युवकांची व्यसनाधीनता समाजासाठी घातक : डॉ. चांदेकर

0
108

व्यसनमुक्ती साहित्य संमेलनाचा समारोप
अभिनेत्री मधुरा वेलणकरची उपस्थिती
तभा वृत्तसेवा
अमरावती, २० मार्च
आज स्पर्धेच्या युगामध्ये अपयश आल्यास युवक-युवती निराशेच्या गर्तेत जातात. त्यातूनच चुकीची संगत, सततचा ताण, अपयशाची भीती व तंत्रज्ञानातून मिळविलेले अपुरे ज्ञान, यामुळे युवकांची व्यसनाधीन होण्याची प्रवृत्ती वाढत आहे. युवकांमधील व्यसनाधिनता उग्र रूप धारण करीत असून ही स्थिती देश व समाजासाठी घातक ठरत आहे. आपल्या भावनांवर नियंत्रण ठेवून युवकांनी सर्वांगीण विकासाचा ध्यास धरावा, असे आवाहन अमरावती विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. मुरलीधर चांदेकर यांनी केले.
सामाजिक न्याय व विशेष साहाय्य विभागाच्यावतीने आयोजित पाचव्या राज्यस्तरीय व्यसनमुक्ती साहित्य संमेलनाच्या अध्यक्ष पदावरून डॉ. चांदेकर बोलत होते.
या समारोपीय कार्यक्रमाप्रसंगी अंमली पदार्थ विरोधी केंद्रीय कक्षाचे संचालक संजय झा, गुरुदेव व्यसनमुक्ती केंद्राचे संचालक आचार्य हरिभाऊ वेरुळकर, बाबा व्यसनमुक्ती केंद्राचे संचालक पंकज वसाडकर, नशाबंदी मंडळाच्या प्रमुख वर्षा विद्या विलास प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित होते, तर अभिनेत्री मधुरा वेलणकर (साटम) हिची विशेष उपस्थिती होती.
डॉ. चांदेकर म्हणाले, व्यसनाच्या विळख्यात अडकलेले अनेक युवक-युवती यातून बाहेर येऊ इच्छितात, पण अपुर्‍या इच्छाशक्तीमुळे ते अशक्य होते. अशावेळी त्यांच्यातील सकारात्मकता वाढवून जीवनाबद्दलचा, घडणार्‍या घटनांबद्दलचा दृष्टिकोन बदलविणे आवश्यक आहे. व्यसनाधीन व्यक्तींचे मनोबल उंचावून आपणच समाजाला व्यसनमुक्त करू शकतो. सुदृढ, निरोगी, आशावादी युवक सर्वांगीण विकासातूनच देशाचा विकास घडवू शकतो, असा विश्‍वास त्यांनी व्यक्त केला.
संजय झा यांनी अंमली पदार्थाच्या सेवनाबाबत असलेल्या अधिनियमाची माहिती दिली. आचार्य हरिभाऊ वेरुळकर यांनी युवकांना व्यसनमुक्त करण्याचे दायित्व समाजावर सोपविले. वर्षा विलास यांनी व्यसनाधीन युवकांच्या आकडेवारीचे प्रमाण सांगून युवकांमध्ये व्यसनांच्या बदलत्या स्वरुपाबद्दल माहिती दिली. मधुरा वेलणकर हिने युवकांना व्यसनमुक्त राहून जीवनाचा आस्वाद घेत परिपूर्ण जीवन जगण्याचे आवाहन केले. यावेळी मुलींचा सहभाग असलेल्या ऑर्केस्ट्राच्या माध्यमातून व्यसनमुक्तीचा संदेश देण्यात आला.