भिकारी, फेरीवाल्यांच्या वेशात असू शकतात अतिरेकी!

0
185

रेल्वे नेटवर्क निशाण्यावर
अतिदक्षतेचा इशारा

वृत्तसंस्था
मुंबई, २० मार्च
लष्कर-ए-तोयबा, जैश-ए-मोहम्मद आणि इसिस यासारख्या दहशतवादी गटांच्या अतिरेक्यांनी भारतीय रेल्वेला आपल्या निशाण्यावर घेतले असल्याचे कानपूर व भोपाळमधील घटनांनी सिद्ध झाल्यानंतर महाराष्ट्रातील विशेषत: मुंबईकरांची जीवनवाहिनी असलेल्या लोकलला लक्ष्य करण्याची अतिरेक्यांची योजना असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे.
याच अनुषंगाने महाराष्ट्र पोलिसांनी मुंबईसह राज्यभरात अतिसतर्कतेचा इशारा जारी केला असून, रेल्वे विभागालाही पत्र पाठवून सर्व मार्गांवरील सुरक्षा वाढविण्याची मागणी केली आहे.
इसिस व अन्य संलग्न दहशतवादी गट भारतीय रेल्वेलाच टार्गेट करीत असल्याचे गेल्या काही महिन्यांमधील घटनांवरून दिसून आले आहे. गेल्या वर्षीच्या अखेरीस कानपूरमधील रेल्वे अपघातात अतिरेक्यांचाच हात असल्याचे वास्तव समोर आले होते. याप्रकरणी पाकिस्तानची गुप्तचर संस्था आयएसआयच्या हस्तकांना अटक करण्यात आली होती. तर, गेल्या महिन्यात मध्यप्रदेशच्या भोपाळ शहराजवळ पॅसेंजर गाडीतील एका डब्यात झालेल्या स्फोटामागे इसिसचा हात असल्याचा निष्पन्न झाले होते. आता महाराष्ट्रातील रेल्वे नेटवर्क अतिरेक्यांच्या रडारवर असल्याची माहिती गुप्तचर संस्थांनी दिली आहे.
महाराष्ट्रात अतिरेकी संघटना मोठा घातपात घडवू शकतात, अशी शक्यता गुप्तचर यंत्रणांनी वर्तविली आहे. याच अनुषंगाने महाराष्ट्र पोलिसांनी रेल्वेला पत्र पाठविले आहे.
अतिरेकी भिकारी किंवा फेरीवाल्यांच्या वेशात घातपात घडविण्याची शक्यता असल्यामुळे सर्व रेल्वे मार्गांवरील सुरक्षा तसेच रेल्वे स्थानक व रुळांवरील गस्तही वाढविण्यात यावी अशी सूचना पोलिसांनी रेल्वेला दिली आहे.