आत्मविकासाची वाटचाल

0
133

कल्पवृक्ष

‘दी ऍनिमल स्कूल’ नावाची एक गोष्ट आहे. काही प्राण्यांच्या मनात विचार येतो की नवीन जगात स्पर्धेत टिकायचे असेल, तर आपल्या नव्या पिढीला वेगळ्या पद्धतीने शिक्षण देण्याची आवश्यकता आहे. सर्वांनाच हा विचार पटल्यामुळे एक शाळा सुरू करण्यात येते. काही बुद्धिमान प्राणी अभ्यासक्रम तयार करतात. चार मूलभूत विषयांत सर्व प्राणी तरबेज असले पाहिजेत, तरच त्यांचा सर्वांगीण विकास होईल, असा निष्कर्ष निघतो. ते चार विषय म्हणजे पोहणे, धावणे, उडणे व झाडावर चढणे. या चारही विषयांचे प्रशिक्षक नेमले जातात. शाळा धडाक्यात सुरू होते. बदक पोहण्यात उत्तम असल्यामुळे त्याला उडण्याचे प्रशिक्षण देण्यात आले. त्याने बर्‍यापैकी प्रगती केली. धावण्याकरिता मात्र त्याला ट्युशन क्लास लावावा लागला. त्यांनी खूपच मेहनत घेतली. त्याच्या पायातील बोटांमधले पडदे फाटेपर्यंत सराव केला. त्यामुळे पोहण्यात तो काठावर पास झाला. ससा धावण्यात अव्वल होता. पण पोहण्यात प्रगती होत नसल्यामुळे फारच निराश होता. खार झाडावर चढण्यात उत्कृष्ट होती. पण उडण्याचे प्रशिक्षण घेताना मात्र ती त्रासून गेली. कारण शिक्षक तिला जमिनीवरून झाडावर उडायला लावत. कधी वर फेकत. पायांचा आणि शेपटीचा उपयोग तिला योग्यपणे करता येत नसल्याबद्दल सारखे टोचत असत. घोडा चढणे शिकताना इतका थकून गेला की धावण्यात त्याला ‘ड’ श्रेणी मिळाली. गरुड त्या शाळेत सर्वात बेशिस्त होता. झाडाच्या उंच टोकावर तो चढून तर जात असे, पण शिक्षकांनी सांगितलेल्या पद्धतीने तो चढत नसे. या बेशिस्तीबद्दल त्याला वारंवार सूचित केले जायचे. वर्षअखेर विचित्र दिसणारा ईल मासा, सर्व विषयांत थोडे तरी येत असल्यामुळे प्रथम क्रमांकात आला. कारण तोच मुख्य निकष होता.
ही गोष्ट वाचताना खूप गंमत येते. पण आपण सूक्ष्म निरीक्षण केले तर असाच व्यवहार सुरू असल्याचे आपल्या लक्षात येईल. प्रत्येक माणूस वेगळा असतो. त्याच्या क्षमता, कल, रुची, स्वभाव यात वेगळेपणा असतो. ‘घटा घटाचे रूप आगळे, प्रत्येकाचे दैव वेगळे’ असे माडगूळकर एका गीतात सार्थ वर्णन करतात. माणूस स्वतःही हे समजून घेत नाही. लोकही हे समजून न घेता समान अपेक्षा सर्वांकडून करत असतात. आयआयटीची प्रवेश परीक्षा देणाचे कारण काय? असा उत्सुकता म्हणून मुलांना प्रश्‍न विचारला. प्रवेश घेण्याचे एकाचे कारण, या पदवीला प्रतिष्ठा आहे, दुसर्‍याचे पैसा मिळतो, तर तिसर्‍याचे पालक म्हणतात म्हणून, अशी उत्तरे होती. आपण काय आहोत याचा शोध माणूस घेतच नाही. आपल्या व्यवस्थेत ती प्रक्रिया अंतर्भूत नाही. सामाजिक दबावाला आपण बळी पडतो. अनुकरण करतो. कोणाच्या तरी प्रभावात येतो. आपल्या अंगभूत क्षमतांकडे दुर्लक्ष करतो. आपले शक्तिस्थान व मर्यादा न ओळखता आल्यामुळचे दिशाहीनता व दुःख वाट्याला येते. ज्याला हे लवकर साधते तो आत्मिक आनंद, प्रगती व निर्मितीचा धनी होतो. प्रत्येक माणसाच्या वेगळेपणाचा सन्मान करण्याचे सामाजिक वातावरण आपल्याकडे आहे काय? माणसाचा लहान-मोठेपणा आपण पैसा व पदावरून ठरवतो. मानवी संबंधांचा आधारही अनेकदा हाच असतो. सर्वांची जीवन जगण्याची स्वप्ने, जीवनशैली ही समान होत आहे. वाहिन्यांवर दिसणारे पंचतारांकित जीवन जगण्याची ओढ सर्वांना लागली आहे. अशा वातावरणात विभिन्न प्रतिभा, नवे प्रयोग करण्याचे साहस कसे विकसित होणार. प्रचंड विविधता असलेल्या जगाला खरे म्हणजे अक्षरशः विविध क्षमता असलेल्या माणसांची गरज असते. त्यातूनच समृद्धी आणि आनंदाच्या शेकडो वाटा जन्म घेतात.
गीतेत श्रीकृष्ण हाच उपदेश देतात.
श्रेयान्स्वधर्मो विगुणः परधर्मात्स्वनुष्ठितात् |
स्वधर्मे निधनंम श्रेयः परधर्मो भयावहः
धर्म म्हणजे कर्तव्य, आपले कर्म. त्याकरिता आपल्या ‘स्व’ चा शोध लागला पाहिजे. मग या स्वच्या धर्माचे मृत्यूपर्यंत पालन करणेच श्रेयस्कर असते. आपल्या कर्तव्यात कमीपणा वाटण्याचे कारण नाही. त्यात कमी वाटल्यामुळे माणूस दुसर्‍याचे अनुकरण करण्याचा प्रयत्न करतो. यातूनच भयावह स्थिती निर्माण होेते.
पॉंडेचरीच्या माताजी एके ठिकाणी म्हणतात, ‘बी युअरसेल्फ, ट्रान्सफार्म युअरसेल्फ, ट्रान्सेण्ड् युअरसेल्फ’ गुणदोषांसह स्वतःला जाणून घ्यावे लागते. ‘स्व’ रूपाचा स्वीकार करावा लागतो. आपल्या ठायी असलेल्या क्षमतांचे विकसित स्वरूप कल्पनेने जाणून, त्याचे संवर्धन करण्याचा प्रयत्न करावा लागतो. हीच आपली आत्मविकासाची वाटचाल. हाच आपला स्वधर्म. त्याचा बोध मात्र कधी होतो यावरच सारे अवलंबून आहे.
रवींद्र देशपांडे,८८८८८०३४११