व्हाईट हाऊस ट्रम्प यांच्यासाठी असुरक्षित

0
183

वृत्तसंस्था
वॉशिंग्टन, २० मार्च
अमेरिकेच्या राष्ट्रपतींसाठीचे अधिकृत निवासस्थान राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांच्यासाठी असुरक्षित असल्याचे राष्ट्रीय सुरक्षा संस्था सिक्रेट सर्व्हीसच्या एजंटचे म्हणणे आहे. एजंट डॅन बोंगीनो यांच्या मते या निवासस्थानावर दहशतवादी हल्ला झाला तर सिक्रेट सर्व्हीस ट्रम्प यांना वाचविण्याच्या दृष्टीने पुरेशी सक्षम नाही. व्हाईट हाऊसची संरक्षण भिंत ओलांडून जोनाथन टीट्रान हा तरुण उडी घेऊन व्हाईट हाऊस परिसरात आल्याची घटना नुकतीच घडली आहे. जोनाथनला पकडण्यासाठी सिक्रेट सर्व्हीसने अलार्म वाजल्यानंतरही सुरक्षा यंत्रणांनी चटकन कृती केली नाही, असेही बोंगीनो यांंचे म्हणणे आहे.
या माजी सुरक्षा एजंटने यापूर्वी बराक ओबामा व जॉर्ज डब्ल्यू बुश या अध्यक्षांसाठीही काम केलेले आहे. त्याच्या म्हणण्यानुसार व्हाईट हाऊस परिसरातले सिक्रेट सर्व्हीस एजंट जागेवर नसताना दहशतवादी हल्ला झाला तर अध्यक्षांची सुरक्षा अवघड बनते. जोनाथनने भिंत चढून व उडी मारून व्हाईट हाऊस परिसरात प्रवेश केला तेव्हा अध्यक्ष घरातच होते असे सांगून बोंगीनो म्हणाले ओबामा अध्यक्षपदी असतानाही व्हाईट हाऊसची सुरक्षा अनेकदा भेदली गेली होती. २० जानेवारीला ट्रम्प यांनी शपथ घेऊन या निवासात प्रवेश केल्यानंतर सुरक्षा भेदण्याचा हा पहिलाच प्रयत्न असल्याचेही समजते.