मेयो, मेडिकल, सुपरच्या शंभरहून अधिक शस्त्रक्रिया रखडल्या

0
149

निवासी डॉक्टरांचा बेमुदत संप
डॉक्टरांवरील हल्ल्याचा निषेध
तभा वृत्तसेवा
नागपूर, २० मार्च
गेल्या काही दिवसांपासून निवासी डॉक्टरांना होणार्‍या मारहाणीच्या प्रकरणात वाढ झाली आहे. महाराष्ट्रातील विविध शासकीय रुग्णालयातील निवासी डॉक्टरांना रुग्णांच्या नातेवाईकांनी मारहाण केल्याच्या घटना घडल्या आहेत. या हल्ल्यांमुळे डॉक्टरांमध्ये भीतीचे वातावरण असून याचा निषेध करण्यासाठी मेयो, मेडिकल आणि सुपर स्पेशालिटीतील निवासी डॉक्टरांनी सुरक्षेची मागणी लावून धरत बेमुदत संप पुकारला आहे. यामुळे तीनही रुग्णालयातील सुमारे १०० हून अधिक किरकोळ शस्त्रक्रिया रखडल्या आहे.
शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय आणि त्यांच्याशी संलग्न असणार्‍या सुपर स्पेशालिटी रुग्णालयातील ३४७ निवासी डॉक्टरांपैकी २८४ डॉक्टर तर इंदिरा गांधी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयातील सुमारे १५० निवासी डॉक्टरांपैकी १०० डॉक्टर संपावर गेले आहेत. मेडिकलमधील सर्वाधिक निवासी डॉक्टर संपावर असल्याने मेडिकलच्या कामाचा डोलारा ६९ वरिष्ठ निवासी डॉक्टर आणि ३७० अध्यापक व प्राध्यापक यांच्या भरवशावर सुरू आहे. गेल्या काही महिन्यात मुंबई, नागपूर, औरंगाबाद, नाशिक, पुणे आणि धुळे येथील शासकीय रुग्णालयातील निवासी डॉक्टरांच्या मारहाणीची प्रकरणे पुढे आली आहे.
रुग्णालयात येणार्‍या रुग्णाचा पहिला संबंध निवासी डॉक्टरांसोबत येतो. अपघात विभाग, आपात्कालीन विभाग, बाह्यरुग्ण विभाग यासह रुग्णालयातील इतरही विभागांमध्ये निवासी डॉक्टर आपली सेवा देतात. परंतु, त्यांच्याच सुरक्षेचा प्रश्‍न निर्माण झाल्याने बेमुदत संप पुकारण्यात आला आहे. आश्‍वासन नाही तर सुरक्षा रक्षक द्या, अशा मागणीचे पत्र निवासी डॉक्टरांनी मेडिकलच्या अधिष्ठात्यांना दिले आहे.
मेडिकलमधील बाह्यरुग्ण विभागात दररोज सुमारे ५०० रुग्ण उपचारासाठी येतात. त्यातील काहींवर किरकोळ शस्त्रक्रिया करावी लागते. अशा किरकोळ शस्त्रक्रिया निवासी डॉक्टर करतात. परंतु, डॉक्टर संपावर गेले असल्याने मेयो आणि मेडिकलमधील सुमारे १०० पेक्षा अधिक किरकोळ शस्त्रक्रिया रखडल्या आहेत. तर सुपरमध्ये केवळ चारच शस्त्रक्रिया करण्यात आल्या. रुग्णांना वेठीस धरून संप करणे असा आमचा उद्देश नाही, असे मत निवासी डॉक्टरांनी व्यक्त केले असले तरीही बेमुदत संपाचा सर्वाधिक फटका रुग्ण आणि वैद्यकीय सेवेला बसला आहे.

मेयोच्या अधिष्ठाता अनभिज्ञ
मेयोतील निवासी डॉक्टरांच्या संपाविषयी मेयोच्या अधिष्ठाता डॉ. श्रीखंडे यांच्याशी संपर्क साधला असता, संपाविषयी मला काही माहिती नाही, असे त्यांनी सांगितले.

मेडिकलचे काम सुरळीत
निवासी डॉक्टरांनी संप पुकारला असला तरी प्राध्यापक आणि वरिष्ठ निवासी डॉक्टरांनी अतिशय उत्तम पद्धतीने परिस्थिती हाताळली आहे. त्यामुळे मेडिकलमधील कोणतेच काम रखडलेले नाही, असे मेडिकलचे अधिष्ठाता
डॉ. अभिमन्यू निसवाडे म्हणाले.

सुपरच्या विशेष कार्य अधिकार्‍यांचे मौन
निवासी डॉक्टरांच्या संपामुळे सुपरमधील कार्यावर काही प्रभाव पडला का? याविषयी माहिती घेण्यासाठी सुपरचे विशेष कार्य अधिकारी डॉ. देशपांडे यांना भेटायला गेले असता त्यांनी भेटायचे टाळले. त्यांच्या या मौनामागील नेमके कारण काय, हा प्रश्‍न अनुत्तरित आहे.