भूषण शिंगणेंची नासुप्रवर मनपाकडून फेरनियुक्ती

0
187

– विविध विषय समिती सदस्यांची नावे जाहीर
– भाजपाकडून सभापतींची नावे घोषित
– परिवहन समितीचा निर्णय स्थगित
– कॉंग्रेसने जाहीर केले स्थायी समिती सदस्य

तभा वृत्तसेवा
नागपूर, २० मार्च
ज्येष्ठ नगरसेवक भूषण शिंगणे यांची नागपूर महानगरपालिकेच्या वतीने नागपूर सुधार प्रन्यासच्या विश्‍वस्त मंडळावर फेरनियुक्ती करण्यात आली आहे. महालस्थित नगरभवन येथे आज झालेल्या नवनिर्वाचित नगरसेवकांच्या पहिल्या सर्वसाधारण सभेत दहा विषय समितीच्या सदस्यांची नावे घोषित करण्यात आली असून या समितीच्या सभापती आणि उपसभापतिपदांची नावे सत्तापक्ष नेते संदीप जोशी यांनी सभा आटोपल्यावर आयोजित पत्रपरिषदेत घोशित केली. सभापती आणि उपसभापतींची अधिकृत निवड संबंधित समितीच्या बैठकीत केली जाणार आहे. दरम्यान, परिवहन समितीचा विषय सध्या स्थगित ठेवण्यात आला असून विशेष उद्देश वहन समितीवर पाठविण्याच्या इतर पक्षांच्या दोन सदस्यांची निवड करण्याचा अधिकार महापौर नंदा जिचकार यांना देण्यात आला. कॉंग्रेसनेही आज आपल्या स्थायी समिती सदस्यांची नावे जाहीर केली.
याआधीच्या कार्यकाळातही भूषण शिंगणे नासुप्रमध्ये नागपूर मनपाचे प्रतिनिधी म्हणून कार्यरत होते. याशिवाय आजच्या सभेत दहा विषय समित्यांवर प्रत्येकी नऊ सदस्यांची नियुक्ती करण्यात आली. प्रत्येक समितीत निर्धारित प्रमाणानुसार १०८ नगरसेवकांमुळे भाजपाला सहा, २९ नगरसेवक असलेल्या कॉंग्रेसला दोन आणि दहा नगरसेवक असलेल्या बसपाला ६.४४ च्या प्रमाणानुसार एक असा कोटा प्राप्त झाला. त्यानुसार तिन्ही पक्षांच्या गटनेत्यांनी बंद लिफाफ्यात आपापल्या सदस्यांची नावे दिली आणि ती महापौर जिचकार यांनी अधिकृत रीत्या जाहीर केली.
त्याआधी कॉंग्रेसने स्थायी समितीच्या आपल्या कोट्यातील तीन नावांची यादी महापौरांच्या स्वाधीन केली. विरोधी पक्षनेते संजय महाकाळकर यांनी दिलेल्या यादीनुसार हरीश ग्वालबंशी, सय्यदा बेगम निजामुद्दिन अंसारी आणि मनोज सांगोळे यांची कॉंग्रेसचे प्रतिनिधी म्हणून स्थायी समितीवर वर्णी लागली. परिवहन समितीबाबत अजूनपर्यंत आमच्या सदस्यांच्या नावाचा निर्णय झाला नसल्यामुळे हा विषय सध्या स्थगित ठेवण्यात यावा, असे सत्तापक्ष नेते संदीप जोशी यांनी सुचविले आणि त्याला महापौरांनी मंजुरी दिली. स्मार्ट सिटी अभियानांतर्गत स्थापन करण्यात आलेल्या विशेष उद्देश समितीवर १५ संचालक असतात. त्यात महापौर, उपमहापौर, सत्तापक्ष नेता, विरोधी पक्षनेता हे पदसिद्ध संचालक असतात. त्यामुळे सभागृहातील इतर पक्षांच्या सदस्यांपैकी दोन संचालकांची निवड केली जात असते. निर्धारित प्रमाणावरनुसार बसपा आणि शिवसेनेच्या वाट्याला प्रत्येकी एक संचालकपद आले आहे. मात्र, शिवसेनेने अजूनपर्यंत आपला गटनेता निश्‍चित केला नसल्यामुळे या दोन्ही संचालकांची निवड करण्याचे अधिकार सभेने महापौरांना दिले.
गेल्या कारकीर्दीत शिक्षण सभापती म्हणून लक्षणीय कार्य करणार्‍या गोपाल बोहरे यांचा वारसदार म्हणून त्यांच्याच प्रभागातील प्रा. दिलीप दिवे यांच्याकडे आगामी शिक्षण सभापतिपदाची जबाबदारी सोपविण्यात आली आहे. याआधीचे विरोधी पक्षनेते व शहर कॉंग्रेस अध्यक्ष विकास ठाकरे यांचा पराभव करून प्रा. दिलीप दिवे हे यंदाच्या मनपा निवडणुकीतील जायंट किलर ठरले होते, हे येथे उल्लेखनीय.