशासनाने स्पष्ट केले आहे.
अन्न व औषध प्राधिकरण अर्थात एफडीएच्या अधिनियम २०११ नुसार कॅफिन असलेल्या खाद्यपदार्थ किंवा शीतपेयांच्या बॉक्स, बॉटल आणि कंटेनरवर वैधानिक इशारा देणे अनिवार्य आहे. मात्र मॅकडोनॉल्ड्स रेस्टॉरण्टकडून या नियमांची पायमल्ली होत असल्याचा आरोप अन्न व औषध विभागाने केला.
एस्पार्टेम हा कृत्रिम स्वीटनर लहान मुले आणि गर्भवती महिलांसाठी अपायकारक आहे. साखरेच्या तुलनेत यात दोनशे पट जास्त गोड असल्यामुळे लहान मुलांच्या प्रकृतीला तो जास्त हानीकारक ठरू शकतो. दरम्यान, मॅकडोनॉल्ड्स सोबतच वैधानिक इशार्‍याकडे दुर्लक्ष करून पदार्थांची विशेषत: कोकाकोलाच्या झिरो शीतपेयाची विक्री करणार्‍या सर्व रेस्टॉरण्टना ही नोटीस बजावण्यात आली आहे, असे सूत्रांनी सांगितले.