मोदी नावाचा प्रभंजन!

0
174

अभिनंदन

११ मार्च २०१७ या दिवसाने भारतात इतिहास घडवला. त्या दिवशी पहाटेपासूनच १२१ कोटी भारतीयांच्या हृदयाची धडधड वाढू लागली. दिवस जसजसा वर येऊ लागला तसतशी आमची उत्कंठा शिगेला पोहोचत होती. कारण पुढचे ४-६ तास कसोटीचे होते. मतपेटीतून कोण बाहेर येणार? मोदी की मॉन्स्टर? मागील दोन महिन्यांपासून मोदींनी केलेल्या अथक प्रयत्नांना किती प्रमाणात यश येणार? रात्रंदिवस केलेल्या अपार कष्टांचे फलित काय? विशेषत: उत्तरप्रदेश, उत्तराखंड या दोन राज्यांत यापुढे खर्‍या अर्थाने गणतंत्र नांंदणार की तत्त्वहीन, निहित स्वार्थी भ्रष्ट राजकारणी मुसंडी मारणार? या कळीच्या मुद्याचे उत्तर पुढील काही तासांत मिळणार होते. उत्तरप्रदेश हे राज्य सर्वात जास्त लोकप्रतिनिधी संसदेत पाठविणारे असल्याने, देशाचे राजकीय प्रजातांत्रिक भविष्य त्या राज्यावरच बहुतांशी निर्भर असते. त्या मॅजिक बॅलट बॉक्सेस कुणाला प्रसवणार? दैवी संपत्तीची निष्पत्ती होणार की, आसुरी? सूर्य माथ्यावर येईपर्यंत या प्रश्‍नाचे उत्तर मिळाले होते. उन्मत्त हिरण्यकशिपुचा मुकाबला करायला भक्त प्रल्हाद, माता कयाधु यांना अभय देण्यासाठी नरेंद्र नावाचा नरशार्दूल अवतरला होता सात्त्विक मनोवृत्तीच्या लोकांना आनंद देण्यासाठी. आता लोकांचा आनंद ओसंडून वाहू लागला. देशभर लोक गुलाल उधळत होते. ध्वजा, तोरणांनी रस्ते सुशोभित करण्यात आले होते. मंगलवाद्यांचा गजर होत होता. दुसर्‍याच दिवशी आलेल्या होलिकोत्सवाला त्या वेळी विशेष उधाण आले होते. लोकं बेभान होऊन नाचत होते. या विजयाचे शिल्पकार नरेंद्र मोदींवर स्तुतिसुमने उधळली जात होती. एका तपस्व्याने साकार केलेल्या अद्भुत रोमहर्षक विजयाचे वीर प्रसवा विश्‍वजननी, भारतभू सुहास्य वदनाने स्वागत करीत होती. सर्वधर्मसमभाव जोपासणारा अशोकासारखा लोकानां प्रिय लोकप्रतिनिधी म्हणून त्यांचे व्यक्तिमत्त्व तावून सुलाखून पुनश्‍च उजळून निघाले होते. मागील दोन वर्षांत त्यांनी घेतलेल्या अनेकविध निर्णयांवर या निमित्ताने लोकमान्यतेची मोहोर उमटली होती.
त्यांनी घेतलेला सर्वात महत्त्वाचा पण तितकाच विवाद्य नोटबंदीचा निर्णय (ज्याच्यावर कॉंग्रेस आणि वामपंथीयांनी कडाडून हल्ले चढवले होते) जनसामान्यांनी उचलून धरला. त्यामुळे मोदींचे दूरदर्शित्व सगळ्या जगाला अचंबित करणारे ठरले. सर्व लहान-मोठ्या देशांनी त्यांची मुक्त कंठाने प्रशंसा केली. आता तर काही विपक्षीयांनीही (जसे बिहारचे मुख्यमंत्री नितीशकुमार, राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार (तत्त्वत: मंजुरी). मोदींच्या नोटबंदीचे समर्थन केले.
अशा प्रकारे मोदीजींचा विजय रथ भरधाव सुटला आहे. या प्रवासात ते मुस्लिम बांधवांमधील त्रितलाक पद्धती, मुस्लिमांना चार विवाह करण्याची मुभा, समान नागरी कायदा यांसारखे जटिल प्रश्‍नही हाताळण्याची शक्यता आहे.
वरील सर्व विधायक कार्यासाठी जनता त्यांच्या पाठीशी एकदिलाने उभी राहो. लोकसभेच्या पुढील सार्वत्रिक निवडणुकांतही त्यांना याहूनही अधिक घवघवीत यश मिळो. (नव्हे, मिळणारच! कारण मोदींचे तेजच असे आहे की, आम्हाला विशेष सायास करावे लागणार नाहीत.
आता तर उत्तरप्रदेेशात योगी आदित्यनाथ यांचे सरकार आले आहे. शपथविधी सोहळाही आटोपला आहे. उत्तरप्रदेशसारख्या मोठ्या राज्याला मोदींचा हा रथ योगी आदित्यनाथ वेगाने ओढून नेणार आहेत. केंद्रात आणि राज्यातही सर्वत्र मोदी मोदी असताना, उत्तरप्रदेशच्या विकासाला आता निधीची कमतरता भासणार नाही. मोदींनी विधान केल्याप्रमाणे उत्तरप्रदेश हा देशातील उत्तम प्रदेश झाल्याशिवाय राहणार नाही. या नेत्रदीपक यशासाठी मोदी, अमित शहा आणि त्यांच्या चमूचे आणि महत्त्वाचे म्हणजे कार्यकर्त्यांचेही मन:पूर्वक अभिनंदन.
रा. ना. कुळकर्णी,०७१२-२२९०७२७