पारा जाणार ४० वर

0
215

हवामान खात्याचा अंदाज
कूलर उद्योग तेजीत
तभा वृत्तसेवा
नागपूर, २० मार्च
होळीचा सण झाल्यानंतर लगेच उपराजधानीतील तापमान वाढू लागले आहे. गेल्या आठवड्यात काही प्रमाणात ढगाळ वातावरणामुळे दमटपणा जाणवत होता. मात्र, या आठवड्यात पारा वेगाने चढणार असून तापमान ४० अंशांपर्यंत जाण्याचा अंदाज हवामान खात्याने वर्तविला आहे.
सध्या दुपारी १२ वाजतापासून सायंकाळपर्यंत चांगलीच उष्णता जाणवू लागली असून दुपारी २ ते ४ या कालावधीत तर उष्ण हवादेखील जाणवत आहे. गेल्या आठवडाभर तापमान सातत्याने ३८ अंशांच्या घरात नोंदविण्यात आले आहे. या आठवड्यात शुक्रवार आणि शनिवारी आकाश काही अंशी आभ्राच्छादित राहणार असले तरी कमाल तापमान मात्र ४१ अंशांवर जाण्याचा अंदाज हवामान खात्याने वर्तविला आहे. रविवार २६ मार्चला पारा आणखी चढून ४२ पर्यंत जाण्याची शक्यता आहे. होळी झाल्यानंतर लगेच नागपूरकरांनी कूलर काढले आहे. जुन्या कूलरमध्ये वुडवूल भरण्यासह दुरुस्तीच्या व्यवसायाला सुगीचे दिवस आले आहेत.