वसंतोत्सव!

0
128

प्रबोधन

आमचे शालेय जीवन कुटुंबाशी, गावाशी, परिसराशी, निसर्गाशी, समाजाशी, राष्ट्राशी जोडलेले होते. जे आम्ही वर्गात शिकत होतो त्याचं प्रात्यक्षिक आम्ही आमच्या अवतीभवती अनुभवत होतो. रसाळ गोमटी फळं चाखायला मिळावीत असे वाटत असेल, तर त्यासाठी झाडाला मोहोर आल्यापासून ते झाड पाडाला लागेपर्यंत वाट पाहावी लागते, धीर धरावा लागतो, हे बाळकडू आम्हाला आमच्या शालेय शिक्षणातून, कुटुंबाकडून मिळाले.
गुरुजी आम्हाला प्रत्येक ऋतूतले रंग, रूप, रस, गंध, स्पर्श, फळ यांची ओळख करून द्यायचे, त्यांचा आस्वाद घ्यायला शिकवायचे. ऋतुदर्शन शब्दाचा अर्थ फार गहन आहे. जे जे निसर्गात घडत असते ते ते सारे आपल्या शरीरात, अंतरंगातही घडत असते. आपल्याला फक्त संवाद साधता आला पाहिजे. निसर्गरंग आणि अंतरंग एकमेकात बेमालूमपणे मिसळून गेले पाहिजेत. पंचेंद्रियांनी निसर्गाशी एकरूप होता आले पाहिजे. यालाच तर वसंतोत्सव म्हणतात.
वसंत ऋतू हे बालपण आहे, शरद ऋतू हे तरुणपण आहे, तर शिशिर ऋतू हे म्हातारपण आहे! वसंत म्हणजे सत्त्वगुण, शरद म्हणजे रजोगुण आणि शिशिर म्हणजे तमोगुण! ऋतुराज वसंतातील कोकिळेचा मंजूळ स्वर, वर्षा ऋतूतील श्रावणात बरसला घननिळा, सहा ऋतूंचे सहा सोहळे! वर्षातील बारा महिने आणि सहा ऋतू यांचे आमच्या जीवनातील महत्त्व बालपणीच मनावर कोरले जायचे. वसंत म्हणजे ऋतूंचा राजा! वसंत म्हणजे रंगांची उधळण. वसंत म्हणजे उन्मेष, उत्साह, उल्हास. वसंतात चराचराच्या अंतरंगात हा उत्साह उन्मळून येतो. प्राणिमात्रांच्या, पक्ष्यांच्या अंतरंगात, वृक्ष-वल्लरींच्या पानापानांत, गवताच्या पात्यापात्यांत हा उन्मेष उसळून येत असतो. शिशिर ऋतूत जिथे निष्पर्ण फांद्या होत्या तिथे वसंत ऋतूत नवी कोवळी पालवी दिसू लागते, मोहोर-कळ्या दिसू लागतात व फुले फुलू लागतात. सृष्टीच्या कणाकणातून जाणवते की, काहीतरी नवे आणि आल्हाददायक घडत आहे. सृष्टीत नवजीवन जन्माला येत आहे. वसंताचे रंग आहेत पावित्र्याचे, उन्मेषाच्या लाटा आहेत प्रखरतेच्या, उल्हासाचे तरंग आहेत नवनिर्मितीचे! वसंताच्या या रंगांत विवेकाचा प्रकाश, वैराग्याची प्रभा, त्यागाची साद, बलिदानाचे शौर्य सामावलेले आहे. वीर भगतसिंग आणि त्यांचे सहकारी तुरुंगात असताना ‘रंग दे बसंती चोला, मेरा रंग दे…’ हे गीत गात असत, भारतमातेला आर्त स्वरात हाका मारत असत. चोला म्हणजे जीवन. हे भारतमाते, माझे सारे जीवन वसंताच्या रंगांत रंगवून दे. माझ्या जीवनाचे ध्येय, माझे व्यक्तिमत्त्व यांना असे रंग लावून दे की, त्याला वसंताचा बहर येईल. उत्साहाच्या लाटा उसळतील, उन्मेषाच्या तरंगलहरी उसळतील. नवी चेतना, नवी प्रेरणा, नवे आदर्श अंगीकारण्यासाठी, मातृभूमीचरणी सर्वोच्च त्याग करण्यासाठी माझे मन आनंदाने नाचायला लागेल, असा बसंतीचोला माते तू मला दे! वसंताचे हेच रंग, नवोन्मेषाचे हेच तरंग भारतीय हिंदू संस्कृतीचे प्रेरणास्रोत आहेत, संस्कारांची उगमस्थाने आहेत. म्हणूनच आमच्या द्रष्ट्या पूर्वजांनी वसंताच्या पावन पवनलहरींना प्रवाहित करून परिवर्तनाची ही वासंती लहर प्रेरित करण्यासाठी नववर्षाची सुरुवात गुढीपाडव्याला वसंतात योजनापूर्वक आखणी केली आहे. दुर्दैवाने आज आम्ही अभिव्यक्तिस्वातंत्र्याच्या नावाखाली कोणत्याच प्रकारचे बंधन, शासन, अनुशासन, शिस्त, संयम, शिष्टाचार पाळायला तयार नाही. आमच्या मानगुटीवर स्वार झालेला राक्षस प्रत्येक वेळी मन, बुद्धी, व्यवहार यांच्यात कशी फूट पाडावी, विभाजन कसे करावे, द्वेष कसा पसरवावा; जात, वर्ग, संप्रदाय, कूळ, प्रांत, भाषा यांचा उपयोग करून आपल्या स्वार्थाचेच राजकारण कसे करावे, यासाठी सतत प्रयत्नशील असतो. आमच्या पूर्वजांनी आपल्या शाश्‍वत परंपरेत जे काही चांगले, श्रेष्ठ, भव्य, दिव्य, विश्‍वकल्याणकारी विकसित करून ज्यांची प्राणपणाने जोपासना केली त्या सर्वांना विनाशाच्या खोल दरीत फेकून देण्यातच आम्ही पुरोगामित्व समजत आहोत. निसर्ग जसा वर्षभरातील सारे अमंगल शिशिरात टाकून देऊन वसंतात ताजातवाना होतो, त्याप्रमाणे आपणही सरत्या वर्षाच्या कडू-गोड आठवणी, भल्याबुर्‍या गोष्टी, विषाक्त भाव, असूया, तिरस्कार, वैमनस्याची भावना; सरत्या वर्षाने जेवढे काही अप्रिय आम्हाला भोगायला दिले होते त्याचे होलिकोत्सवात दहन करून आपण गुढीपाडव्याला नववर्षाच्या सूर्योदयाचे स्वागत करण्यासाठी मंगलमय वातावरणात सज्ज झाले पाहिजे.
वसुंधरा आपणांसारख्या प्राण्यांना, वनस्पतींना, मोठमोठ्या पर्वतांना, नद्या-सागरांना धारण करते. धराच आपले संरक्षण करते, पालन-पोषण करते व प्रसंगी विनाशही करते. मोठमोठे पर्वत धैर्यशीलतेची शिकवण देतात. नद्या गतिशीलता व निर्मलता शिकवतात. वनस्पती आपल्याला धनधान्य, औषधी व प्राणवायू देऊन परोपकाराची आठवण करून देतात. धरती सहनशीलतेचे मूर्तिमंत उदाहरण आहे. म्हणून तर त्यांची पूजा करायची असते! सृष्टीचा सर्वश्रेष्ठ प्राणी मनुष्य! सृष्टीचे सर्व वरदान त्याच्याचसाठी! सृष्टीचे वरदान अभिशापामध्ये बदलू नये, याची खबरदारी त्यानेच घेतली पाहिजे.
वसुंधरेची केविलवाणी अवस्था आम्ही आज उघड्या डोळ्यांनी पाहात आहोत. जगन्मातेचा सर्वात बुद्धिमान सुपुत्र मानवच आज वसुंधरेचे वस्त्रहरण करीत आहे. आपल्या दुर्बुद्धीने, असमंजसपणाने जीवनात दुःख, दुर्भाग्य यांना निमंत्रण देत आहे. परिस्थिती अत्यंत बिकट होत चालली आहे. आजच्या वातावरण प्रदूषणाला आमचे मानसिक-वैचारिक प्रदूषण कारणीभूत आहे. ज्या बेदरकारपणे, बिनडोकपणे आम्ही वागत आहोत त्यामुळे परिस्थिती आणखी बिघडत चालली आहे. आम्ही वेळीच जागृत झालो नाही, तर एक दिवस ही कोपलेली वसुंधरा आम्हाला रसातळात गाडून टाकल्याशिवाय शांत होणार नाही आणि तो दिवस फार दूर नाही! कारण जगन्माता आजपर्यंत आम्हाला जागे करायचा प्रयत्न करून थकली आहे. भरकटलेला माणूस ताळ्यावर यायची ती आणखी किती प्रतीक्षा करणार?
मनातील वाईट विचारांचे, किल्मिषांचे आणि दुर्वासनांचे होलिकोत्सवात दहन करून पवित्र झालेल्या अंत:करणात मांगल्याची गुढी उभारली की, त्याच पवित्र अंत:करणात रामनवमीला प्रभू श्रीरामचंद्र आणि त्यानंतर चैत्र पौर्णिमेला त्यांचे शिष्योत्तम हनुमान अवतरतात. विजयादशमीला रावणवध आणि शेवटी महाशिवरात्र! हा निसर्गक्रम आमच्याही आयुष्यात घडत असतो. चैत्र शुक्लपक्ष प्रतिपदा अर्थात गुढीपाडवा हा नववर्षाचा आरंभ दिवस. हा दिवस आध्यात्मिक, धार्मिक, ऐतिहासिक, सामाजिक आणि खगोलीय अशा सर्वच दृष्टिकोनातून अत्यंत महत्त्वाचा दिवस आहे. शालिवाहन या चारित्र्यसंपन्न राजाने आपल्या राज्यावर आलेले परचक्र परतावून लावण्यासाठी मातीचे सैन्य तयार केले. त्यांना चेतन करून युद्ध केले व परचक्रापासून साम्राज्य वाचविले. याचा अर्थ असा की, एरवी मुर्दाड भासणार्‍या हाडामांसाच्या सामान्य माणसांत शालिवाहन राजाने राष्ट्रभक्तीचे स्फुलिंग चेतविले. प्रभू श्रीरामचंद्रांसाठी वानरसेना लढली, याचाही अर्थ हाच आहे. संत ज्ञानेश्‍वर माउलींनी रेड्यामुखी वेद वदविले याचा मथितार्थही तोच. राष्ट्रभक्तीने पेटून उठलेली सामान्य जनता काय करू शकते, हे शिवरायांच्या आणि भारतीय स्वातंत्र्यलढ्याच्या काळात दिसून आले आहे. फक्त असे स्फुलिंग चेतविणारा निर्माण व्हावा लागतो. गुढीपाडवा हा सत्ययुगाचा, विक्रम संवत्सराचा आणि शालिवाहन शकाचा आरंभ दिन आहे. गुढीपाडव्याच्या निमित्ताने आपण सारे अंतर्मुख होऊ या. घराघरांवर आणि मनामनांत सद्गुणाच्या, सद्विचाराच्या आणि राष्ट्रभक्तीच्या उत्तुंग गुढ्या उभारून मातृभूमीच्या ऋणातून उतराई होण्याचा यथाशक्ती प्रयत्न करू या. जय श्रीराम!
सोमनाथ देविदास देशमाने, ९७६३६२१८५६