वेलिंगकर इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंटचा पदवीदान सोहळा

समाज आणि देशाप्रति बांधिलकीची जाणीव ठेवा : गडकरी

0
124

वृत्तसंस्था
मुंबई, २० मार्च
दीर्घकालीन उद्दिष्टांवर लक्ष केंद्रित करून उद्योग-व्यवसाय आणि पर्यावरणाचा सुयोग्य समतोल राखून शाश्‍वत विकासाकडे वाटचाल करावी. समाज आणि देशाप्रति असलेल्या बांधिलकीची जाणीव मनात ठेवून कार्यरत व्हा, असे आवाहन केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी केले.
बिझनेस स्कूल्समध्ये अग्रणी असलेल्या प्रिं. एल. एन. वेलिंगकर इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंटच्या पदव्युत्तर पदविका अभ्यासक्रमाच्या यशस्वी विद्यार्थ्यांना पदविका प्रदान सोहळ्यात ते विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करीत होते.
समारंभाला शिक्षण प्रसारक मंडळीचे नियामक मंडळ आणि वेलिंगकरच्या स्थानिक कार्यकारी समितीचे अध्यक्ष ऍड. एस. के. जैन, समूह संचालक प्रो. डॉ. उदय साळुंखे, शिक्षण प्रसारक मंडळींच्या नियामक मंडळाच्या सभासद माधुरी मिसाळ, पदाधिकारी आदी उपस्थित होते.
केंद्रीय मंत्री नितीन गडकरी म्हणाले की, ज्ञानाचे संपत्तीत रूपांतर करणे ही काळाची गरज आहे, त्यातूनच आपण भारताचे उज्ज्वल भवितव्य घडवण्यात यशस्वी होणार आहोत. तुम्ही देशाचे तरुण नागरिक आहात. तुमच्या व्यवस्थापकीय कौशल्यांचा देशाच्या प्रगती आणि विकासाच्या वाटचालीत मोलाचा सहभाग असणार आहे. त्यासाठी तुम्ही तुमच्या टीममधील लहानमोठ्या सभासदाला बरोबर घ्यायला शिकले पाहिजे. असे नातेसंबंध जपल्याने सांघिक भावना बळकट होतात, त्यातून परिस्थितीवर मात करून यश खेचून आणता येते, मग ते क्षेत्र बिझनेसचे असो व राजकारणाचे.
ऍड. एस. के. जैन यांनी, केंद्रीय मंत्री गडकरींच्या व्यक्तिमत्त्वातील उद्योजक, इनोव्हेटर, राष्ट्रीय पातळीवरील नेता, सामाजिक कार्यकर्ता अशा पैलूंचा वेध घेत ते तरुण पिढीसाठी आदर्शवत आहेत, अशा शब्दात त्यांचा गौरव केला.
समारंभात वेलिंगकरमधील जनरल मॅनेजमेंट, रिटेल, हेल्थकेअर, रूरल मॅनेजमेंट, ई -बिझ, बिझनेस डिझाईनच्या ५२३ गुणवंताना प्रमाणपत्रे प्रदान करण्यात आली. तसेच प्रत्येक अभ्यासक्रमातील ४९ टॉपर्संना विशेष प्रमाणपत्रांनी गौरवण्यात आले. प्रास्ताविकात वेलिंगकर इन्स्टिट्यूटचे समूह संचालक प्रो. डॉ. उदय साळुंखे म्हणाले की, समाज, देश आणि जगाच्या हिताप्रति आपली जबाबदारी ओळखून त्यासाठी योगदान देण्यास तयार असणार्‍या संवेदनशील जागतिक नागरिक नेत्यांना घडवणे ही आपली जवाबदारी आहे, असे मानून आम्ही कार्यरत आहोत.
वेलिंगकरच्या बंगळुरू कॅम्पसचे वरिष्ठ अधिष्ठाता डॉ. अनिल राव पैला यांनी उपस्थितांचे आभार मानले .