अरुंधती भट्टाचार्य यांचा पुतळा जाळला

0
154

स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे स्टेट बँक मुख्यालयासमोर आंदोलन
तभा वृत्तसेवा
नागपूर, २० मार्च
स्टेट बँक ऑफ इंडियाच्या अध्यक्ष अरुंधती भट्टाचार्य यांच्याविरोधात स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते खा. राजू शेट्टी यांच्या नेतृत्वात स्टेट बँकेच्या मुख्यालयासमोर आंदोलन करण्यात आले. यावेळी आंदोलनकर्त्यांनी भट्टाचार्य यांचा पुतळा जाळला.
काही दिवसांपूर्वी भट्टाचार्य यांनी शेतकर्‍यांच्या कर्जमाफीस विरोध दर्शवला होता. शेतकर्‍यांचे कर्ज माफ करणे चुकीचे असल्याचे, त्यांनी म्हटले होते. त्यांच्या या वक्तव्याचा निषेध करण्यासाठी मध्यवर्ती रेल्वेस्थानक मार्गावरील स्टेट बँक ऑफ इंडियाच्या विभागीय मुख्यालयासमोर भट्टाचार्य यांचा पुतळा सोमवारी सकाळी जाळला. या आंदोलनात शेकडो कार्यकर्ते सहभागी झाले होते. अरुंधती भट्टाचार्य यांचे वक्तव्य शेतकरीविरोधी असल्याचा आरोप करीत खा. राजू शेट्टी यांच्या स्वाभिमानी शेतकरी संघटनेने आक्रमक भूमिका घेतली. तर दुसरीकडे विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी अरुंधती भट्टाचार्य यांच्याविरुद्ध विधानसभा अध्यक्षांकडे हक्कभंगाची सूचना दिली आहे. भट्टाचार्य यांनी शेतकरी कर्जमाफीसंदर्भात प्रसारमाध्यमांकडे जाहीरपणे केलेल्या निवेदनामुळे कायदेमंडळाचा हक्कभंग झाल्याचा आक्षेप विखे पाटील यांनी नोंदवला आहे.
आजच्या आंदोलनाची माहिती पोलिसांनाही नव्हती. सकाळी खा. राजू शेट्टी यांच्या नेतृत्वात भट्टाचार्य यांचा पुतळा दहन करण्यात आला. पोलिस घटनास्थळी पोचेपर्यंत कार्यकर्ते तिथून पांगले होते. पोलिस आले तेव्हा त्यांच्या हातात प्रतीकात्मक पुतळ्याची राख मिळाली.