हे राम! सीताराम…

0
180

अग्रलेख

कोणत्या गोष्टीचा, प्रसंगाचा अथवा घटनेचा गहजब कसा करायचा, थयथयाट- कांगावाखोरी कशी करायची, हे शिकायचे असेल, तर देशातील डाव्या विचारांच्या नेत्यांकडूनच शिकायला हवे! देशातील यच्चयावत सगळ्या घटनात्मक सांस्कृतिक संघटनांचे कर्तेधर्ते आणि विद्यापीठातील विभिन्न अध्यासनांचे, घटनात्मक पदांचे प्रमुख गेल्या ६०-७० वर्षांपासून डावे विचारकच राहतील, याची काळजी डाव्यांनी कॉंग्रेसच्या मदतीने आजवर घेतलेली होती, हे कुणी, कसे विसरू शकेल? रोहित वेमुलाच्या आत्महत्येचे किती म्हणून भांडवल केले या डाव्यांनी? एका ओबीसी विद्यार्थ्याच्या हत्येसाठी विद्यापीठाच्या प्रशासनाला दोषी धरताना, सारी यंत्रणाच ‘सवर्णी’ ठरवून टाकली हो यांनी! आजवर त्याच यंत्रणेने शेकडोे, हजारो दलित विद्यार्थ्यांचे केलेले कल्याण डावे एका क्षणात विसरले की हो! कन्हैयाकुमारच्या बाबतीतही काही वेगळे घडले नाही. डावे मजहबीच येथील गहजबी झाले. विद्यापीठांना यांनी राजकारणाचा आखाडाच करून टाकले. विद्यापीठांमध्ये ‘भारत तेरे टुकडे होंगे’, ‘हमे चाहिये आझादी’ असे नारे देणार्‍यांना डाव्यांनी अभिव्यक्तिस्वातंत्र्याच्या नावे टाहो फोडत राष्ट्रद्रोही नव्हे, तर देशप्रेमी ठरवून टाकले! मध्यंतरी भारत सोडून जावेसे वाटणार्‍या आमिर खानच्या पत्नीच्या मागे खंबीरपणे उभे राहणार्‍या डाव्यांनी, देशात असहिष्णुता वाढल्याचा कांगावा करण्यासदेखील मागेपुढे पाहिले नाही! याच नाटकाच्या पुढच्या एण्ट्रीत त्यांनी तथाकथित पुरोगामी लेखक आणि साहित्यिकांच्या पुरस्कार वापसीचा डाव रचला. मध्यंतरी इतिहास पुनर्लेखनाला भगवीकरणाची मोहीम ठरवून टाकले. पण, प्रत्येक वेळी त्यांचा डाव त्यांच्यावरच उलटला! रोहित वेमुला दलित नसल्याचे सिद्ध झाले आणि त्याच्या आत्महत्येची वैयक्तिक कारणेही पुढे आली. असेच एकामागोमाग सार्‍याच कारस्थानांबाबतचे खुलासे झाले आणि डाव्यांनी उभारलेल्या आंदोलनांचे फुगे घासून घासून गुळगुळीत झालेल्या टायरमधील ट्युबप्रमाणे पंक्चर झाले. सध्या देशात कुठेच काहीच करण्यासारखे दिसत नसल्याने, डाव्यांनी नागपुरात रद्द झालेल्या सीताराम येचुरींच्या जाहीर कार्यक्रमाचे निमित्त साधून पुन्हा एकदा हिंदुत्व, राष्ट्रीयत्व, भारतीयत्व, स्वातंत्र्य, समता, बंधुता, लोकशाही, डॉ. आंबेडकर, आरक्षण, खाजगीकरण, दलितांवरील अत्याचार… आदी मुद्दे उपस्थित करून गहजब करण्याची आखणी केली. पण, नागपूरकरांनी येचुरींच्या भाषणाला जय ‘सीता’राम केल्याने, त्यांना तोंडाची वाफ दवडत आल्या पावली परतावे लागले. मुळात एखाद्या विद्यापीठाने आयोजित केलेले भाषण ऐनवेळी रद्द जरी झाले असेल, तरी त्यामागे केवळ राजकारणच असले पाहिजे, असा विचार न करता पुढे ढकललेल्या कार्यक्रमाची वेळ आणि स्थान याची वाट आयोजकांनी आणि स्वतः येचुरी यांनी बघायला हवी होती. ‘लोकशाहीचा र्‍हास ः आव्हाने आणि उपाय’ या विषयावरील व्याख्यानाच्या आयोजनाची तसेच पत्रिकेत कुलुगरूंचे नाव टाकण्याची लेखी परवानगी घेतली होती काय, याची शहानिशादेखील करण्याची गरज होती. पण, स्वतःचा वैचारिक र्‍हास झालेल्यांना तसे सुचलेदेखील नाही. विद्यापीठाच्या एका घटनात्मक पदावरील व्यक्तीच्या बदनामीची एकही कसर बाकी न ठेवता ‘सीतेचा’ राम म्हणवणारे येचुरी, विद्यापीठातील पुरुषोत्तमावर अमर्याद शेलक्या शब्दांत टीका करीत राहिले. घटनात्मक पदावरील तेही विद्यापीठाच्या कुलगुरूंना नसत्या वादात ओढून येचुरींनी नागपुरातील सांस्कृतिक वातावरण गढूळ करण्याचेच काम केले आहे. खरे तर लोकशाहीचा र्‍हास, या देशात मोदी पंतप्रधान झाल्यापासून सुरू झालेला आहे, की तो गेल्या ६०-७० वर्षांत कॉंग्रेसला पाठिंबा देणार्‍या डाव्यांच्या देशविरोधी भूमिकांमुळे झालेला आहे, याचीच चिरफाड केली जायला हवी. स्वातंत्र्य, समता आणि बंधुतेसाठी वर्षानुवर्षे तुम्ही झगडता आहात, दलितांना न्याय मिळवून देण्यासाठी झटता आहात, देशातील अल्पसंख्यकांबद्दल तुमच्याएवढा कळवळा कुणालाच नाही, असे जर खरेच असते, तर आज देशात तुमच्या लोकप्रतिनिधांना शोधण्यासाठी भिंग घेऊन बाहेर पडण्याची वेळ आली नसती! लोकांनी पाच राज्यांच्या निवडणुकांमध्ये तुम्हाला अस्तित्वहीन करून टाकले नसते. उत्तरप्रदेशात साधी एक जागासुद्धा जिंकता न येणारा तुमचा पक्ष राष्ट्रीय कसा आणि तुमच्या झालेल्या र्‍हासाची आव्हाने आणि उपाय यावर विचार करण्याऐवजी तुम्हाला लोकशाहीच्या र्‍हासाबद्दल बोलण्याचा अधिकार तरी उरतो काय, असा प्रश्‍न आम्ही उपस्थित करू इच्छित नाही. येचुरीजी, तुमच्या साहसाला नमनच करायला हवे. तुम्ही आणि लोकशाहीबद्दल बोलावे! यासारखा दुसरा विनोद असूच शकत नाही. केरळमध्ये तुमच्या मार्क्सवादी गुंडांनी आजवर संघ, भाजपा आणि विश्‍व हिंदू परिषदेच्या अडीचशेवर कार्यकर्त्यांच्या ज्या हत्या केल्या, त्याबद्दल तुम्ही ब्रदेखील काढायला तयार नाही आणि कुठल्याशा बॉम्बस्फोटात आणि दंग्यात आमचेही सात कार्यकर्ते ठार झाले, यासाठी तुम्ही संघ परिवारातील लोकांना दोष देत फिरतआहात? कुठे सात जणांचे गेलेले बळी आणि कुठे २५० निरपराध कार्यकर्त्यांच्या (ज्यात स्त्रिया, लहान मुले आणि ज्येष्ठ नागरिकांचाही समावेश आहे) झालेल्या हृदयद्रावक हत्या? तुम्ही करीत असलेली तुलनाच व्यर्थ आहे. मुख्यमंत्री पिनाराई विजयन् यांच्यावर असलेल्या एका संघ स्वयंसेवकाच्या हत्येच्या आरोपाची चौकशीच तुमच्या लोकांनी दाबून टाकली, त्यावर काही प्रकाश टाकला असता तर लोकशाहीचा केरळमध्ये दाबला जात असलेला गळा सार्‍यांना दिसून आला असता. तुमच्या सरकारच्या नाकाखाली सिंगूरमध्ये झालेले हत्याकांड कार्यकर्त्यांनी केलेल्या अभिव्यक्तीमुळेच झाले, हेदेखील जगाला कळू द्यायचे होते. जागोजागी डाव्या विचारकांनी चालवलेल्या बौद्धिक दहशतवादाने युवा प्रतिभा कशा पोळल्या गेल्या, याचाही ऊहापोह केला असता, तर तुमच्या भाषणाचा विषय सार्थकी लागला असता. दलितांना, कष्टकर्‍यांना, शेतकर्‍यांना आणि हो, मागासवर्गीयांनादेखील तुमचा कळवळा का कळू नये, याचेदेखील आश्‍चर्यच आहे की नाही? पण नागपूकरांनीच, भाषण रद्द झाल्याने होणारी तुमची मानहानी रोखली. लोकशाहीचा र्‍हास, दलितांचे कल्याण, मागासवर्गीयांवरील अत्याचार, समतेवर आधारित भारतीयत्व… असे शब्द उच्चारणार्‍या कुणालाही व्यासपीठ उपलब्ध करून देण्याची काही नागपूरकरांची जुनी खोड आहे. या देशातून जातिप्रथा नष्ट करा म्हणून हे गळे काढतात, पण ज्या वेळी भारतीयत्वासाठी लढा देणार्‍या व्यक्ती दीक्षाभूमीवर भेट द्यायला जाऊन जातिविरहित समाजाच्या निर्मितीसाठी पुढाकार घेणारी कृती करतात, तेव्हा यांनाच डॉक्टर आंबेडकरांचा पुतळा पाण्याने धुवून काढावासा वाटतो! येचुरीजी, एकतर तुम्ही ढोंग घेतलेले आहे किंवा आयोजकांनी तरी ढोंग रचलेले आहे. त्यामुळे उगाच गहजब करण्यापूर्वी शहानिशा करण्याची तसदी तेवढी घ्यायची असती, एवढेच आमचे सांगणे आहे.