भारताचा विजय हुकला

मार्श-हॅण्ड्‌सकॉम्ब ठरले अडसर

0
175

वृत्तसंस्था
रांची, २० मार्च
काल दोन गडी बाद करणार्‍या रवींद्र जडेजाने तिसर्‍या कसोटीच्या पाचव्या व अखेरच्या दिवशी आणखी दोन गड्यांची भर घालून भारताच्या आशा अधिक पल्लवित केल्या, परंतु पीटर हॅण्ड्‌सकॉम्ब (नाबाद ७२) व शेन मार्शने (५३) चिवट झुंज देत ऑस्ट्रेलियाला पराभवाच्या संकटातून वाचविले व ऍलन बॉर्डर-सुनील गावस्कर ट्रॉफी कसोटी क्रिकेट मालिकेतील भारताविरुद्धचा तिसरा सामना अनिर्णीत राहिला.
ऑस्ट्रेलियाने दुसर्‍या डावात ६ बाद २०४ धावा काढल्या होत्या. पीटर हॅण्ड्‌सकॉम्ब ७२ धावांवर नाबाद राहिला. ऑस्ट्रेलियाने ५० पेक्षा अधिक धावांची आघाडीसुद्धा मिळविली होती. भारतीय संघ पाचव्या दिवशी ऑस्ट्रेलिया संघाला बाद करण्यात अपयशी राहिला आणि हा कसोटी सामना अनिर्णीत राहिला. चार कसोटी सामन्यांच्या मालिकेत भारत-ऑस्ट्रेलिया १-१ ने बरोबरीत आहे.
रांचीच्या मैदानावरील हा पहिलाच कसोटी सामना होता आणि चौथ्या दिवशी भारतीय संघाला विजयाच्या आशेचे चिन्ह दिसू लागले होते; परंतु ऑस्ट्रेलियाने भारताचे मनसुबे उधळून लावले. यासोबतच ऑस्ट्रेलियाने भारताला या मैदानावर पहिला विजय नोंदविण्यापासूनसुद्धा रोखले.
ऑस्ट्रेलियाने पहिल्या डावात कर्णधार स्मिथच्या नाबाद १७८ धावांच्या खेळीच्या जोरावर ४५१ धावा उभारल्या. भारताकडून जडेजाने ५ बळी टिपले होते. प्रत्युत्तर देताना भारताने ९ बाद ६०३ धावांचा डोंगर रचून आपला पहिला डाव घोषित केला. यात चेतेश्‍वर पुजाराने (२०२) ऑस्ट्रेलियाविरुद्धचे दुसरे व कारकीर्दीतले तिसरे द्विशतक झळकावले तसेच रिद्धिमान साहाने ११७ धावांची शतकी खेळी केली. जडेजाने नाबाद ५४ धावांची अर्धशतकी योगदान दिले. पहिल्या डावातील या खेळाच्या आधारावर भारताने १५२ धावांची आघाडी मिळविली होती.
ऑस्ट्रेलियाच्या दुसर्‍या डावाच्या प्रारंभीच जडेजाने दोन महत्त्वपूर्ण गडी बाद केल्याने भारताच्या विजयाच्या आशा पल्लवित झाल्या. सोमवारी सामन्याच्या पाचव्या दिवशी ऑस्ट्रेलियाने २ बाद २३ धावांवरून पुढे खेळण्यास सुरुवात केली. ईशांत शर्माने रेनशॉला (१५) पायचित केल्यानंतर जडेजाने आणखी दोन गड्यांना बाद करून ऑस्ट्रेलियाच्या तंबूत खळबळ माजविली. परंतु त्यानंतर शेन मॉर्श व पीटर हॅण्ड्‌सकॉम्बने भारतीय गोलंदाजांचा संयमाने सामना केला. दोघांनीही अर्धशतके साजरे करीत सामना अनिर्णितावस्थेकडे झुकविला. डावखुरा फिरकी गोलंदाज रवींद्र जडेजाने ५४ धावात ४ बळी टिपले. त्याने या सामन्यात एकूण ९ बळी टिपले. अश्‍विन व शर्माने प्रत्येकी एक गडी बाद करण्यात यश मिळविले.
या कसोटी मालिकेत उभय संघ १-१ ने बरोबरी असून आता धर्मशाला येथे २५ ते २९ मार्चदरम्यान खेळला जाणारा चौथा व अंतिम कसोटी क्रिकेट सामना निर्णायक ठरेल.
धावफलक : ऑस्ट्रेलिया पहिला डाव : सर्वबाद ४५१.
भारत पहिला डाव : ९ बाद ६०३ डाव घोषित.
ऑस्ट्रेलिया दुसरा डाव : डेव्हिड वॉर्नर त्रि.गो. १४, मॅट रेनशॉ पायचित गो. शर्मा १५, नॅथन लियोन त्रि.गो. जडेजा ०२, स्टिव्ह स्मिथ त्रि.गो. जडेजा २१, शॉन मार्श झे. विजय गो. जडेजा ५३, पीटर हॅण्ड्‌सकॉम्ब नाबाद ७२, ग्लेन मॅक्सवेल झे. विजय गो. अश्‍विन ०२, मॅथ्यू वॅडे नाबाद ०९, अवांतर १६, एकूण १०० षटकांत ६ बाद २०४.
गडी बाद होण्याचा क्रम : १-१७, २-२३, ३-५९, ४-६३, ५-१८७, ६-१९०.
गोलंदाजी : आर. अश्‍विन ३०-१०-७१-१, रवींद्र जडेजा ४४-१८-५४-४, उमेश यादव १५-२-३६-०, ईशांत शर्मा ११-०-३०-१.