शिवसेना तोंडघशी

0
153

अनिरुद्ध पांडे
यवतमाळ, २१ मार्च
जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष, उपाध्यक्षाच्या निवडणुकीसाठी राष्ट्रवादी कॉंग्रेस आणि शिवसेनेच्या युतीची घोषणा राकॉं नेते मनोहर नाईक, संदीप बाजोरिया आणि शिवसेना नेते संजय राठोड व विश्‍वनाथ नेरुरकर यांनी सोमवारी, २० मार्चला संध्याकाळी ६ वाजता पत्रपरिषदेत केली. परंतु ही युती काही तासांतच मोडीत काढून राकॉंने शिवसेनेला तोंडघशी पाडले.
या दोन्ही पक्षांच्या नेत्यांनी सोमवारी संध्याकाळी येथील विश्रामभवनात आपल्या युतीची घोषणा केली. त्यावेळी त्यांनी आमचे अध्यक्ष व उपाध्यक्ष पदाचे उमेदवार ठरलेले नाहीत, ते यानंतर आम्ही बसून ठरवू, ते उद्या आपल्याला कळतील, असे स्पष्ट सांगितले. याचवेळी या दोन्ही पक्षांच्या नेत्यांनी आम्हाला भारतीय जनता पार्टी चालणारच नाही, असेही निक्षून सांगितले होते.शिवसेनेचे २० आणि राष्ट्रवादी कॉंग्रेसचे ११ अशा ३१ सदस्यांचे ६१ सदस्यांच्या जिल्हा परिषदेत स्पष्ट बहुमत झालेले आहे. या आकड्यांमध्ये मंगळवारी आपल्याला भरच पडलेली दिसेल, असा दावाही यावेळी करण्यात आला होता. परंतु, सोमवारची रात्र शिवसेनेसाठी खरोखरच ‘काळरात्र’ ठरली. शरद पवारांच्या नेतृत्वातील राकॉंने रात्रीतून पलटी मारून शिवसेनेचा अध्यक्षाचा आणि सत्तेचा दावा मातीमोल करून टाकला.
सोमवारची पत्रपरिषद झाल्यानंतर शिवसेनेच्या नेत्यांशी अनौपचारिक चर्चा करताना, तुम्ही शरद पवारांच्या राष्ट्रवादी कॉंग्रेसवर किती भरवसा ठेवू शकता, असेही पत्रकारांनी विचारले होते. यावर शिवसेनेच्या नेत्यांनीही शंका व्यक्त करून, असे होणार नाही असा विश्‍वास दर्शविला होता. परंतु मंगळवारी ऐन वेळेवर राकॉंने कोलांटउडी घेऊन आपल्या अकरा सदस्यांसह भाजपा आणि कॉंग्रेसच्या तंबूत ठाण मांडल्याचे धक्कादायक चित्र दिसून आले.
राकॉंने ऐन वेळेवर मारलेली पलटी भाजपा व कॉंग्रेससाठी अपेक्षित असली तरी जिल्ह्यातील अनेक राजकीय निरीक्षक आणि प्रसार माध्यमांसाठी चकित करणारीच होती. ‘शरद पवार आणि अविश्‍वसनीयता’ या एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत आणि ‘विधीनिषेधशून्य राजकारण म्हणजेच राष्ट्रवादी कॉंग्रेस’, असे ठामपणे मानणारा महाराष्ट्रात एक फार मोठा वर्ग आहे. हीच बाब या घटनाक्रमाने पुन्हा अधोरेखित झाली, अधिक मजबूतपणे.
(पान १ मध्ये २१ मार्च प्रेस नावाने)