रा. स्व. संघ : राष्ट्रसेवेची ९० वर्षे

0
111

राष्ट्रार्थ

गेल्या विजयादशमीला संघस्थापनेला ९० वर्षे पूर्ण झालीत. त्यानिमित्त दिल्ली येथून प्रकाशित ‘ऑॅर्गनायझर’ व ‘पांचजन्य’ या अनुक्रमे इंग्रजी व हिंदी साप्ताहिकांनी संघाचे सरकार्यवाह भैयाजी जोशी यांची मुलाखत घेतली. त्यात भैयाजींनी संघस्थापनेसाठी केलेल्या प्रयत्नांपासून ते संघाला समाजाकडून व्यापक व चिरस्थायी मान्यता मिळाली या काळापर्यंत भाष्य केले. संघावरील आरोपांबाबत तसेच चुकीच्या धारणांबाबतही त्यांनी निर्भीडपणे उत्तरे दिलीत. त्यातील प्रमुख अंश तरुण भारत वाचकांसाठी प्रकाशित करीत आहोत.

आपण संघाच्या या ९० वर्षांच्या वाटचालीकडे कसे बघता? या काळात समाजाला संघाचे सर्वात मोठे योगदान किती व कसे?
-हे कार्य सुरू झाले तेव्हा ही कल्पना स्पष्ट होती की, हिंदू समाजासाठी जे काही करायचे ते हिंदू समाजात करायचे व हिंदू शक्तीच्या आधारावरच करायचे. सर्वसामान्य व्यक्ती जे करू शकेल अशीच कार्यपद्धती सुरू झाली. मैदानात एकत्र यावे, खेळावे, कुदावे, आपापसात गप्पा कराव्यात, गाणी म्हणावी इत्यादी… कोणत्याही बौद्धिक, चर्चा किंवा चिंतनाचे विषय जास्त नव्हते. जे सामान्य व्यक्ती करू शकेल असेच कार्यक्रम असत.
या कालावधीत संघाच्या योगदानाबद्दल मी तीन मुद्दे सांगू शकेन. एक- काश्मीरपासून कन्याकुमारीपर्यंत सर्वसामान्य माणसात, हे माझे राष्ट्र आहे ही भावना निर्माण केली. दोन- सामान्य माणूस समाजासाठी विधायक काम करू शकतो ही कल्पना साकार करून दाखवली व तिसरे म्हणजे- संघाने सुरुवातीपासून सांगितले आहे की, आम्हाला समाजाच्या सर्व प्रश्‍नांची जाण आहे त्यामुळे समस्या निर्माण करण्यापेक्षा, त्या सोडविणारे कार्यकर्ते तयार होतील, अशी कार्यपद्धती निर्माण केली.
या गेल्या वर्षांच्या प्रवासात अनेक अडथळे आणले गेलेत. तरीही संघाने आपली वाटचाल सुरू ठेवली. हे कसे घडले?
-या प्रवासातले काही टप्पे आहेत. पहिला १९२५ ते १९४० पर्यंतचा कालखंड. या कालावधीत हिंदूंचे संघटन होऊ शकते हे सिद्ध झाले. १९४८ पर्यंत संघ एक शक्ती म्हणून वर आला. स्वातंत्र्यपूर्व काळात देशात जे वातावरण होते त्यात हिंदू समाजात आत्मविश्‍वास निर्माण करणारा जर कोणी असेल तर तो संघच होता. अन्य सर्व नेते आपली चिंता करण्यात मग्न होते. पुढील टप्पा मी १९४८ ते १९७७ पर्यंतचा मानतो. या काळात संघकार्याचा विस्तार देशाच्या सर्व प्रांतात व जिल्ह्यापर्यंत गेला. दुसरे संघाची कार्यपद्धती पूर्णतः विकसित होत गेली. संघाची विचारधारा समाजाला स्पष्ट झाली व संघाच्या आवश्यकतेची जाणीव समाजाला झाली. पूजनीय गुरुजी १९७३ पर्यंत सरसंघचालक होते. याबाबतीत त्यांचे योगदान फार मोठे आहे.
१९७५ नंतरचा कालावधी हा समाजाच्या परिवर्तनाची प्रक्रिया सुरुवात करणारा कालखंड होय. मग ते राम जन्मभूमीचे आंदोलन असो, ज्यात समाजाची शक्ती प्रकट झाली किंवा सामाजिक समरसतेच्या विषयाला पुढे नेणारा उडप्पीचा कार्यक्रम, ज्यात समाजातील सर्व घटकांनी एकमुखाने सांगितले की, भेदाभेद मानणे हे सर्व प्रश्‍नांचे मूळ आहे व ते पूर्णपणे दूर झाले पाहिजे. आणिबाणीनंतर या विषयाच्या व्यावहारिक बाजूंचा शोध घेतला गेला. १९७७ नंतर संघकाम दुपटीने वाढले व अशा सर्व समस्यांच्या निराकरणाच्या प्रक्रियेला प्रारंभ झाला.
१९९० डॉ. हेडगेवार जन्मशताब्दी वर्ष. हा यानंतरचा महत्त्वाचा टप्पा. संघ स्वयंसेवकांच्या समाजाबद्दलच्या भावना प्रकट झाल्या पाहिजेत आणि त्यादेखील सेवाकार्याच्या द्वारा याची जाणीव झाली. त्यानंतर आम्ही वेगवेगळ्या क्षेत्रात पदार्पण केले. १९९० नंतर सेवा, प्रचार, संपर्क, धर्मजागरण अशा अनेक क्षेत्रांना कामात जोडण्यात आले. त्यानंतरचा टप्पा हा २००६-०७. हे श्री गुरुजींचे जन्मशताब्दी वर्ष म्हणून साजरे केले गेले. या काळात समाजाच्या सर्व वर्गांमध्ये संघ पोहोचला. जात हा तसा क्लिष्ट विषय मानला जातो. आम्हाला लक्षात आले की, समाजसमूहांच्या नेत्यांना या प्रक्रियेत जोडण्यासाठी आणखीन काही पावले उचलावी लागतील. ही प्रक्रिया २००६ नंतर अधिक गतिमान झाली. सामाजिक सद्‌भावना बैठकांना सुरुवात झाली. अशी ही गेल्या ९० वर्षांची वाटचाल आहे.
संघ ही खरोखर सर्व भारतीयांना एकत्र आणणारी चळवळ, असे आपण म्हणू शकतो का?
-आम्ही नेहमी हिंदू संघटनेबद्दल बोलत असतो; पण अपेक्षा अशी आहे की, सर्व समाज एकत्र आला पाहिजे. याची पहिली पायरी म्हणजे जो स्वतःला हिंदू समजतो अशांना शक्तिशाली बनविणे. संघाने हिंदूंची व्याख्या केली नाही. बाळासाहेब देवरसांनी हिंदू या शब्दाची व्याख्या अशी केली की, जो/जी स्वतःला हिंदू म्हणवतो तो हिंदू. यापेक्षा सरस व्याख्या होऊ शकत नाही. आम्हाला शब्दांना घेऊन कोणतीही गोंधळाची स्थिती उत्पन्न होऊ द्यायची नाही. आम्ही एवढेच म्हणतो की, प्राथमिकतेने आम्ही, जे हिंदू आहेत त्यांच्या संघटनेसाठी काम करू. हे सार्‍या समाजाला एकत्र आणण्याचे अभियान आहे. जे योग्य आहे व योग्य दिशेनेच जात आहे.
महात्मा गांधींच्या विचारातसुद्धा सनातन भारतीय चिंतन आणि जीवन मूल्ये जसे- स्वधर्म, स्वराज, स्वदेशी, स्वधर्म, गौरक्षा, आध्यात्मिकता, शुचिता, चारित्र्य निर्माण इ. आहेत. संघसुद्धा याच मूल्यांवर काम करतो. तरीही संघाला गांधीविचारांचा विरोधक का मानण्यात येते? ते इतक्या टोकापर्यंत की, गांधीहत्येबद्दल जबाबदार, अशा प्रकारचे आरोपही होतात.
-स्वतंत्रता आंदोलनाशी जर कोणा एका व्यक्तीचे नाव पूर्णतः जोडले जात असेल तर ते गांधीजींचे. १९४७ ला स्वातंत्र्य मिळेपर्यंत गांधीजींचेच नेतृत्व होते. स्वतःला गांधीजींचे अनुयायी म्हणविणारे सांगत की, गांधीजी आमचे आहेत. आम्ही असे म्हणतो की, गांधीजी सर्व देशाचे आहेत. गांधीजीदेखील म्हणत की, स्वातंत्र्यप्राप्तीसाठी जो मंच (कॉंग्रेस) आपण उभा केला होता त्याची आता आवश्यकता नाही. पण राजकीय दृष्टी ठेवणारे जे लोक होते त्यांना जाणीव होती की, त्यांचे भविष्य या नावानेच उभे राहणार आहे. त्यांनी गांधीजींचा हा सल्ला मानला नाही व पुढे दुर्दैवाने गांधीजींची हत्या झाली.
गांधीजींच्या काही राजकीय विचारांशी आमचे मतभेद असू शकतील; पण देश, समाज, भारतीय चिंतन याविषयी त्यांनी जे विचार मांडले त्याविषयी संघाची कधीही असहमती नव्हती. तरीही ज्या लोकांना (संघ) या उभ्या राहणार्‍या शक्तीला दुर्बल करावयाचे होते त्यांना गांधीजींची हत्या ही संधी मिळाली आणि त्यांनी महात्माजींच्या हत्येचा आरोप संघावर लादला. कारण संघ हा आपला राजकीय प्रतिस्पर्धी म्हणून उभा राहील अशी त्यांची धारणा होती. त्यामुळे कोणत्या ना कोणत्या प्रकाराने संघाला संपवणे त्यांना आवश्यक वाटत होते. भारतीय जनमानस गांधीजींच्या विशुद्ध जीवनाने प्रभावित होते. त्यामुळे हा मुद्दा वारंवार उचलला गेला. पण असे जितके प्रयत्न झालेत त्यावर आलेल्या प्रतिक्रियांचा परिणाम असा झाला की, या लोकांना माघार घ्यावी लागली. आम्ही पूर्ण विश्‍वासाने असे सांगू शकतो की, कोणीही, केव्हाही या विषयाच्या कायदेशीर लढाईत जिंकू शकणार नाही. आम्ही प्रामाणिकपणे समाजासमोर आलो. कोणत्याही परिस्थितीत आम्ही गांधीविरोधी किंवा हत्यारे आहोत ही खोटी कहाणी सिद्ध होणे असंभव आहे.
आपल्याला असे वाटते का की, अजूनही संघाविषयी अनेक गैरसमज समाजात आहेत, ज्या विषयीची स्पष्टता होणे आवश्यक आहे?
-नक्कीच असे आहे. या विषयीचे काही गैरसमज आमच्या विरोधकांनी निर्माण केलेले आहेत, तर काही गैरसमज आमच्या विशिष्ट कार्यपद्धतीमुळे आहेत. माझी अशी धारणा आहे की, संघ काम ज्या प्रकारे वाढत आहे- आम्ही ग्रामीण क्षेत्रात, सेवा वस्तीत (झोपड्यांमध्ये), समाजातील वेगवेगळ्या जाती-जमातीत, अनुसूचित जाती-जमातीत विभिन्न सेवा उपक्रमांद्वारा पोहोचत आहोत. यामुळे असे गैरसमज दूर होतील याची आम्हाला खात्री आहे. स
(क्रमश:)

प्रफुल्ल केतकर